फ्लॅशबॅक
फ्लॅशबॅक----------लोगो
-rat१७p१६.jpg-
२५O०४९५१
चिपळूण ः चिपळुणातील जुनी बाजारपेठ.
----
चिपळूणची १४८ वर्षातील वाटचाल--------भाग १
चिपळूण पालिकेला १४८ वर्षाचा इतिहास आहे. पालिकेच्या निर्मितीपासून आतापर्यंत यशापयशाचे अनेक टप्पे आहेत. दीडशे वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या चिपळूण पालिकेचा गौरवसंपन्न इतिहास होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने मांडण्यात आला आहे.
- मुझफ्फर खान, चिपळूण
---
व्यापारावरील ‘टर्मिनल टॅक्स’
होते उत्पन्नाचे साधन
चिपळूण पालिकेची स्थापना १६ डिसेंबर १८७६ रोजी म्हणजेच १४८ वर्षांपूर्वी झाली. ब्रिटिश राजवटीत शहरांचा नियोजनपूर्वक विकास व्हावा यासाठी ही व्यवस्था तत्कालीन राजवटीने सुरू केली. अर्थात, तेव्हाचे सुमारे दीडशे वर्षापूर्वीचे चिपळूणचे स्वरूप आजच्या वाढीवमानाने फारच बाल्यावस्थेत होते. तरीही रत्नागिरी शहराच्या खालोखाल चिपळूण शहर होते. ते आजही आहे. तेव्हा दहा हजार लोकवस्ती होती. आता ती पंचाहत्तर हजारांवर गेली आहे. मागील कालावधीत नगरपालिकेमध्ये अनेकविध बदल घडले. काही संकटेही आली. राजकीय उलथापालथीही झाल्या. हद्दवाढ करण्यात आली. तशी काही वस्ती बाहेरही काढली गेली. शहरातून दुसऱ्या गावात समाविष्ट केली गेली. पालिकेला रंगोपंत नाना पत्की यांच्या रूपाने पहिले अध्यक्ष मिळाले. ते चिपळूणमधील त्या वेळचे मोठे शेतकरी व जमीनदार होते. त्यांचे घर बेंदरकर आळीत होते. त्यानंतर आजतागायत अनेक मान्यवरांना हा मान मिळाला. प्रत्येक अध्यक्षांनी तसेच निवडून व स्वीकृत सदस्यांनीही आपापल्या कामांमधे छाप पाडली आणि चिपळूण शहराच्या सर्वांगीण विकासाला मोलाचा हातभार लावला आहे.
नगरपालिकेची १८७६ ला स्थापना करण्यात आली. त्या वेळी पवन तलाव पूर्वेला, दक्षिणेस पागनाका, उत्तरेला पेठमाप, पश्चिमेस गोवळकोट धक्का, या परिघामध्ये ही हद्द होती. चिपळूण बाजारपेठ, उतारपेठ म्हणून साऱ्या देशभर प्रसिद्ध होती. घाटावरून बैलगाड्यांतून घाटीमाल येत असे आणि इकडून कौले, मीठ, मसाले वगैरे माल घाटावर जात असे. चिपळूण बंदर म्हणून नावारूपास होते. त्या वेळच्या काही मोठ्या व्यापाऱ्यांची गलबते गोवळकोटच्या खाडीत येत होती तसेच बाजारात झापांच्या मांडवात पावसाळ्यानंतर मोठ्या प्रमाणात व्यापार आणि उलाढाल होत असे. त्यावर पालिकेला टर्मिनल टॅक्स मिळत असे. घरपट्टीचा करही असायचा. या उत्पन्नावर पालिकेचा कारभार चालायचा. तेव्हा शासकीय आर्थिक मदत मिळत नव्हती. पालिकेनेच कर गोळा करायचा आणि त्यावर कारभार हाकायचा, असा नारा होता. त्यामुळे तेव्हा अक्षरशः तारेवरची कसरत असायची. त्यातच वारंवार पटकी, प्लेग इत्यादी साथी पसरायच्या, पाणी भरायचे, अशी संकटे होतीच. तरीही नगरपालिका तग धरून होती. सुरुवातीस स्व. डिंगणकर वकील यांचे घर नगरपालिका कार्यालय होते. त्यानंतर जुना भैरी देवस्थानासमोर अर्धा भाग कन्याशाळा व अर्धा भाग नगरपालिका, अशी इमारत बांधण्यात आली. शेजारी छोटा दवाखाना सुरू करण्यात आला. १९६०च्या दशकामध्ये स्व. बाळासाहेब सावंत यांच्यासारखे लोकप्रतिनिधी विधानसभेत निवडून आले. त्यांच्या पुढाकाराने खेर्डीची नळपाणी योजना, औद्योगिक वसाहत, बुरूमतळी येथे एसटी स्टॅण्ड, डॉ. दातार महाविद्यालय, चिपळूण शहराची मार्कंडीमठापासून बहादूरशेख, रावतळे, मतेवाडी, ओझरवाडी, काविळतळी, गांधीनगर, शंकरवाडी परिसरात हद्दवाढ करण्यात आली तसेच कॉलेजच्या महाराष्ट्र टाईम्स हॉलकरिता तत्कालीन केंद्रियमंत्री स्व. स. का. पाटील यांच्या मार्गदर्शनाने काही रक्कम आली. १९६८च्या अगोदर कापसाळ फणसवाडी येथे शिवनदीवर धरण बांधून ते जलवाहिनीद्वारे चिपळूणमध्ये आणले जायचे. खेर्डीची पाणीयोजना कार्यान्वित झाल्यावर मात्र हे धरण वापरात न आणल्याने अक्षरशः गाळात रुतले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

