झिरंगवाडी बजावणार निर्णायक भूमिका
प्रभागाचे अंतरंग (सावंतवाडी) भाग ४
---
झिरंगवाडी बजावणार निर्णायक भूमिका
प्रभाग चार; समीरा खलील, सायली दुभाषी यांच्यातील लढत लक्षवेधी
रुपेश हिराप ः सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ ः येथील पालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग चारमध्ये मुस्लिम मतदारांवर विजयी उमेदवारांचे गणित जुळणार आहे. या प्रभागातील झिरंगवाडी हा भागही विजयाच्या गणितात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. एकूणच या ठिकाणी महिला उमेदवारांमधून ठाकरे शिवसेनेच्या समीरा खलील आणि शिंदे शिवसेनेच्या ॲड. सायली दुभाषी यांची लढत लक्षवेधी ठरणार आहे.
सावंतवाडी पालिका निवडणुकीमध्ये प्रभाग १ प्रमाणे प्रभाग क्रमांक चारमध्येही मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे. या ठिकाणी एकूण मतदान २०३६ एवढे असून, पैकी ११०० मतदार मुस्लिम समाजाचे आहेत. उर्वरित मतदार हिंदू आणि ख्रिश्चन या समाजातील आहेत. या प्रभागामध्ये महिला खुला व ओबीसी असे आरक्षण पडले आहे. त्यामुळे या ठिकाणी महिला उमेदवारातून राष्ट्रवादी शरद पवार गटातून शिंदे शिवसेनेमध्ये अलीकडेच प्रवेश केलेल्या अॅड. सायली दुभाषी यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे, तर भाजपकडून अद्याप या जागेवर चाचपणी सुरू आहे. दुसरीकडे ठाकरे शिवसेनेने या ठिकाणी समीरा खलील यांच्या रूपाने उमेदवार दिला आहे. त्यामुळे शिंदे शिवसेना विरुद्ध ठाकरे शिवसेना अशी लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. कारण या पक्षांच्या उमेदवारांचा या भागातील जनसंपर्क चांगला आहे.
दुसरीकडे ओबीसी उमेदवारांमधून शिंदे शिवसेनेकडून प्रसाद नाईक या नवीन चेहऱ्याला संधी देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. झिरंगवाडी भागात नाईक यांना मानणारा मतदार असल्याने त्याचा फायदा शिंदे शिवसेनेसह महिला उमेदवार असलेल्या दुभाषी यांना होण्याची शक्यता आहे. भाजपकडून विजय साटेलकर यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे, तर ठाकरे शिवसेनेकडून ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडून त्या ठिकाणी माजी नगरसेवक असलेल्या देवा टेमकर यांना संधी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या गटात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
---
९०० मतदार; ७०० मतदान शक्य
प्रभाग चारच्या रचनेमध्ये झिरंगवाडी, दत्तनगर कॉलनी, मियाँसाहेब समाधीसमोरील भाग, उर्दू हायस्कूलसमोरील भाग, कोलगाव दरवाजाकडील काही भाग असा भाग आला आहे. आधीच्या प्रभाग रचनेमधील माठेवाडा हा भाग वगळला आहे. एकूणच याचा तितका फटका उमेदवारांना बसणार नाही. झिरंगवाडी या भागामध्ये जवळपास ९०० मतदार आहेत. त्यापैकी ७०० इतके मतदान होईल, असा अंदाज राजकीय पक्षांकडून व्यक्त होत आहे. ही मते नेमकी कोणाच्या पारड्यात पडतात, त्यावरही जय-पराजयाची गणिते ठरणार आहेत.
---
नेहमी नवीन चेहऱ्याला संधी?
प्रभाग क्रमांक चारमध्ये गतवेळी राजू बेग आणि उत्कर्ष सासोलकर या भाजपमधून विजयी झाल्या होत्या; मात्र प्रभाग चारमधील मतदार नेहमी नवीन चेहऱ्याला संधी देतात, असा इतिहास आहे. त्यामुळे यावेळी या ठिकाणी इच्छुक असलेले सर्वच उमेदवार हे नवीन असल्याने येथील मतदार नेमके कोणाला स्वीकारतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

