तगड्या उमेदवारांमुळे तिरंगी चुरस

तगड्या उमेदवारांमुळे तिरंगी चुरस

Published on

निवडणूक पानासाठी (प्रभागाचे अंतरंग - भाग ६)

तगड्या उमेदवारांमुळे पचरंगी लढत
सावंतवाडी पालिका प्रभाग ६ः अंतर्गत नाराजी थोपवण्याचे आव्हान
रूपेश हिराप ः सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ ः येथील पालिकेच्या निवडणुकीत प्रभाग सहामध्ये पचरंगी लढतीची शक्यता आहे. चार प्रमुख पक्षांनी जनसंपर्क असलेले आणि सामाजिक कार्यात पुढे असणारे उमेदवार दिले आहेत. यामुळे ही लढत आणखी रंगतदार बनली आहे.
या ठिकाणी शिंदे शिवसेनेकडून दुर्गेश ऊर्फ देव्या सूर्याजी, महिला उमेदवारांमधून माजी नगरसेविका शर्वरी धारगळकर यांना संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे भाजपकडून अमित गवंडळकर, तर महिला उमेदवारांमधून मेघा भोगटे यांना रिंगणात उतरण्यात आले आहे. ठाकरे गटाकडून शहरप्रमुख शैलेश गवंडळकर हे रिंगणात आहे. त्यांच्या सोबतीला तेजल कोरगावकरला संधी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून अरुण भिसे, तर महिला उमेदवारांमधून साक्षी वंजारी यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी दाखल केली आहे. शिंदे शिवसेनेचे इच्छुक उमेदवार अर्जित पोकळे यांनीही अपक्ष उमेदवारी भरल्याने प्रभाग सहाची लढत लक्षात घेता या ठिकाणी सर्वच उमेदवारांमध्ये कडवी झुंज होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रभाग ६ मध्ये सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे. त्या ठिकाणी १५२९ एवढे मतदार आहेत. त्यापैकी एक हजार एवढे मतदान होण्याची शक्यता आहे. मतांची गोळाबेरीज लक्षात घेता तिरंगी लढतीमध्ये मोठ्या प्रमाणात मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी शिंदे शिवसेनेमधून उमेदवारी मिळालेल्या देव्या सूर्याजी यांचा जनसंपर्क चांगला आहे; मात्र या पक्षातून इच्छुक असलेले अर्चित पोकळे यांना उमेदवारी न मिळाल्याच्या नाराजीचा सामना त्यांना करावा लागणार आहे. पोकळे यांनी आज अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने ते प्रभाग सहामधून रिंगणात उतरले आहेत. दुसरीकडे भाजपमधूनही केतन आजगावकर हे या प्रभागातून इच्छुक होते; मात्र येथून अमित गवंडळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ठाकरे शिवसेनेकडून रिंगणात उतरवण्यात आलेले शहर अध्यक्ष गवंडळकर यांनी मागच्या निवडणुकीतही चांगली मते घेतली होती. यावेळीसुद्धा ते या ठिकाणी कडवे झुंज देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्या सोबतीला माजी नगरसेवक उमेश कोरगावकर यांची कन्या सेजल कोरगावकर या रिंगणात आहेत. नवा युवा चेहरा आणि श्री. कोरगावकर यांचा राजकीय अनुभव व जनसंपर्काचा त्यांना फायदा होणार आहे, तर दुसरीकडे काँग्रेसनेही या प्रभागांमध्ये अरुण भिसे यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या साक्षी वंजारी यांनीही नगरसेवक पदासाठी येथे उमेदवार दाखल केले आहेत. साक्षी वंजारी या राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष आहे त्यांचा महिलांमध्ये जनसंपर्क चांगला आहे, त्याचा फायदा या ठिकाणी काँग्रेसला होण्याची शक्यता आहे.
एकूणच येथे पचरंगी आणि चुरशीची लढत आहे. भाजप आणि शिंदे शिवसेना प्रचारामध्ये नेमकी कोणती रणनीती आखतात यावर या ठिकाणचे गणित जुळणार आहे. नाराज असलेल्यांची मने वळवण्यामध्ये प्रत्येक पक्ष यशस्वी झाल्यास या ठिकाणी वेगळा निकाल लागू शकतो.

चौकट
३५० मतेही ठरणार निर्णायक
प्रभाग ६ मध्ये जुना बाजार अर्धा भाग, होळीचा खुंट, चॅपेल गल्ली, मच्छी मार्केट परिसर, निंबाळकर पीर, संचयनी परिसर, गांधी चौक परिसर गणेश मंदिर परिसर असा भाग आला आहे. जुन्या प्रभाग रचनेतून माठेवाडा हा भाग वगळण्यात आला असल्याने त्याचा काहीच फटका उमेदवारांना बसू शकतो. एकूण मतदान आणि होणारे मतदान लक्षात घेता जवळपास ३५० ते ४०० मते मिळवणारा उमेदवार या ठिकाणी विजयी ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com