प्रभाग पाचमधून आठ उमेदवार रिंगणात

प्रभाग पाचमधून आठ उमेदवार रिंगणात

Published on

प्रभागांचे अंतरग - सावंतवाडी भाग ५
------

प्रभाग पाचमधून आठ उमेदवार रिंगणात

सावंतवाडी पालिका निवडणूक; बबलू मिशाळांकडून बंडखोरीची शक्यता

रुपेश हिराप ः सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ ः येथील पालिकेच्या निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये तब्बल आठ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरून आपले नशीब आजमावणार आहेत. या प्रभागात शिंदे शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या बबलू मिशाळ यांच्याकडून बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ते या प्रभागातून अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम असून तसे झाल्यास शिंदे शिवसेनेला या ठिकाणी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
येथील पालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदे शिवसेना, भाजप व ठाकरे शिवसेनेकडून कंबर कसली आहे. राष्ट्रीय काँग्रेस या निवडणुकीमध्ये उतरला आहे. प्रभाग तीन प्रमाणे प्रभाग क्रमांक पाच मध्ये सुद्धा इच्छुकांची भाऊ गर्दी पाहायला मिळत आहे. कारण हा प्रभाग दोन्ही जागेसाठी सर्वसाधारण खुला असा आरक्षित झाल्याने ही परिस्थिती पाहायला मिळत आहे. या प्रभागातून भाजपकडून सुधीर आडिवरेकर तर महिला उमेदवारांमधून दुलारी रांगणेकर यांना उमेदवारी देण्यात आली. शिंदे शिवसेनेकडून यशवंत उर्फ बंड्या कोरगावकर यांना तर महिलांमधून उत्कर्षा सासोलकर यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. ठाकरे शिवसेनेकडून उमेश कोरगावकर तर महिलांमधून कृतिका कोरगावकर यांना उमेदवारी निश्चित होऊन त्यांनी आपला उमेदवारी अर्जही भरला आहे. काँग्रेसकडून समीर वंजारी हे सुद्धा इच्छुक आहेत तर दुसरीकडे शिंदे शिवसेनेमधून इच्छुक असलेले बबलू मिशाळ यांचा पत्ता कट झाल्याने ते या ठिकाणी अपक्ष उमेदवारी दाखल करून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. एकूणच इच्छुकांची गर्दी लक्षात घेता या ठिकाणी विभागाणी मोठ्या प्रमाणात होणार आहे. कारण सर्वच्या सर्व उमेदवार हे एकाच प्रभागातील आणि नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे चेहरे आहेत.
या प्रभागांमध्ये जवळपास २१४३ एवढे मतदार असून त्यापैकी १५०० एवढे मतदान होण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवारांचा विचार करता भाजपाचे सुधीर आडीवरेकर हे विद्यमान नगरसेवक असून त्याचे पारडे या प्रभागात अधिक तुल्यबळ समजले जाते. परंतु, यावेळी होणारी लढत लक्षात घेता मतांच्या विभागणीमध्ये मतदार नेमके कोणाला साथ देतात० हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मागच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी अपक्ष निवडून आलेल्या माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांची भूमिका सुद्धा या प्रभागातील निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या विजयामध्ये महत्त्वाची ठरणार आहे. सौ. कोरगावकर या भाजपच्या कार्यकर्ते आहेत. परंतु, त्यांच्यात कुटुंबातील कोरगावकर कुटुंबीय या ठिकाणी रिंगणात असल्याने त्यांची साथ कोणाला लाभते? हे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या तरी भाजपचे सुधीर आडीवरेकर यांचेच पारडे या ठिकाणी जड आहे.
---
बदललेल्या प्रभाग रचनेचा फटका?
प्रभाग पाचच्या रचनेचा विचार करता जुन्या प्रभाग रचनेतील विठ्ठल मंदिर, मच्छी मार्केट, दैवैद्य गणेश मंदिर हा भाग नवीन प्रभाग रचनेतून वगळण्यात आला आहे. नवीन प्रभाग रचनेमध्ये जुना बाजार, माठेवाडा, वैश्यवाडा काही भाग, उभा बाजार काही भाग व गांधी चौक काही भाग असा आला आहे. बदललेल्या प्रभाग रचनेचा फटका काहीसा उमेदवारांना बसू शकतो. परंतु, पक्षाची ताकद आणि वैयक्तिक जनसंपर्क यातून या प्रभागातील विजयी उमेदवार ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com