तणावमुक्त परीक्षेसाठी राज्यात वेगळा प्रयोग
विद्यार्थ्यांसाठी तणावमुक्ती उपक्रम
कोकण बोर्ड ; ऑनलाइन सुविधेसह अभ्यासाबाबत मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा या करिअरच्यादृष्टीने महत्त्वाच्या असतात. तसेच यातून विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास व संयमांची आव्हानात्मक पडताळणी होते. अशा वेळी विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, परीक्षेचे नियोजन कसे करावे याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळाने व्याख्यानांद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले. तणावमुक्त परीक्षेसाठी हा राज्यातला आगळावेगळा प्रयोग ठरला आहे.
बारावीच्या लेखी परीक्षा १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणार आहेत आणि प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी २०२६ पासून सुरू होईल. आतापासून विद्यार्थ्यांकडे नियोजनासाठी सुमारे तीन महिन्यांचा महत्त्वपूर्ण कालावधी शिल्लक आहे. या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन केले.
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आणि जिल्हा मुख्याध्यापक संघांच्या संयुक्त विद्यमाने बोर्ड परीक्षेचा राजमार्ग : सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे या कार्यक्रमाचे आयोजन केले. अध्यक्षस्थानी कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर होते. त्यांनी या उपक्रमाचा दूरगामी हेतू स्पष्ट केला तसेच कोकण विभागीय सचिव पुनिता गुरव आणि कोल्हापूर मंडळाचे अधिकारी, रत्नागिरीचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार आणि सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.
ऑनलाइन माध्यमातून झालेल्या कार्यक्रमात मानसतज्ज्ञ कपिल लळीत यांनी विद्यार्थ्यांना तणावाच्या मनःस्थितीचे विश्लेषण केले. अतितणाव किंवा अजिबात तणाव नसणे या दोन्ही स्थिती हानिकारक असून, विद्यार्थ्यांसाठी संतुलित तणाव आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी चार महत्त्वाच्या पद्धतींवर जोर दिला. ८० टक्के उजळणी आणि २० टक्के नवीन अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, पोमोडोरो तंत्र (२५ मिनिटे अभ्यास + ५ मिनिटे ब्रेक), स्पेस रेपिटेशन (ठराविक अंतराने उजळणी) आणि फेनमन तंत्र (शिकलेले लहान मुलांना समजावून सांगणे) सांगितले. रूपेश इराबत्ती (पुणे) यांनीही ‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग’ उपक्रमांतर्गत राज्य व विभागीय मंडळाच्या डिजिटल सुविधांची माहिती दिली.
---
चौकट १
असे करा अभ्यासाचे वेळापत्रक
एकाग्रता वेळ- पहाटे ५ ते ७ ही अभ्यासासाठीची सर्वोत्तम वेळ आहे. परीक्षा सराव- सकाळी ८.३० ते १२.३० या वेळेत घरी बसून उत्तरपत्रिका लेखनाचा सराव करणे आवश्यक आहे जेणेकरून परीक्षेच्या वेळेत पेपर पूर्ण करण्याची सवय लागेल. विश्रांती आणि उजळणी- सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत खेळ आणि रात्री ६.३० ते ८ या वेळेत नियमित उजळणी करावी. लेखनकौशल्ये ः रात्री ९ ते ११ या वेळेत जास्तीत जास्त लेखन सराव करावा. तंत्रज्ञानाचा वापर- रात्री ८.३० ते ९ या वेळेत शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ देण्याचे त्यांनी सुचवले.
--------
कोट
यशस्वी होण्यासाठी सकारात्मक विचार महत्त्वाचे आहेत. ‘माझे मूल्य माझ्या गुणांवरून ठरत नाही,’ हे समजून घेऊन तयारी करावी आणि आठवण्यासाठी युक्त्यांचा वापर करावा. डोकेदुखी, धाप लागणे (शारीरिक बदल), अभ्यास टाळणे, मोबाईल/गेम्समध्ये वेळ घालवणे, घुमेपणाने बसणे (वागण्यातील बदल) या लक्षणांवर त्वरित नियंत्रण मिळवा.
--वैभव उमरदंड, अधिकारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

