शुद्ध हवा ही माझी जबाबदारी

शुद्ध हवा ही माझी जबाबदारी

Published on

rat16p.jpg-

डॉ. प्रशांत परांजपे

इंट्रो

प्रत्येकानं शुद्ध वातावरण ही माझी जबाबदारी आहे. शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध जमीन आणि शुद्ध सात्त्विक जीवन ही माझी जबाबदारी आहे; याची जाणीव स्वतःलाच करून देणे आवश्यक आहे.

– डॉ. प्रशांत परांजपे, दापोली

---------
शुद्ध हवा ही माझी जबाबदारी

प्रतिवर्षी हिवाळ्यामध्ये वायू प्रदूषण गंभीर स्वरूप धारण करत असल्याचे दिसून येते. सध्या दिल्लीमध्ये वायू प्रदूषणाने उच्चांक गाठला आहे. दिल्लीतील हवेची गुणवत्ता सध्या ''खराब'' ते ''अतिशय खराब'' या श्रेणीत आहे. दिवाळीनंतर प्रदूषण वाढले असून काही ठिकाणी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 391 च्या वर नोंदवला गेला आहे. हिवाळ्यामुळे कमी वाऱ्याचा वेग, धूळ-कणांचे प्रमाण, तसेच शेतातील पिकांचे ज्वलन यामुळे प्रदूषण आणखी वाढते आणि आरोग्य धोक्यात येते.
मुंबई आणि पुणे सारख्या महानगरांची स्थिती देखील गंभीर होत चालली आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक मोठ्या शहरातील वायूची गुणवत्ता घसरत चालली आहे. महाराष्ट्रात मालेगाव, मुंबई, पुणे आणि नागपूर यांसारख्या शहरांची हवेची गुणवत्ता खालावली आहे. मालेगाव हे राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर असल्याचे एका अहवालात नमूद केले आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या प्रमुख शहरांमध्येही वायू प्रदूषण वाढले असून हवेचा दर्जा ‘मध्यम’ ते ‘अतिवाईट’ श्रेणीत पोहोचला आहे. विकसनशील शहरे आणि गावांमधील वायू गुणवत्ता देखील घसरत असल्याचे चित्र आहे.
यासाठी वैयक्तिक आणि सामुदायिक स्तरावर अनेक उपाय करता येतात. खासगी वाहनांचा वापर कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुसज्ज व नियमित करणे, शक्य तेथे चालणे किंवा सायकल चालवणे, सार्वजनिक वाहतूक वापरणे, उघड्यावर कचरा जाळणे टाळणे, जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे आणि भरपूर झाडे लावून ती जपणे गरजेचे आहे. औद्योगिक आणि तांत्रिक सुधारणा, जसे की प्रदूषण नियंत्रण उपकरणे व स्वच्छ ऊर्जा वापरणे, देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत.

* रस्ते तयार करताना अतिदक्षता महत्त्वाची

महाराष्ट्रभर रस्ते दुरुस्तीसाठी कामे सुरू असताना प्रचंड खड्डे आणि धूळकणांचा सामना करीत वाहतूकदारांना त्रास सहन करावा लागतो. एखादे वाहन समोरून गेले किंवा जवळून गेले तरी पादचारी आणि दुचाकीस्वारांना श्वास घेणे कठीण होते. परिणामी श्वसनाचे आजार वाढत आहेत. परिसरातील वृक्षवल्लीच्या वाढीवरही परिणाम होत असून रहिवाशांना धुळीमुळे त्रास जाणवू लागला आहे. सततच्या अस्वच्छतेमुळे त्वचेचे रोग देखील वाढत आहेत. हे टाळण्यासाठी रस्ते मार्ग प्राधिकरण, संबंधित ठेकेदार, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी पाणी मारणे, धूळ नियंत्रण करणे, तातडीने खड्डे बुजवून पक्के रस्ते तयार करणे ही कामे शीघ्रगतीने करणे अत्यावश्यक आहे.

