दोन्ही शिवसेनेचा नगराध्यक्ष पदावर डोळा
दोन्ही शिवसेनेचा नगराध्यक्षपदावर डोळा
घटक पक्षांना सामावून घेण्यावर भर ; नाराजी टाळण्याचा प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ ः नगरपालिका निवडणुकीसाठी रत्नागिरीत शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना यांच्यात चुरस निर्माण झालेली आहे. दोन्हीकडून मोजक्याच उमेदवारांची यादी जाहीर झाली असून आपल्याबरोबर असलेल्या घटक पक्षांची नाराजी ओढवणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. मात्र नगरपालिकेत नगरसेवकांच्या जागांवर वर्चस्व प्रस्थापित करण्याबरोबरच दोन्ही शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदावर अधिक लक्ष केंद्रीत केले गेले आहे.
थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे पालिकेत नगरसेवकांपेक्षा या पदावर वर्चस्व प्रस्थापित करण्यावर सर्वांचा राजकीय पक्षांचा भर राहिलेला आहे. नगराध्यक्षपद असेल तर नगरपालिकेची सूत्रे आपल्या हाती ठेवणे शक्य होणार आहे, हे लक्षात घेऊनच प्रमुख पक्ष त्यादृष्टीने हालचाली करीत आहेत. रत्नागिरी नगरपालिकेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला आहे.
सध्या शिंदे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची महायुती असली तरीही प्रभाव शिवसेना-भाजप यांचाच दिसत आहे. युतीमध्ये जागा वाटपात नगराध्यक्षपद शिवसेनेकडे असले तरीही आजपर्यंत उमेदवार जाहीर केलेला नाही. अंतिम निवड पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील असे सांगितले जात आहे. नगरसेवकपदाची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर काहींचे पत्ते कट झाले आहेत. तर महाविकास आघाडीत ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यामध्ये एकमत होत नसल्याचे दिसत आहे.
ठाकरे शिवसेनेकडून नाव निश्चित झाले असून उपनेते बाळ माने यांनी त्यादृष्टीने व्युहरचना करण्यास सुरवातही केली आहे. प्रत्येक प्रभागातील नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना बळ देऊन निवडणूक रिंगणात आणण्याचा माने यांचा प्रयत्न दिसत आहे. प्रत्येक प्रभागातून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मतदान कसे होईल, यादृष्टीने युती, आघाडी यांची जुळणी सुरू आहे. महायुतीकडून नव्या-जुन्या चेहऱ्यांना संधी दिली गेली आहे. तर आघाडीत बहुसंख्य नवे चेहरे दिसणार आहेत.
चौकट
नगराध्यक्षपदाबाबत उत्सुकता
आघाडी, युतीकडून नगराध्यक्ष पदाचे नाव जाहीर झालेले नाही. त्यामुळे रत्नागिरीकरांची उत्सुकता ताणली गेली आहे. बंडखोरी टाळण्यासाठी हे सर्व केले जात असले तरीही तगडा उमेदवार रिंगणात आणतानाच विरोधकांना शह देण्यासाठी युतीकडून काळजी घेतले जात आहे. सोमवारी (ता. १७) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने कोण अर्ज भरणार याकडे लक्ष लागले आहे.

