पालकमंत्र्यांनी कोणता विकास साध्य केला? रुपेश राऊळ
05362
सावंतवाडी ः येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रुपेश राऊळ. बाजूला सीमा मठकर, निशांत तोरस्कर, आशिष सुभेदार, देवा टेमकर आदी.
पालकमंत्र्यांनी कोणता विकास
साध्य केला? रुपेश राऊळ
सावंतवाडीतील ‘त्या’ आश्वासांवरून टीका
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ ः सावंतवाडीकर जनतेकडून गेल्यावेळी फक्त ७२० दिवस मागून पालिकेवर सत्ता मिळवत पालकमंत्री नीतेश राणे यांनी भाजपाच्या माध्यमातून येथे नेमका कोणता विकास साध्य केला? त्यांनी आश्वासन दिलेले कंटेनर थिएटर, सांडपाण्याच्या प्रश्नाचे काय झाले? केवळ सावंतवाडीकरांची फसवणूक करण्याचे काम राणे यांनी केले, अशी टीका ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केली.
पालिकेची होऊ घातलेली ही निवडणूक ‘धनशक्ती विरुद्ध जनशक्ती’ अशी आहे. आम्ही जनशक्ती म्हणून निवडणुकीत उतरलो आहोत. त्यामुळे येथील जनता यावेळी धनशक्तीला नाकारून जनशक्तीला संधी देईल अन् सावंतवाडीमध्ये इतिहास घडेल, असा विश्वासही श्री. राऊळ यांनी व्यक्त केला. त्यांनी मंगळवारी (ता. १८) येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सीमा मठकर, प्रभाग तीनचे उमेदवार शहर संघटक निशांत तोरस्कर, युवासेना तालुकाप्रमुख आशिष सुभेदार, देवा टेमकर आदी उपस्थित होते.
श्री. राऊळ म्हणाले, ‘सावंतवाडी शहरात मागच्या पोटनिवडणुकीत जनतेकडून ७२० दिवसांची मुदत मागत पालकमंत्री राणे यांनी पालिकेवर सत्ता मिळवली; मात्र, ७२० दिवसांत त्यांनी विकास सोडाच, सावंतवाडीकरांची फसवणूक करण्याचे काम सत्तेच्या माध्यमातून केले. सावंतवाडीत कंटेनर थिएटरचे भूमिपूजन त्यांनी केले; मात्र कंटेनर थिएटर कुठे उभे राहिले? शहरातील सांडपाण्याचा प्रश्न कायमचा मिटवणार, असे आश्वासन त्यांनी दिले होते; मात्र सांडपाण्याचा प्रश्न आजही जशास तसा आहे. दुसरीकडे आमदार केसरकर यांनीही शहरात केवळ विकासाचे नारळ फोडले. नारळ फोडलेल्या ठिकाणी आज गवत उगवले आहे. ‘मल्टिस्पेशालिटी’चे आश्वासन दाखवत भूमिपूजन केले; मात्र भूमिपूजन केलेल्या ठिकाणी आज डांबर घालावे लागले आहे. एकूणच यांनी केवळ सत्तेचा उपयोग करत येथील जनतेच्या डोळ्यांत धूळ फेक करण्याचे काम केले आहे. त्यामुळे येथील जनतेने या सर्वांना जागा दाखवण्याची वेळ आली आहे. सावंतवाडीच्या सुशिक्षित, सुजाण नागरिकांनी आम्हाला प्रामाणिकपणे एकदा संधी द्यावी, आम्ही त्या संधीचे सोने करून भ्रष्टाचारमुक्त सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. आम्ही दिलेले उमेदवार प्रामाणिक जनसेवा करणारे आहेत.’
ते पुढे म्हणाले, ‘पालिकेच्या रिंगणात उतरताना आम्ही आघाडीसाठी प्रयत्नशील होतो आणि आजही आशावादी आहोत. वरिष्ठांकडून यासंदर्भात चर्चा सुरू आहे. केवळ किरकोळ गोष्टींवरून काँग्रेसकडून जोडून घेतले जात नसल्याने हा तिढा निर्माण झाला आहे; मात्र यावर वरिष्ठ लक्ष घालतील आणि २१ तारीखनंतर निश्चितच आम्ही आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढू. आम्ही विकासाच्या मुद्यावरून या निवडणुकीला सामोरे जात आहोत. आमची स्पर्धा कोणाशीही नाही. आम्ही जनतेसमोर विकासाचे व्हिजन घेऊन जाऊ. निश्चितच येथील जनता आमच्या सोबत राहील.’