* वायू प्रदूषणामुळे होणारे आजार

वायू प्रदूषण हे मृत्युदर वाढवणारे तसेच विशिष्ट आजारांना कारणीभूत ठरणारे सर्वात मोठे पर्यावरणीय कारण आहे. वायू प्रदूषणाच्या संपर्कामुळे स्ट्रोक, इस्केमिक हृदयरोग, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, फुफ्फुसांचा कर्करोग, न्यूमोनिया आणि (घरगुती वायू प्रदूषणामुळे) मोतीबिंदू होऊ शकतो. तसेच, गर्भधारणेतील प्रतिकूल परिणाम (कमी जन्म वजन), इतर कर्करोग, मधुमेह, संज्ञानात्मक कमजोरी आणि न्यूरोलॉजिकल आजार यांचा धोका वाढतो, असे सूचक पुरावे उपलब्ध आहेत.

* महत्त्वाचे वायू प्रदूषक

सार्वजनिक आरोग्यास हानी पोहोचवणाऱ्या प्रदूषकांमध्ये कणयुक्त पदार्थ (PM), कार्बन मोनोऑक्साइड (CO), ओझोन (O₃), नायट्रोजन डायऑक्साइड (NO₂) आणि सल्फर डायऑक्साइड (SO₂) यांचा प्रमुख समावेश आहे. सूक्ष्म कणयुक्त पदार्थ अतिशय घातक असून हे फुफ्फुसांमध्ये खोलवर जाऊन रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात आणि अवयवांमध्ये जाऊन इजा पोहोचवू शकतात. वैयक्तिक स्तरावर वाहनांचा वापर कमी करा. शक्य असल्यास एकाच दिशेला जाणाऱ्या नागरिकांनी कार-शेअरिंग करावे किंवा सार्वजनिक वाहतूक वापरावी. चालणे किंवा सायकल चालवणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

* कचरा आणि धूम्रपान टाळा.
स्वच्छतेच्या नावाखाली पालापाचोळा आणि प्लास्टिक कचरा जाळला जातो, ज्यामुळे प्रदूषण वाढते. पावसाळ्यातून खत निर्मिती करणे आणि प्लास्टिक गोळा करून पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठवणे आवश्यक आहे.

* ऊर्जेची बचत करा.
सौरऊर्जा आणि ऊर्जा-कार्यक्षम उपकरणे वापरून ऊर्जा बचत करता येते. सौरऊर्जेसाठी सर्वसामान्यांना परवडेल अशी धोरणे शासनाने लागू केली पाहिजेत.

* सामुदायिक आणि औद्योगिक स्तरावरील प्रयत्न
- अक्षय ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढवा.
- उद्योगांमध्ये वायू प्रदूषण नियंत्रण उपकरणे (industrial scrubbers) बसवणे आवश्यक.
- प्रदूषण नियंत्रणासाठी असलेले कायदे कठोरपणे अंमलात आणणे आवश्यक.

UNEP च्या अहवालानुसार अनेक देशांनी कायदे करून प्रदूषणाचा सामना करण्याचे पाऊल उचलले असले तरी हवेची गुणवत्ता खालावतच आहे. अहवालात सार्वजनिक आरोग्य, कल्याण आणि triple planetary crisis ला सामोरे जाण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज व्यक्त केली आहे. दरवर्षी सुमारे 70 लाख लोकांचा मृत्यू वायू प्रदूषणामुळे होतो. कोविडपेक्षा जास्त.
प्रत्येकानं शुद्ध वातावरण ही माझी जबाबदारी आहे. शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध जमीन आणि शुद्ध सात्त्विक जीवन ही आपली जबाबदारी आहे. याची जाणीव स्वतःलाच करून दिली तरच पुढील पिढ्या निरोगी आयुष्य जगू शकतात. अन्यथा पुढील पिढ्यांचा शापच आपण घेण्यास कारणीभूत ठरू.

----------
(लेखक : पर्यावरणाच्या शाश्वत विकास विषयातील पदवीधर.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com