चाकावरच्या दवाखान्याचा रुग्णांना आरोग्य आधार

चाकावरच्या दवाखान्याचा रुग्णांना आरोग्य आधार

Published on

swt177.jpg
04916
फिरत्या दवाखान्याची गाडी

swt178.jpg
04917
डॉ. प्रविण कुमार ठाकरे


फिरत्या दवाखान्याचा रुग्णांना आरोग्य आधार
सह्याद्रीच्या रांगांमध्ये उपक्रमः वर्षभरात ८१७४ जणांची मोफत सेवा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ ः ‘रुग्ण सेवा, हीच ईश्वर सेवा’ या भावनेतून मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई आणि सिंधू मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेचा फिरता दवाखाना तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यातील दुर्गम अशा आठ गावांमध्ये गेले वर्षभर कार्यरत आहे. सावंतवाडीच्या सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून वर्षभरात ८१७४ रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली. त्यामुळे हा फिरता दवाखाना या आठ गावांमध्ये आरोग्य सेवेचा आधारस्तंभ ठरला आहे. आरोग्य असुविधांनी बेजार सिंधुदुर्गासाठी हा उपक्रम दिशादर्शक ठरत आहे.
सिंधुदुर्ग आरोग्य सुविधांसाठी गोव्यावर अवलंबून आहे. रुग्णालये आहेत, पण त्यात सुविधा नाहीत, अशी स्थिती आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये याचा सर्वाधिक फटका बसतो. अगदी प्राथमिक आरोग्य सुविधांची गरज भागणेही कठीण बनते. अशा स्थितीत फिरता दवाखाना ही संकल्पना दिशादर्शन ठरत आहे. गेल्या वर्षभरात सह्याद्रीच्या दुर्गम गावांमध्ये त्यांनी दिलेली मोफत वैद्यकीय सुविधा कित्येक रुग्णांना दिलासा देणारी ठरली.
समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो नव्हे ती आपली जबाबदारी आहे या सामाजिक जाणिवेतून योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई ही संस्था कार्यरत आहे. या सेवाभावी संस्थेच्यावतीने गेल्या दोन वर्षांपासून अनेक उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत.
समाजातील खऱ्याखुऱ्या गरजवंतांचा शोध घेऊन ही मदत केली जात असल्यामुळे संस्थेची ही मदत खऱ्या अर्थाने सार्थकी लागते. योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई या संस्थेचे संस्थापक व मार्गदर्शक मास्टर चोआ कॉक सुई होते. त्यांच्या नावे हा फिरता दवाखाना कार्यरत आहे. या फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण एक वर्षांपूर्वी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याहस्ते करण्यात आले होते. या फिरत्या दवाखान्यात दाणोली पंचक्रोशीतील फणसवडे, केसरी, दाणोली, पारपोली, देवसू, ओवळीये या गावांसह आंबेगाव, कुणकेरी या दुर्गम भागात रुग्णांची मोफत तपासणी करुन औषधे देण्यात येतात. या दवाखान्याच्या गाडीतच रूग्णांची तपासणी करण्यात येते. त्यादृष्टीने या गाडीत हात धुण्यासाठी बेसिन, रुग्ण तपासणीसाठी बेड, रुग्ण बसण्यासाठी बेंच, औषध विभाग, डॉक्टर व नर्स यांच्यासाठी आसन अशी व्यवस्था आहे.
वर्षभरात याच्या माध्यमातून फणसवडे ७४७, केसरी १११७, दाणोली ६६०, पारपोली १५०७, देवसु ४५८, ओवळीये ११०२, आंबेगाव १२८५, कुणकेरी १२९८ अशा एकूण ८१७४ रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली. यात ६९५ रुग्णांची डायबिटीस तपासणी करण्यात आली आहे. हा फिरता दवाखाना दररोज सकाळी ८ वाजता सावंतवाडीतून सुटल्यानंतर दोन गावे करून दुपारी १ च्या सुमारास सावंतवाडीत येतो. या आठही गावांत आठवड्यातून दोन वेळा जातो. दर रविवार आणि महत्त्वाचे सण वगळता हा फिरता दवाखाना रुग्णांना सेवा देत आहे. यात डॉ. स्वप्नील परब, परिचारिका श्वेता सावळ यांच्यासह कार्यालयीन लिपिक वेदा गुरव व गाडीचे चालक सुहास धुरी इतक्या जणांची टीम ही सेवा देत आहे.
ग्रामीण भागातील अनेक गावांसाठी आरोग्य सेवा अजूनही दूर आणि महागडी आहे. अशा परिस्थितीत या फिरत्या दवाखान्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून गावातच आरोग्य सेवा उपलब्ध झाली आहे. यापूर्वी आजारावरील उपचारांसाठी तालुक्याच्या गावी जावे लागत होते. त्यात प्रवासासह वेळ आणि पैसा खर्च व्हायचा, परंतु आता हा फिरता दवाखाना गावातच येत असल्यामुळे वेळीच उपचार होतात. त्यात कित्येक गोरगरीब रुग्णांना तपासणीसह औषधांचा खर्च परवडत नव्हता. मात्र या फिरत्या दवाखान्यातून तपासणीसह औषधेही मोफत मिळत असल्यामुळे त्यांचा मोठा आर्थिक भार कमी झाला आहे.

