रत्नागिरी-अधिवेशनापुर्वी प्रलंबित साडेतिनशे प्रकरणांचा निपटारा करा
प्रलंबित साडेतीनशे प्रकरणांचा निपटारा करा
मत्स्यविभागाच्या सूचना; ड्रोनद्वारे अनधिकृत मासेमारी नौकांवरील कारवाई
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ः अवैध मासेमारीला चाप लावण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाने ड्रोनच्या साह्याने गेल्या वर्षी गस्त सुरू केली. मागील हंगामात रत्नागिरी जिल्ह्यात ५८२ मासेमारी नौकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. त्यातील २३२ नौकांची सुनावणी पूर्ण झाली आहे. उर्वरित ३५० नौकांची सुनावणी हिवाळी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा, असे आदेश मत्स्यविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे पुढील महिन्याभरात रत्नागिरीतील सहाय्यक मत्स्यआयुक्तांना सुनावण्या पूर्ण कराव्या लागणार आहेत.
मत्स्य व्यवसाय आणि बंदरविकास मंत्री नीतेश राणे यांनी अवैध मासेमारीसंदर्भात कडक भूमिका घेतल्यानंतर मत्स्य व्यवसाय विभागाने ९ जानेवारी २०२४ रोजी राज्याच्या किनारपट्टीवर अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण प्रणाली कार्यान्वित केली. या अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा, नाटे येथे ड्रोन केंद्र करण्यात आले. किनारपट्टीपासून १२ सागरी मैलांचे अंतरइतकी एका ''ड्रोन''ची कार्यकक्षा आहे. मागील हंगामात जानेवारी ते ३१ मे २०२४ या कालावधीत ड्रोनच्या कार्यकक्षात एक हजाराहून अधिक मच्छीमारी नौका आल्या होत्या. त्यातील ५८२ नौका अनधिकृतरित्या मासेमारी करताना आढळल्या. या नौकांवर सहाय्यक मत्स्यआयुक्तांकडे सुनावण्या घेण्यात आल्या. जून ते सप्टेंबर या कालावधीत १०२ नौकांच्या सुनावण्या पूर्ण झाल्या. त्यांच्यावर अवैध मासेमारी केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, ३७ लाख ५७ हजारांचा दंड आकारण्यात आला. त्यातील १७ लाख ९२ हजारांची वसुली झाली आहे. आतापर्यंत ३५० मासेमारी नौकामालकांच्या सुनावण्या पूर्ण झालेल्या नाहीत. या कारवाया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मत्स्य विभागाकडून रत्नागिरीतील सहाय्यक मत्स्य अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. याबाबत दोन दिवसांपूर्वी मुंबईत मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आढावा घेतला होता. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे साडेतीनशे सुनावण्या शिल्लक असल्याचे पुढे आले आहे. हिवाळी अधिवेशनात अनधिकृत मासेमारीवरील कारवाईचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केल्यास गोंधळ उडू नये यासाठी आतापासूनच मत्स्य विभागातील अधिकारी सतर्क झाले आहेत.
दरम्यान, ड्रोनच्या कारवाईत परराज्यातील सुमारे ३५ मासेमारी नौकांचा समावेश असून, त्यांच्यावरील कारवाईचा प्रश्न गंभीर आहे. संबंधित मच्छीमारांना नोटीस दिल्या असून, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ही प्रकरणं कायम प्रलंबित राहणार असल्याचे दिसत आहे.
-----
चौकट १
मासेमारी बंदी राखीव क्षेत्र
महाराष्ट्राच्या १२ सागरी मैल क्षेत्र हे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या नौकांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या क्षेत्रात पर्ससीन मच्छीमार सप्टेंबर ते डिसेंबर हा कालावधी वगळता मासेमारी करू शकत नाही. मुरूड ते बुरोंडी परिसरादरम्यान १० मीटरच्या खोलीच्या पलीकडे, बुरोंडी ते जयगडच्या परिसरात २० मीटर खोलीच्या पलीकडे आणि जयगड ते बांदादरम्यानच्या परिसरात २५ मीटर खोलीच्या पलीकडे पर्ससीन नौकांना मासेमारी करण्याला परवानगी आहे याशिवाय एलईडी प्रकाशदिव्यांचा वापर करून आणि हायड्रॉलिक विंच म्हणजेच बूम विंच वापरून मासेमारी करण्यावर पूर्णपणे बंदी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

