खेड शहर अडकले वाहतूक कोंडीत

खेड शहर अडकले वाहतूक कोंडीत

Published on

-rat१८p१५.jpg-
२५O०५१४३
खेड ः शहरातील खेडहून दापोलीकडे जाणारा अरुंद रस्ता.
---
खेड शहर अडकले वाहतूक कोंडीत
एकदिशा मार्ग योजनेचा बोजवारा; अंमलबजावणी कागदावरच, जनजागृतीचा गाजावाजा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १८ : शहराचा झपाट्याने वाढणारा विस्तार, वाहनांची वाढती संख्या व अरुंद रस्ते यामुळे खेड शहरातील बाजारपेठ वाहतूक कोंडीचे केंद्रबिंदू बनली आहे. या समस्येवर उपाय म्हणून एकदिशा मार्गाची योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र, या योजनेची अंमलबजावणी कागदावरच राहिल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.
दिशादर्शक फलक, सूचनाबोर्ड आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जनजागृतीचा गाजावाजा झाला; मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र अद्यापही कागदावरच असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. शहरातील दुचाकी, चारचाकी तसेच रिक्षांची मोठी वाढ झाल्याने बाजारपेठ परिसर दिवसेंदिवस गजबजलेला असतो. त्यात रस्त्यांवरील अतिक्रमण हा कोंडीचा मोठा अडथळा ठरत आहे. काही परप्रांतीय तसेच स्थानिक व्यावसायिकांनी दुकानांसमोर रस्त्यालगतच जागा व्यापल्याने वाहनांची मुभा कमी होत आहे. पादचारी, विद्यार्थी आणि महिला यांची हालचालदेखील धोकादायक बनली आहे. सतत होणाऱ्या गर्दीमुळे अपघातांचा धोका वाढत असून, नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
नगरपालिकेने सात महिन्यांपूर्वी एकदिशा मार्गाचा आराखडा जाहीर करून फलक लावले होते. स्वयंसेवी संस्थांची मदत घेत ही मोहीम गाजावाजा करून सुरू करण्यात आली; मात्र सात महिने उलटूनही अंमलबजावणी प्रत्यक्षात उतरलेली नाही. फलक दिसतात; पण त्या आधारे वाहतुकीत सुधारणा झाल्याचे दिसत नाही. काही वाहनचालक नियमांची पायमल्ली करताना दिसतात तर पोलिस आणि प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव स्पष्ट जाणवतो. वाहनतळाची व्यवस्था करणे ही नगरपालिकेची जबाबदारी असूनही त्याकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष झाल्याने कोंडीचा प्रश्‍न अधिकच चिघळत आहे. उलट पोलिस यंत्रणेवर दोषारोप करून प्रशासन स्वतःची जबाबदारी झटकत असल्याचे नागरिकांचे मत आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येला अनुसरून वाहतूक व्यवस्थेत बदल करणे अत्यावश्यक झाले असताना एकदिशा योजनेची अंमलबजावणी ठप्प आहे. त्यामुळे ही योजना प्रत्यक्षात उतरवून अतिक्रमणावरील कारवाई, वाहनतळांची निर्मिती आणि कडक वाहतूक नियमांची अंमलबजावणी तातडीने करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
------
कोट
पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे; परंतु पालिका प्रशासन व वाहतूक पोलिस अशा दोन्ही यंत्रणांनी समन्वय साधून योजना राबवल्यासच ही परिस्थिती निश्चितच बदलेल.
- विवेक अहिरे, पोलिस निरीक्षक, खेड

कोट २
खेड शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस तीव्र होत असून, योजनांच्या फक्त कागदी अंमलबजावणीतून नागरिकांना काहीच दिलासा मिळत नसल्याचे वास्तव पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
- संजय विचारे, सामाजिक कार्यकर्ते, खेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com