संगमेश्वर ः गर्डर बसवण्याचे काम वाढवणार स्थानिकांचा मनस्ताप
ग्राऊंड रिपोर्ट----लोगो
rat14p9.jpg-
04334
संगमेश्वर ः सोनवी नदीवरील पुलावर गर्डर बसवण्याचे काम सुरू होणार आहे.
----------
सोनवी पुलावरील कामात समन्वयाचा अभाव
गर्डर बसवण्याचे काम; महामार्ग बंद करण्याच्या वेळा चुकीच्या, दिवसभरात दहा तास बंदचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १४ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सोनवी पुलाचे काम गेली पाच वर्षे अत्यंत मंदगतीने सुरू आहे. पुलाचे काम करताना सुरक्षेचे कोणतेही उपाय केले गेले नाहीत उलट ठेकेदाराला वाटेल तेव्हा सोनवी पूल वाहतुकीसाठी बंद करून वाहनचालकांचा अक्षरशः छळ केला गेला. गेले काही दिवस या पुलाचे गर्डर चढवायचे असल्यामुळे सलग १४ दिवस मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग सोनवीचौक येथे दिवसभरात दहा तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कामात राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदार यांच्यामध्ये समन्वय नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा मोठा फटका शाळकरी विद्यार्थी, ग्रामस्थ, महिला, संगमेश्वरमधील व्यापारी आणि वाहनचालकांना बसणार आहे.
सोनवीचौक येथे पुलाचे गर्डर बसवण्याचे काम हाती घेणार असल्याचे ठेकेदार कंपनीने जाहीर केले. राष्ट्रीय महामार्ग विभाग अथवा जिल्हाधिकारी तसेच तत्सम अधिकारीवर्गाकडून परवानगी मिळण्याआधीच संगमेश्वर सोनवीचौक येथे १३ ते २६ नोव्हेंबरदरम्यान सकाळी दहा ते एक, दुपारी तीन ते पाच आणि रात्री दहा ते पहाटे तीन या दहा तासांच्या कालावधीत राष्ट्रीय महामार्ग संगमेश्वर सोनवीचौक येथे वाहतुकीसाठी बंद राहील, असा फलक लावला गेला. त्यामुळे असंख्य वाहनचालक संभ्रमित झाले आहेत. गर्डर बसवण्याचे काम १३ नोव्हेंबरपासून सुरू होईल ते २६ नोव्हेंबरपर्यंत चालेल, असा एक फलक लावून ठेकेदार कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग मोकळे झाले आहेत.
या कालावधीत पर्यायी वाहतुकीची व्यवस्था समजावून सांगितली गेली नाही. प्रत्यक्षात पुलाचे गर्डर चढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या क्रेन संगमेश्वर येथे दाखल होण्यापूर्वीच महामार्ग बंद ठेवण्याची तारीख जाहीर केली गेली. ठेकेदार कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्यामध्ये समन्वय नसल्यानेच हा गंभीर प्रकार घडला आहे. गर्डर ठेवण्याचे काम सुरू करण्याची तारीख जाहीर केली गेली; मात्र प्रत्यक्षात क्रेन न आल्याने शुक्रवारी (ता. १४) गर्डर चढवण्याचे काम हाती घेतले गेले नाही. दिवसाच्या कालावधीत राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवला जाऊ नये, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. सोनवीचौक येथे दिवसाच्या कालावधीत महामार्ग बंद ठेवला गेला तर त्याचा परिणाम राज्य परिवहन महामंडळाच्या बसवाहतुकीवर होणार असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होणार आहे.
चौकट
बसस्थानक, बाजारपेठ, रुग्णालय सुविधेवर परिणाम
संगमेश्वरच्या आजूबाजूला अनेक माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये आणि पदवी महाविद्यालय कार्यरत आहेत. संगमेश्वरच्या आजूबाजूची अनेक गावे संगमेश्वरच्या बाजारपेठेवर, येथील ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून आहेत. जिथे गर्डर चढवले जाणार आहेत तिथेच संगमेश्वरचे बसस्थानक आहे. त्या बसस्थानकातून ग्रामीण भागात अनेक बसेस ये-जा करतात. शाळकरी मुले, महाविद्यालयीन मुले संगमेश्वर बसस्थानकावरच अवलंबून असतात.
---------
चौकट
संघटना, व्यापारी, शाळा, ग्रामपंचायतीही अनभिज्ञ
सोनवी पुलाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदारावर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे नियंत्रण आहे अथवा नाही0 असा प्रश्न उपस्थित होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या एकाही जबाबदार अधिकाऱ्याने महामार्ग बंद राहणार याबाबत व्यापारीवर्ग, वाहनचालक, संस्थाचालक, शाळा महाविद्यालयांचे प्रमुख, प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी, वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, परिसरातील ग्रामपंचायती यांची बैठक बोलावलेली नाही. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
--------
चौकट १
खड्ड्यांकडे दुर्लक्ष
सद्यःस्थितीत माभळे ते पैसाफंड इंग्लिश स्कूल संगमेश्वरदरम्यान राष्ट्रीय महामार्गाला असंख्य खड्डे पडले असून, त्याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी अथवा ठेकेदार कंपनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. या दरम्यान, धुळीचे अक्षरशः लोट उठत असून, त्यामुळे वाहन चालवणे देखील अवघड झाले आहे. मोठमोठ्या खड्ड्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. या प्रश्नांकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून होत आहेत.
----
चौकट २
जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज
सध्या नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. याची आचारसंहितादेखील लागू झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील देवरूख नगरपंचायतीचे निवडणूक होत आहे. असे असताना कोणत्या अधिकारात संगमेश्वर येथे महामार्ग बंद ठेवण्याचा घाट घातला जात आहे0 राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी अथवा ठेकेदाराने याबाबत कोणालाही विश्वासात घेतलेले नाही. महामार्ग दिवसा बंद ठेवण्याला परवानगी न देता हे काम रात्रीच्यावेळी करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी संगमेश्वरवासियांनी केली आहे.
------------
कोट
सोनवीचौक येथे पुलाचे काम करत असताना राष्ट्रीय महामार्ग दिवसा बंद ठेवणे म्हणजे बेबंदशाही असून, वाहनचालकांना पर्यायी मार्ग न सांगता हुकूमशाही पद्धतीने काम करणे अत्यंत चुकीचे आहे. ठेकेदारांच्या कारभाराला आधीच संगमेश्वरवासीय कंटाळले आहेत. यातच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता आपल्या जबाबदारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. महामार्ग बंद ठेवून संगमेश्वरवासियांच्या भावनांचा राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदार कंपनीने अंत पाहू नये.
- परशुराम पवार, पदाधिकारी, प्रवासी वाहतूक संघटना, संगमेश्वर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

