कुडाळात विविध गीतांमधून संस्कारांची दिशा

कुडाळात विविध गीतांमधून संस्कारांची दिशा

Published on

swt171.jpg
04874
कुडाळः ‘जीवन संगीत’ कार्यक्रम सादर करताना डॉ. संतोष बोराडे व त्यांचे सहकारी नरेंद्र भोईर, प्रीतेश चौधरी. (छायाचित्र ः अजय सावंत)

कुडाळात विविध गीतांमधून संस्कारांची दिशा
‘जीवन संगीत’ कार्यक्रमः बॅ. नाथ पै संस्थेत बालदिनानिमित्त उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १७ः खोपोली येथील डॉ. संतोष बोराडे यांच्या सुरेल आवाजातील निवेदनाच्या साथीने त्यांनी संस्कारहीन होत चाललेल्या बालकांच्या सामाजिक वास्तवावर ‘जीवन संगीत’ कार्यक्रमात विविध गीतांच्या अनोख्या, अर्थपूर्ण थीममधून प्रकाश टाकला. उपस्थित पालकांसहित विद्यार्थ्यांचा त्याला उस्फूर्त, सक्रिय सहभाग लाभला.
संस्कारक्षम शालेय पिढी वाचावी, यासाठी खोपोली येथील डॉ. बोराडे, त्यांचे इंजिनियर असलेले सहकारी प्रीतीश चौधरी, आर्किटेक्चर नरेंद्र भोईर या तिघांनी ‘जीवन संगीत’ नावाचा शालोपयोगी पर्यायाने समाजोपयोगी, देशभक्तिपर संगीतातून जीवन संदेश देणारा एक कार्यक्रम तयार केला. त्याचे सिंधुदुर्गातील पहिले सादरीकरण बालदिनाच्या निमित्ताने येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या पुढाकाराने नुकतेच झाले. हा कार्यक्रम अमेरिका स्थित ज्येष्ठ उद्योजक डॉ. अजित शिरोडकर, उमेश गाळवणकर, चेतन प्रभू, मोहन होडावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला.
विविध परंपरा व भक्तिभावाने परिपूर्ण असलेली संस्कारक्षम गीते आज हिंदीमार्फत आपल्यासमोर कशी विकृतपणे सादर केली जातात, हे अतिशय कलात्मक, हृदयस्पर्शी वैचारिक ठेव्यातून विद्यार्थ्यांसमोर सादर केली. आपल्या अपेक्षांचे ओझे वाहून नेण्यासाठी गीतातून भावना व्यक्त करू नका, तर त्यातून स्वानंद घ्या. संगीतातून संस्कृती जपा, विकृती नको, याची आठवण करून दिली. आपल्या भावना कलेतून सुंदर बनवा. त्याचे बाजारीकरण करू नका. हृदयातून गाताना बुद्धीचा वापर करा आणि त्याचे अनुकरण करा, असा संदेश दिला.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या विषयावर टिप्पणी करताना, जीवन सुंदर आहे. त्याचा आनंद घ्या. क्षुल्लक अपेक्षाभंगातून मृत्यूला कवटाळन नका. देहाला व्यसनाने खोगीर करू नका. पाश्चातिकीकरणाला आधुनिकीकरण समजून त्याचे अंधानुकरण करू नका, असा गीतांच्या सादरीकरणातून त्यांनी विद्यार्थ्यांना संदेश दिला. सर्व विद्यार्थ्यांनी मंत्रमुग्ध होऊन याचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार जोशी यांनी केले.

चौकट
संस्कारमय कार्यक्रम शाळांसाठी लाभदायी
चेअरमन गाळवणकर यांनी, विद्यार्थ्यांवर संस्कार चांगले व्हावे, हा मानस समोर ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करत एक संस्कारक्षम कार्यक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. संतोष बोराडे व टीमचे आभार मानले. विविध शाळांनी विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याच्या या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. ते कार्यक्रम शाळेमध्ये सादर केल्यास आजची पिढी बऱ्याच अंशी बदलू शकते, असा आशावादही व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com