बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय पक्षांची सावध भूमिका

बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय पक्षांची सावध भूमिका

Published on

राजापुरात इच्छुकांमध्ये धावपळ, पक्ष मात्र शांत
बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारीबाबत गुप्तता; महायुती, आघाडीच्या यादीची प्रतीक्षा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १५ ः राजापूर पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, उमेदवारी अर्ज दाखल होण्यालाही सुरुवात झाली आहे. शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उबाठा), काँग्रेस, भाजप या प्रमुख राजकीय पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी आहे. उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी होऊ नये यासाठी राजकीय पक्षांनी अद्यापही उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी जसजसा पुढे सरकू लागला आहे त्याप्रमाणे ‘उमेदवारी मिळणार की, पत्ता कापला जाणार’ या चिंतेने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.
शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट), मनसे या पक्षांनी महाविकास आघाडीची घोषणा केली असली तरी अद्यापही उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली नाही. दुसऱ्‍या बाजूला शिवसेना (शिंदे गट), भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी अद्यापही महायुतीची घोषणा केलेली नाही. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपने इच्छुकांच्या मुलाखती घेऊन उमेदवारी चाचपणी केली आहे. उमेदवारी घोषित झाल्यानंतर बंडखोरी होण्याची आहे. त्याचा फटका उमेदवाराला बसण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेतली असून, उमेदवारांची घोषणा केलेली नाही. दरम्यान, वरिष्ठांकडून उमेदवारीसंबंधी ज्यांना हिरवा कंदील मिळाला आहे त्यांनी मतदारांच्या भेटीगाठीला सुरुवात केली आहे.
---
चौकट
नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवड आव्हानात्मक
नगरपालिकेतील वर्चस्वासह सत्तेच्या चाव्या राखण्यासाठी नगरसेवकपदासह नगराध्यक्षपद महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामध्ये नगरसेवकपदापेक्षा नगराध्यक्षपदाला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी नगराध्यक्षपदाचा सक्षम उमेदवार निवडीकडे विशेष लक्ष दिल्याचे चित्र दिसत आहे. राजापूर पालिकेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला राखीव असल्याने अनेक महिलांना नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची संधी आहे. अनेक महिला नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. त्यामध्ये कोणाला कोणत्या राजकीय पक्षाकडून उमेदवारी मिळणार, याकडे आता साऱ्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com