....................
संधीचे सोने करण्याची ग्वाही
आमदार केसरकर यांच्याबद्दल नेहमीच आदर आहे; मात्र ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून नगराध्यक्षपदासाठी आलेली संधी न दवडता त्या संधीचे सोने करण्याचा निर्णय घेतला. निश्चितच सर्वांच्या मदतीने मी यामध्ये यशस्वी होईन. सावंतवाडी शहर विकासाचा मुद्दा लक्षात घेता येथील रुग्णालयाचा प्रश्न गंभीर आहे. लहानपणी बघितलेले रुग्णालय आणि तेथील समस्या आजही तशाच आहेत. जनतेने संधी दिल्यास नक्कीच शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करेन, असे सीमा मठकर यांनी सांगितले.
....................
05435
सावंतवाडीला विकासाच्या
दृष्टीने पुढे नेणार ः राणे
सावंतवाडीत भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ ः आमची सत्ता आल्यास पुढच्या पाच वर्षात भाजपच्या जोरावर शहराचा १०० टक्के विकास करू. या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता येणार नाही. उलट राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असल्याने आणि जिल्ह्याची आर्थिक चावी माझ्या हातात असल्याने निश्चितच हे शहर एक विकासाच्या दृष्टीने पुढे घेऊन जाईल, अशी ग्वाही राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी आज येथे दिली.
येथील पालिकेच्या भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. श्रद्धाराजे भोसले यांच्या प्रचाराचा प्रारंभ आज श्री देव पाटेकर यांना श्रीफळ ठेवून मंत्री राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, युवराज लखमराजे भोसले, सौ. श्रद्धाराजे भोसले, महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, सौ. संध्या तेरसे, प्रमोद गावडे, शेखर कवठणकर, शर्वरी कवठणकर, मंदार कल्याणकर उपस्थित होते.
मंत्री राणे म्हणाले, ‘सावंतवाडी शहराच्या विकासाच्या दृष्टीने भाजपसाठी ही निवडणूक महत्त्वाची असून सावंतवाडीचा विकास करताना हे शहर रोल मॉडेल शहर बनवण्याचा उद्देशातून आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलो आहोत. आमचे सावंतवाडी शहर आदर्श शहर बनावे, पर्यटनच्या दृष्टीने या ठिकाणी पर्यटक यावेत हा अजेंडा व उद्दिष्ट घेऊन आम्ही या ठिकाणी काम करू. जनतेने आम्हाला मतरूपी आशीर्वाद या ठिकाणी द्यावेत. आमची सत्ता आल्यास पुढच्या पाच वर्षांत शहराचा शंभर टक्के विकास करू. या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता भासणार नाही. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असल्याने या सत्तेच्या जोरावर तसेच जिल्ह्याची आर्थिक चावी माझ्या हातात असल्याने मी निश्चितच हे शहर एक विकासाच्या दृष्टीने पुढे घेऊन जाईल. येथील जनता निश्चितच आमच्या सोबत राहतील आणि आणि आमचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून देतील.’
यावेळी राणे यांच्या उपस्थितीत निवडणुकीत उतरलेल्या काही उमेदवारांशी चर्चा करण्यात आली तसेच काही ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी भरली अशा उमेदवारासोबतही राणे यांनी प्रत्यक्ष चर्चा केली. त्यानंतर शहरातील काही प्रभागांमध्येही जाऊन त्यांनी तेथील कार्यकर्त्यांसोबत हितगुत साधले. एकूणच आजच्या प्रचाराच्या शुभारंभानंतर खुद्द पालकमंत्री राणे हे सावंतवाडी निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये स्वतः उतरल्याचे दिसून आले.

