विधानसभेत एकत्र लढलेले आमने-सामने

विधानसभेत एकत्र लढलेले आमने-सामने

Published on

विधानसभेत एकत्र लढलेले आमने-सामने

जिल्ह्यात बहुरंगी लढती; महायुती, आघाडी तुटल्याचे जवळपास स्पष्ट

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १८ ः तीन नगरपालिका आणि एक नगरपंचायत यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी चुरशीने उमेदवारी दाखल झाली आहे. ७७ नगरसेवक पदासाठी तब्बल ३५९ अर्ज दाखल झाले आहेत, तर चार नगराध्यक्षपदासाठी ३१ अर्ज दाखल झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील चारही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उमेदवारी दाखल मुदतीनंतर जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडी तुटल्याचे स्पष्ट झाले असून, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संघटित काम केलेल्या या दोन्ही राजकीय आघाड्यांतील नेते आता आपापली राजकीय ताकद वाढविण्यासाठी मैदानात उतरलेले दिसत आहेत.
जिल्ह्यातील मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ले या तीन नगरपालिका आणि कणकवली नगरपंचायत यासाठी सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून, यासाठी २ डिसेंबरला मतदान होत आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात १० नोव्हेंबर झाली होती, ती सोमवारी (ता.१७) संपली आहे. जिल्ह्यात प्रत्यक्षात १२ नोव्हेंबरपर्यंत एकही अर्ज दाखल झाले नव्हते. १३ नोव्हेंबरपासून याला प्रारंभ झाला. त्यानंतर १४, १५ ला काही प्रमाणात अर्ज दाखल झाले. मात्र, १६ आणि १७ ला सर्वाधिक अर्ज दाखल झाले. या दोन दिवसांत मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे.
जिल्ह्यात निवडणुका होत असलेल्या मालवण, सावंतवाडी आणि वेंगुर्ले या तिन्ही नगरपालिका यांच्यासाठी प्रत्येकी २० नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. या तिन्ही पालिकांच्या ६० नगरसेवक पदांसाठी तब्बल ३०३ अर्ज दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक अर्ज सावंतवाडीमध्ये ११४ अर्ज आले आहेत. त्या पाठोपाठ वेंगुर्लेमध्ये ११३ अर्ज आले आहेत. त्या तुलनेत मालवणमध्ये कमी अर्ज आले असून, एकूण अर्ज ७६ आले आहेत. नगराध्यक्षपदासाठी सुद्धा सावंतवाडीमध्ये सर्वाधिक ११ अर्ज आले आहेत. त्या पाठोपाठ वेंगुर्लेमध्ये आठ, तर मालवणमध्ये सहा अर्ज आले आहेत. कणकवली नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी ५६ अर्ज दाखल झाले आहेत. नगराध्यक्षपदासाठी सहा अर्ज आले आहेत. एकूण चारही संस्थांच्या ७७ नगरसेवक जागांसाठी ३५९ अर्ज दाखल झाले आहेत. चार नगराध्यक्षपदासाठी ३१ अर्ज आले आहेत.
२१ ला अर्ज माघारी घेता येणार आहेत. त्यामुळे यावेळी नेमके किती उमेदवार रिंगणात राहणार आहेत, हे स्पष्ट होणार आहे. मात्र, सध्यातरी सर्वच राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी वाढल्याने मतांच्या विभाजनाचा फटका बसण्याची भीती वाढल्याने बंडखोरांना शांत करण्यासाठी पक्षांच्या नेतृत्वाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कमी अधिक प्रमाणात हा फटका सर्वच प्रमुख पक्षांना बसला आहे. पक्षाचे नेतृत्व या बंडखोरांना कशाप्रकारे थंड करतात? यावर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. एकूणच विजयाचा गुलाल कोण उधळतो? मतदारांच्या मनात काय आहे? हे ३ डिसेंबरला स्पष्ट होणार आहे.
--------------
मालवणात भाजपला डोकेदुखी
मालवण शहरात तर भाजपला जोरदार धक्का बसला आहे. त्यांचे दोन तगडे उमेदवार शिंदे आणि ठाकरे शिवसेनेत गेले आहेत. त्यांना या दोन्ही पक्षांनी थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. याशिवाय माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनीही नगरसेवक पदासाठी बंडखोरी केली आहे. त्यामुळे मालवण शहरात भाजपची डोकेदुखी अधिकच वाढली आहे. मालवण शहरात सर्वाधिक आठ जण नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडे इच्छुक होते. यातील एकालाच उमेदवारी मिळाली आहे, तर दोघांनी दुसऱ्या पक्षाचा पर्याय निवडला आहे. अजून पाच इच्छुक उमेदवारी न मिळाल्याने नाराज आहेत. ते उमेदवारसुद्धा सक्षम होते. त्यामुळे या पाच जणांची पुढील भूमिका कशी राहते, यावरसुद्धा भाजपचे विजयाचे सूत्र अवलंबून राहणार आहे.
----------------
कणकवलीत राणेंना घेरण्याचा प्रयत्न
जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या नीतेश राणे यांना कणकवली या होम पिचवर घेरण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांनी केला. काँग्रेस, ठाकरे शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी यांनी महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे न जाता शहर विकास आघाडी म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याला केंद्र, राज्यात एकत्रित सत्तेत असलेल्या शिंदे शिवसेनेची साथसुद्धा या शहर विकास आघाडीला मिळाली आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध इतर राजकीय पक्ष असे चित्र निर्माण झाले आहे. एकंदरीत पालकमंत्री राणे यांना घेरण्यात आले आहे.
--------------
सावंतवाडीत आघाडीत बिघाडी
कणकवली शहरात भाजप विरुद्ध अजित पवार राष्ट्रवादी सोडली, तर सर्वच पक्ष एका झेंड्याखाली येत निवडणूक लढवित असताना सावंतवाडीसारख्या सर्वात जास्त मतदार संख्या असलेल्या शहरात मात्र आघाडी राहिलेली नाही. जिल्ह्यात सर्वत्रच शिवसेना आणि भाजप एकमेकांसमोर ठाकले आहेत. त्यामुळे येथेही महायुती अशक्य होती. परंतु, महाविकास आघाडी होईल, असे वाटत असताना ठाकरे शिवसेनेने स्वबळाचा निर्णय घेतल्याने येथे आघाडीही एकसंघ नाही. त्यामुळे येथे उमेदवारांची गर्दी झाली आहे. याचा फायदा नेमका कोणाला होतो? हे निकाला दिवशी स्पष्ट होणार आहे.
--------------
वेंगुर्लेत उमेदवारांची भाऊगर्दी
वेंगुर्ले नगरपालिका असली, तरी येथे अन्य चार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तुलनेत सर्वात कमी मतदार आहेत. १० हजार ११५ एवढे मतदार आहेत. त्यामुळे येथे उमेदवारांची संख्या कमी राहील, असा अंदाज होता. परंतु, नगरसेवक पदासाठी तब्बल ११३ उमेदवारी दाखल झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी आठ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. येथील नगराध्यक्षपद सर्वसाधारण राहिल्याने निवडणुकीत चुरस वाढलेली दिसत आहे.
---------------
दाखल झालेले अर्ज
शहर*नगरसेवक*नगराध्यक्ष
सावंतवाडी*११४*११
मालवण*७६*६
वेंगुर्ले*११३*८
कणकवली*५६*६

Marathi News Esakal
www.esakal.com