चौकट
मोफत सेवेचा रुग्णांना आधार
सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रवीणकुमार ठाकरे आणि त्यांचे सहकारी या प्रतिष्ठानच्या स्थापनेपासूनच गेली २० वर्षे जनसामान्यांच्या सेवेचे व्रत जोपासत आहेत. नि:स्वार्थी भावनेने सावंतवाडी शहरासह ग्रामीण ते अति दुर्गम भागात सातत्याने आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक उपक्रम राबवतात. तसेच आपल्या परिचयाच्या अनेक स्वयंसेवी संस्थांच्या विविध उपक्रमाचा लाभ ते गरजवंतांना मिळवुन देतात. याच समाजसेवेतील पुढचे पाऊल म्हणून या प्रतिष्ठानने योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ ऑफ मुंबई या संस्थेच्या सहकार्याने ‘ग्रैंड मास्टर चोआ कॉक् सुई फिरते वैद्यकीय पथक’ दुर्गम भागासाठी सुरू केले आहे. मुंबईतील ही संस्था डॉ. ठाकरे यांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासुन जिल्ह्यात कार्यरत आहे.

कोट
मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई आणि सिंधू मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने ''रुग्ण सेवा, हीच ईश्वर सेवा'' हे व्रत जोपासत दुर्गम भागात घरोघरी जाऊन घेत असलेली रुग्णसेवा खरोखरच कौतुकास्पद आणि जनतेसाठी आवश्यक अशी आहे. या एकट्या दवाखान्यातून आंबेगावमधील अनेक ग्रामस्थांनी लाभ घेतला आहे. अनेकांचा यामुळे वेळ आणि पैसा वाचला असून मिळणाऱ्या उपचाराच्या फायदाही ग्रामस्थांच्या मिळत आहे. खरोखरच ही सेवा जनतेसाठी लाभदायी आहे.
- शिवाजी सावंत, सरपंच, आंबेगाव

कोट
सिंधू मित्र सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई या संस्थेकडून गावोगावी दाखल होत दुर्गम भागातील जनतेसाठी आरोग्याच्या दृष्टीने चालवलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. कुणकेरीसारख्या ग्रामीण भागातील जनतेला तेथील गर्भवती महिला, वृध्द महिला, शालेय विद्यार्थिनी व आजारी ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला. या फिरत्या दवाखान्यातील उपचारामुळे अनेकांचे आजार बरे झाले. त्यांनी हा उपक्रम यापुढेही असाच सुरू ठेवावा.
- सोनिया सावंत, सरपंच, कुणकेरी

कोट
फिरत्या दवाखान्याचा गावातील ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. यामुळे गावातील ग्रामस्थांचा वेळ आणि पैसा वाचत असून अॅलोपॅथिक औषधांचा वापर न करता होमिओपॅथी औषधांचा वापर दवाखान्यामध्ये जास्त व्हावा, अशी माझी अपेक्षा आहे. सध्या देत असलेली सेवा खरोखरच सेवाभावी आहे. सिंधू मित्र सेवा फाऊंडेशनचे भूमिका यामध्ये महत्त्वाची आहे.
- कृष्णा नाईक, सरपंच, पारपोली


चौकट

उपचार मिळालेले रुग्ण
फणसवडे - ७४७
केसरी - १११७
दाणोली - ६६०
पारपोली - १५०७
देवसु - ४५८
ओवळीये - ११०२
आंबेगाव - १२८५
कुणकेरी - १२९८
----------
एकूण - ८१७४
----------
६९५ जणांची मधुमेह (डायबिटीस) तपासणी
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com