थंडीचा कडाका, पालवीसह मोहोराने बहरू लागल्या बागा
05106
05105
नांदगाव ः परिसरातील काजू बागांना पालवी फुटली असून काही ठिकाणी काजू मोहोरही दिसू लागला आहे.
थंडीचा कडाका, पालवीसह मोहोराने बहरू लागल्या बागा
काजू बागायतदार आनंदी; जिल्ह्यात भरघोस उत्पादनाची आशा
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. १८ ः ‘तुलसी विवाह’नंतर जिल्ह्यात पडलेल्या थंडीमुळे काजू बागांना नवी पालवी फुटू लागली आहे. काही ठिकाणी मोहोरही दिसू लागला असून यामुळे काजू बागायतदारांच्या आशा पुन्हा उजळल्या आहेत. मात्र, पुढील काळातही निसर्गाने अशीच कृपादृष्टी ठेवावी, अशी सर्व बागायतदारांची मनोकामना आहे.
गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या अनिश्चित लहरीपणामुळे सर्व प्रकारची शेती अडचणीत सापडली आहे. सिंधुदुर्गातील शेतकरी, विशेषतः बागायती शेती करणारे, अनेक संकटांचा सामना करत आहेत. भातशेतीच्या तुलनेत बागायती शेतीचा खर्च जास्त असतो. कुटुंबासह मेहनत घेऊन बागांत मोहोर येऊ लागला की बागायतदारांच्या आशा फुलतात; मात्र, अचानक झालेल्या पावसामुळे मोहोरासह शेतकऱ्यांची स्वप्नेही कोमेजून जातात. मोहोरानंतर फुलधारी दिसू लागली तर दाट धुके, खार किंवा वादळी वाऱ्यांमुळे गळती वाढते आणि एका तासात वर्षभराचा प्रयत्न पाण्यात जातो. नुकसान भरपाईत औषधांचा खर्चही निघत नाही, अशी शेतकऱ्यांची व्यथा आहे. यावर्षी पावसाने भात, नाचणी आणि इतर पावसाळी पिकांचेही मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी भातपिकाला गोट्यांवरच कोंब आले, चिखलातून पीक बाहेर काढताना शेतकऱ्यांची प्रचंड दमछाक झाली. माकडांचा वाढता उपद्रव हा शेतकऱ्यांसाठी आणखी एक डोकेदुखी बनला आहे. अनेक गावांत माकडांनी भाजीपाला आणि पिके उद्ध्वस्त केल्याने शेतकऱ्यांना शेती सोडण्याची वेळ आली आहे. त्यातच गवे, हत्ती यांचे हल्लेही वाढले आहेत. या सर्व कारणांमुळे शेतकरी हळूहळू शेतीपासून दूर जात असून पर्यायी रोजगाराच्या शोधात दिसतात.
-----------
निसर्गाची साथ मिळो
बागायती शेतीने आशा दाखवली असली तरी वातावरणातील बदलाने त्यातही अडचणी वाढल्या आहेत. यावर्षी तरी निसर्गाने साथ देऊन काजू बागायतदारांना भरघोस उत्पादन मिळावे, अशी अपेक्षा आहे.
-----------
कोट
05128
काजू बागेतील झाडांना यावर्षी हापूसच्या तुलनेत चांगली पालवी फुटली आहे. मोहोरही चांगला येत आहे. यापुढील कालावधी अत्यंत महत्त्वाचा असून पुढील वातावरण असेच पोषक राहिल्यास काजू उत्पादन चांगले येईल.
- बापू फाटक, काजू बागायतदार, आयनल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
