‘शेती वाचवा, शेतकरी जगवा’

‘शेती वाचवा, शेतकरी जगवा’

Published on

05087

‘शेती वाचवा, शेतकरी जगवा’

लोकाधिकार समिती ः शेतकऱ्यांना न्यायासाठी सावंतवाडीत स्वाक्षरी मोहीम

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ ः ‘शेती वाचवा, शेतकरी जगवा’ असा नारा देत महाराष्ट्र लोकाधिकार समितीकडून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. येथील बसस्थानकासमोर त्यांनी ही मोहीम राबवली असून जंगली प्राण्यांचा उच्छाद संपवण्यासाठी पुढाकार घ्या, वन्य प्राण्यांमुळे शेतातील पिकांचे होणारे नुकसान थांबवा, अशी मागणी संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर यांनी केली आहे‌. लोकप्रतिनिधी, शासनाला या गोष्टीची जाणीव आहे. त्यांनी यात लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

श्री. करंदीकर म्हणाले, ‘आपल्या देशात शेती हा मुख्य व्यवसाय असून बहुसंख्य जनतेचे उत्पन्न त्यावर अवलंबून आहे; मात्र, काही वर्षांत वन्य प्राण्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गवे, हत्ती, माकडे, रानडुक्कर या वन्य प्राण्यांमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे शेती आणि बागायती व्यवसाय पूर्णतः धोक्यात आला आहे. हाता-तोंडाशी आलेली पिके वन्य प्राणी तुडवून नासधूस करतात. माकडांची टोळकी फळे, भाज्या नष्ट करतात. जुन्नुरसारख्या ठिकाणी तर बिबटे नरभक्षक झाल्याने नवे संकट उभे राहिले आहे. तेथे सुरक्षितता उरली नसून इतर ठिकाणीही तसे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.’

ते पुढे म्हणाले, ‘वन्यजीवांचे संरक्षण महत्त्वाचे असले तरी शेतकऱ्याला वाचवणे आणि त्याला जगवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यातील किचकट तरतुदीमुळे शेतकऱ्यांना काहीच उपाय करता येत नाहीत. त्यांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. शेतकरी वाचला तरच देश वाचेल म्हणून जंगली जनावरांच्या त्रासावर तातडीने ठोस उपाययोजना होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सरकारने तातडीने भरपाईची प्रक्रिया सुलभा करावी. सोलर फेंसिंग जाळी व इतर संरक्षणात्मक साधनांसाठी तरतूद करावी अथवा त्यासाठी अनुदान द्यावे. वनखात्याच्या पथकांना तातडीने घटनास्थळी पाठवण्याची यंत्रणा उभी करावी. स्थानिक ग्रामपंचायती, वनविभाग आणि नागरिकांची समिती नेमुन शेतकरी आणि वन्यप्राणी यांच्यातील संतुलन राखण्यासाठी उपाययोजना करावी. त्यातून मजबुत सौर, विद्युत कुंपण व्यवस्था, वन्य प्राण्यांच्या हालचालीचे वैज्ञानिक मॅपिंग, जलस्त्रोत व अन्नाचे क्षेत्र नियोजन आदी उपाय तातडीने व प्रभावीपणे राबवले जाणे आजची गरज आहे.’ जिल्हाध्यक्ष दीपक कुडाळकर, विवेक नाईक, संजय पवार, प्रसाद नाईक उपस्थित होते.
--------------
शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी पुढे या!
शाश्वत उपायांच्या दिशेने वाटचाल व्हावी, यासाठी आम्ही शेतकऱ्यांसोबत पूर्ण ताकदीने उभे राहणार आहोत. शेतकऱ्यांना जगवण्यासाठी जे-जे काही करावे लागेल ते करणार आहोत. सर्वांच्या साथीने या संकटावर मात करू, अन्नदात्या शेतकऱ्याला आणि त्याच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी पुढे या, असे आवाहनही यावेळी महाराष्ट्र लोकाधिकार समितीकडून करण्यात आले.

Marathi News Esakal
www.esakal.com