निवडणूक बहिष्काराचा धाकोरेवासीयांचा निर्णय
निवडणूक बहिष्काराचा
धाकोरेवासीयांचा निर्णय
सावंतवाडी ः धाकोरे गावातील सरकारी २३ नंबर रस्ता (होळीचे भाटले-बांदिवडेवाडी मार्ग) अद्यापही पूर्णपणे मोकळा आणि पक्का न झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असून, रस्ता पूर्ण मोकळा होईपर्यंत सर्व निवडणुकांचा बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारी रस्ता पूर्णपणे मोकळा व पक्का झाल्याशिवाय कोणत्याही निवडणुकीत मतदान करणार नाही. हा मार्ग शाळकरी मुले, गर्भवती महिला, रुग्ण, वृद्ध आणि ३०० हून अधिक नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अडथळ्यांमुळे अपघाताचा धोका सतत वाढत आहे. अनेक महिन्यांपासून उपोषण, निवेदने आणि मोजणी प्रक्रियेनंतरही प्रशासकीय स्तरावर ठोस कायमस्वरुपी काम न झाल्याने ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे.
.......................
पाट येथे २८ पासून
कबड्डी, कुस्ती स्पर्धा
म्हापण ः एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संचलित एस. एल. देसाई विद्यालय पाट व (कै.) सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालय, (कै.) डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य व विज्ञान उच्चमहाविद्यालयात इंग्लिश मीडियम स्कूलचा नामकरण सोहळा व प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षकांच्या गौरव समारंभाचे आयोजन केले आहे. यानिमित्त २८, २९ व ३० नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा व जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. यावेळी (कै.) राधाबाई सामंत इंग्रजी मीडियम स्कूल उद्घाटन सोहळा, ‘गौरव गुरुवर्यां’चा अंतर्गत दिगंबर सामंत कुटुंबीय, राजन हंजनकर, गुरुनाथ केरकर, तानाजी काळे सन्मान करण्यात येणार आहे. क्रीडाप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थाध्यक्ष दिगंबर सामंत, कार्याध्यक्ष देवदत्त साळगावकर, सचिव विजय ठाकूर, मुख्याध्यापक राजन हंजनकर, पर्यवेक्षक सयाजी बोंदर यांनी केले आहे.
......................
लक्ष्मण आयनोडकर
उपजिल्हाप्रमुखपदी
दोडामार्ग ः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील दोडामार्ग तालुक्याच्या संपूर्ण कार्यक्षेत्रासाठी लक्ष्मण आयनोडकर यांची उपजिल्हाप्रमुखपदी (प्रभारी) नियुक्ती करण्यात आली. जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना दिले. संघटना विस्तार, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय तसेच पक्षाच्या भूमिकेची प्रभावी अंमलबजावणी यासाठी त्यांनी पुढील काळात महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळायची आहे. ही नियुक्ती जाहीर करताना जिल्हाप्रमुख धुरी यांनी आयनोडकर यांच्या कार्यक्षमतेची आणि निष्ठेची प्रशंसा करत भविष्यातील राजकीय, सामाजिक उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. आयनोडकर यांनी शिवसेनेत विविध स्तरांवर जबाबदार्या सांभाळत सातत्याने कार्य केले आहे. त्यांचा प्रवास समर्पित शिवसैनिकापासून सुरू होऊन शेतकरी सेना तालुकाप्रमुख, विभागप्रमुख, तालुका संघटक व आता उपजिल्हाप्रमुख (प्रभारी) पदी नियुक्ती केली आहे.
.......................
सावंतवाडीत डिसेंबरला
राष्ट्रीय लोक अदालत
सावंतवाडी ः प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक वाद, पोटगी आदी प्रकरणी तसेच वीज वितरण कंपनी, बँक, ग्रामपंचायत वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवावीत, यासाठी १३ डिसेंबरला येथील दिवाणी न्यायालयात सकाळी दहाला राष्ट्रीय लोकअदालत आयोजित केली आहे. सावंतवाडी तालुका विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशन यांच्यातर्फे ही अदालत होणार आहे. उच्च न्यायालय व राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने आखून दिलेल्या निर्देशानुसार लोकअदालत होत आहे. ज्या पक्षकारांना आपली प्रकरणे चर्चेद्वारे मिटवायची असतील, त्यांनी वादपूर्व चर्चेसाठी या न्यायालयात हजर राहावे वा फोनद्वारे न्यायालयाशी संपर्क साधावा. त्यानुसार उभय पक्षकारांशी चर्चेची तारीख व माध्यम पाठविण्यात येईल. पक्षकारांचे न्यायालयीन प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी खटले किंवा राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, ग्रामपंचायतकडील वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवायची आहेत, त्यांनी ती तालुका विधी सेवा समिती, सावंतवाडी यांच्या कार्यालयाकडे दाखल करावीत, असे आवाहन तालुका विधी सेवा समितीने केले आहे.
...................
एसएससी परीक्षेबाबत
सावंतवाडीत मार्गदर्शन
सावंतवाडी ः सावंतवाडी एज्युकेसन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल, मुंबई येथील क्रमिक विषयातील चिकित्सक व तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून ‘एसएससी परीक्षेला सामोरे जाताना’ अभ्यासक्रमातील विषयांमधील विद्यार्थ्यांना निर्माण होणाऱ्या अडचणी, विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी, परीक्षेचे ताणतणाव तसेच बोर्डाची उत्तर पत्रिका लेखनाचे तंत्र आणि मंत्र यांविषयी मार्गदर्शन मिळाले. प्रशालेचे मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांना संचिता गावडे, ममता सोनवणे, शारदा वायळ, गणेश नार्वेकर, श्रुती गांगरकर, नारायण गीते, कैलास चव्हाण, सचिन वालावलकर यांनी मार्गदर्शन केले. प्रशालेचे शिक्षक मयुरी कदम, दिगंबर सारंग, एस. जी. सामंत, पी. बी. बागुल, लिपिक वैभव केंकरे उपस्थित होते. दिगंबर सारंग यांनी आभार मानले.
......................
भगवान बिरसा
मुंडा यांना वंदन
कणकवली ः भगवान बिरसा मुंडा यांचे जन्म शताब्दी वर्ष म्हणून २०२५ हे वर्ष साजरे करण्यात येत आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबरला जनजाती गौरव दिन राज्यभर साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने सर्व शैक्षणिक संस्थांना साजरा करण्याचे कळविले आहे. यानिमित्ताने कणकवली नगर वाचनालयात भगवान बिरसा मुंडा यांचे प्रतिमा पूजन आणि ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले. यावेळी संस्थेचे कार्यवाह महंमद हनीफ, आदम पीरखान, सहकार्यवाह डी. पी. तानवडे, सदस्य पी. जे. कांबळे, शरद पंडित, विद्यार्थी, वाचक व कर्मचारी उपस्थित होते.
.........................
तिरोडा माऊली देवीचा
मंगळवारी जत्रोत्सव
आरोंदा ः तिरोडा गावचे ग्रामदैवत देवी माऊली देवस्थानचा जत्रोत्सव मंगळवारी (ता. २५) साजरा होत आहे. यानिमित्त सर्व देवतांवर महाभिषेक, समराधना, ओटी भरणे, केळी ठेवणे, नवस बोलणे-फेडणे, दुपारी सामूहिक गार्हाणे, महाप्रसाद, रात्री दीप उजळणे, फटाक्यांची आतषबाजी, पालखी मिरवणूक, आजगावकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक आदी कार्यक्रम होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

