गावराईवासियांचे सत्याच्या बाजूने मतदान
swt175.jpg
04908
गावराई ः आमदार नीलेश राणे यांचा ग्रामस्थांतर्फे भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजय आंग्रे, सरपंच सोनल शिरोडकर व इतर मान्यवर.
गावराईवासियांचे सत्याच्या बाजूने मतदान
नीलेश राणे ः विकासासाठी भरघोस निधी देणार
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १७ ः गावराई सरपंच सोनल शिरोडकर यांच्यावरील चुकीच्या पद्धतीने आणि स्वार्थ बुद्धीने सदस्यांनी घातलेला अविश्वास ठराव मतदार ग्रामस्थांनी फेटाळून लावत महिला सरपंचाचा सन्मान राखला आहे. ग्रामस्थांनी सत्याच्या बाजूने मतदान केले. यापुढेही सरपंचांच्या व शिंदे शिवसेनेच्या पाठीशी राहून गावराई गावचा सर्वांगीण विकास करून घ्या. त्यासाठी कुठेही निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन आमदार नीलेश राणे यांनी विजयोत्सव कार्यक्रमात केले.
कुडाळ तालुक्यातील गावराई ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच शिरोडकर यांच्यावर उपसरपंचांसह सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. यासाठी प्रशासनाच्या वतीने विशेष ग्रामसभा घेऊन मतदान प्रक्रिया घेतली होती. यामध्ये गावराई ग्रामस्थांनी सरपंचांवरील अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान करून त्यांचे पद अबाधित ठेवले. यानिमित्त गावराई गडकरवाडी येथील मैदानावर ग्रामस्थ व शिंदे शिवसेनेच्या वतीने रविवारी (ता. १६) विजयोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार राणे बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना नेते संजय आंग्रे, कुडाळ तालुका प्रमुख विनायक राणे, संजय पडते, कसाल सरपंच राजन परब, रानबांबुळी सरपंच परशुराम परब, मालवण तालुका युवा सेना प्रमुख स्वप्नील गावडे, सरपंच शिरोडकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार राणे म्हणाले, "सरपंच शिरोडकर यांच्यावरील अविश्वास ठराव फेटाळून लावत ग्रामस्थांनी सत्याच्या बाजूने मतदान केले. असे सर्व मतदार ग्रामस्थ कौतुकास पात्र आहेत. यापुढेही सरपंचांच्या पाठीशी राहून गावचा विकास करून घ्या. गावच्या विकासासाठी कुठेही निधीची कमतरता भासू देणार नाही. अशीच एकजूट दाखवून गावच्या विकासात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे."
जिल्हाप्रमुख सामंत, संजय पडते, संजय आंग्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गावराई ग्रामस्थांचे कौतुक केले. यापुढेही गावाच्या विकासासाठी शिंदे सेनेच्या व सरपंचांच्या पाठीशी राहून साथ द्या. आम्ही येथील विकासात कुठेही कमी पडणार नाही, असे सांगितले.
विजयोत्सव कार्यक्रमानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये होम मिनिस्टर, गजा नृत्य, दशावतारी नाटक असे कार्यक्रम पार पडले. नवनियुक्त शिवसेना शाखाप्रमुख सिद्धेश राऊत, महिला सेना शाखाप्रमुख अक्षता राणे, युवा सेना शाखाप्रमुख सचिन कदम, युवती सेना शाखाप्रमुख प्रांजल राऊत यांना आमदार राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देत त्यांचे स्वागत केले. होम मिनिस्टर स्पर्धेतील विजेत्या वैभवी शेलटकर, उपविजेत्या अन्वी राऊत तसेच तृप्ती कदम, शीतल राऊत, समीक्षा गावडे यांना आमदार राणे यांच्या हस्ते पैठणी देत सन्मानित केले.

