दिव्यांग संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र बंधनकारक
दिव्यांग संस्थांना नोंदणी
प्रमाणपत्र बंधनकारक
सिंधुदुर्गनगरी, ता. १८ ः दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम-२०१६ मधील तरतुदीच्या अनुषंगाने संस्थांना दिलेले नोंदणी प्रमाणपत्र व त्यांचे नूतनीकरण करून घेणे बंधनकारक असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, ज्या संस्था दिव्यांग क्षेत्रात कार्यरत आहेत; मात्र त्यांचे नोंदणी प्रमाणपत्र घेतले नाही अथवा घेतले असल्यास अद्ययावत केले नाही, अशा अनोंदणीकृत कार्यरत संस्थांनी तत्काळ नोंदणी करून घ्यावी. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी (जिल्हा परिषद) यांच्या कार्यालयात आपल्या नोंदणीकृत संस्थेचे प्रमाणपत्र सादर करावे. नोंदणीकृत व अनोंदणीकृत संस्थांची माहिती तत्काळ सादर करण्याबाबत सर्व प्रादेशिक उपायुक्त व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. जिल्ह्यातील नोंदणी प्रमाणपत्र वैध असलेल्या व नसलेल्या संस्थांची माहिती एकत्रित करून आयुक्तालयास तत्काळ सादर करावयाची आहे. याबाबतची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकाऱ्यांकडे संस्थेकडून आली नाही. संस्थेचे नाव अनोंदणीकृत संस्थांच्या यादीत आले तर त्यास संबंधित संस्था व्यवस्थापकांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी निर्देश दिले आहेत.

