-रत्नागिरीत महायुती, महाविकास आघाडीत राजकीय स्फोट
रत्नागिरीत महायुती, आघाडीत राजकीय स्फोट
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पडले बाहेर; एकत्र येऊन नगराध्यक्ष, अन्य जागा लढणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी रत्नागिरीत जोरदार राजकीय स्फोट झाला. नाराजांच्या उमेदवारीसाठी इकडून तिकडे उड्या सुरू झाल्या आहेत. महायुतीने राजकीय बांधणी करत अंतर्गत कुरघोड्यांना लगाम घालण्याचा चांगला प्रयत्न केला. तरीही महायुती आणि महाविकास आघाडीत मोठी बिघाडी झाली आहे. दोन्ही पक्षातील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट बाहेर पडले आहेत. ते एकत्र येऊन नगराध्यक्षपदासह अन्य जागा लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाविकास आघाडीतील एकमत महायुतीला भारी पडणार, अशी सुरुवातीची परिस्थिती होती. महायुतीमधील वाद उघड उघड दिसत होते; परंतु त्यावर महायुतीतील दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी समेट घडवून आणत महायुती अजून मजबूत केली. शक्तीप्रदर्शन करत भरण्यात आलेले उमेदवारी अर्ज हे त्याचे द्योतक आहे. ९८ टक्केच्या दरम्यान महायुतीचे उमेदवार अर्ज भरून झाले. महायुती प्रचाराला लागली. नगराध्यक्षपदासह आज उर्वरित दोन उमेदवार अर्ज भरून महायुती या निवडणुकीत सरस ठरली आहे; परंतु महाविकास आघाडीचे मोठे त्रांगडे झाले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते बाळ माने पक्षातील काही ठराविक पदाधिकाऱ्यांना घेऊन वेगळ्या पद्धतीने प्रचार करत आहेत. यामध्ये महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस यांना कुठेही सामावून घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपल्या पद्धतीने विभक्त प्रचार करताना दिसत आहेत. महायुतीतील ही बिघाडी निवडणुकांसाठी अडचणीची ठरणार आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला डावलले जात असल्याने दोन्ही पक्षातील गट युती आणि आघाडीतून बाहेर पडले आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बशीर मुर्तुझा यांनी गटातटाला कंटाळून गटाने आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मुर्तुजा नगराध्यक्षपदासाठी आपल्या पत्नीला रिंगणात उतरवणार आहेत. युतीमधील अजित पवार गटानेदेखील बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. बंटी वणजूंसह मुर्तुजा एकत्र येऊन हा गट पालिकेच्या निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरे जाणार आहे. जागावाटपावरून आणि वारंवार डावलल्यामुळे आपण हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे रत्नागिरीतील राजकारणात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत.
---
कोट
विधानसभा निवडणुकीला आम्ही बाळ मानेंच्या पाठीशी ठाम उभे होतो. त्यामुळे आता पालिकेच्या निवडणुकीला आम्हाला उमेदवारी मिळणे अपेक्षित होते; परंतु आमच्यातील काही लोक विकले गेल्यामुळे आम्ही उमेदवारी मिळवण्यास कमी पडलो. गटबाजीला आम्ही कंटाळलो आहोत. त्यामुळे यातून बाहेर पडत आहोत. आम्ही अजित पवार गटासह नगराध्यक्षपदासह स्वतंत्र उमेदवार देणार.
-बशीर मुर्तुजा, राष्ट्रवादीचे नेते, रत्नागिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

