तिरंगी लढतीमुळे उत्कंठा वाढली

तिरंगी लढतीमुळे उत्कंठा वाढली

Published on

टिप ः निवडणूक पानसाठी मेन

प्रभागाचे अंतरंग भाग-१

तिरंगी लढतीमुळे उत्कंठा वाढली
प्रभाग १ ः मालवणात दोन्ही शिवसेनेसह भाजप रिंगणात
प्रशांत हिंदळेकर : सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २० : येथील पालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये भाजप, शिंदे शिवसेना व ठाकरे शिवसेना अशी तिरंगी लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे. भाजपचे या प्रभागात वर्चस्व असले, तरी महायुती न झाल्याने हा गड राखण्यात ते कितपत यशस्वी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
नवीन प्रभाग रचनेचा प्रभागावर परिणाम झाला आहे. या प्रभागात धुरीवाडा समूलबाग टोपीवाला हायस्कूल धुरीवाडा कुरण येथील कोळंब खाडीलगतचा भाग कोळंब पूल ते धुरीवाडा साळसकर स्मशानभूमी आडारी खाडीचा भाग तेथून शेतमळा, खोतमठ, बोर्डिंग मैदान, जय गणेश शाळा, टोपीवाला हायस्कूल, माघी गणेश चौक, चिवला बीच रस्ता ते परब घर, चिवला बीच समुद्रकिनारा या भागाचा समावेश आहे. या प्रभागात ७६१ पुरुष, तर ७९२ महिला मतदारांचा समावेश आहे. या प्रभागाचे नेतृत्व राणे समर्थक असलेले माजी नगरसेवक मंदार केणी व माजी नगरसेविका दर्शना कासवकर हे करत आहेत. मधल्या काळात या दोन्ही माजी नगरसेवकांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला होता; मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा या दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळच्या निवडणुकीत भाजपकडून केणी व कासवकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोघांचा या प्रभागात जनसंपर्क चांगला आहे. केणी हे तीन वेळा तर कासवकर या सलग चार वेळा या प्रभागातून निवडून नगरपालिकेत गेल्या आहेत.
पालिकेच्या निवडणुकीसाठी महायुती होईल, अशी अपेक्षा होती; मात्र भाजप आणि शिंदे शिवसेना यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिंदे शिवसेनेने या प्रभागात वसंत गावकर यांना उमेदवारी देऊन आव्हान उभे केले आहे. महिलांमधून देवयानी शिर्सेकर यांना उमेदवारी दिली आहे, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसतर्फे संदेश कोयंडे, ठाकरे शिवसेनेकडून पूजा जोगी यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनीही चांगले आव्हान उभे केले आहे. या प्रभागाचा विचार करता मच्छिमार समाज मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे या समाजाची मते ज्याच्या पारड्यात पडतील तोच बाजी मारेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
केणींचे आव्हान पेलण्यासाठी शिंदे शिवसेनेने दिलेला उमेदवार वसंत गावकर हा नवा चेहरा असला, तरी शिंदे शिवसेनेकडून या प्रभागात जोरदार प्रचार करण्यावर भर दिला आहे. महाविकास आघाडीचा विचार करता ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख बाबी जोगी यांच्या पत्नी पूजा जोगी यांना उमेदवारी दिली आहे. मच्छिमार समाजाचे अनेक प्रश्न जोगी यांनी सोडविण्यात गेल्या काही वर्षांत आपले मोठे योगदान दिले आहे. या प्रभागात त्यांचा जनसंपर्क ही चांगला आहे. त्यामुळे मतदार आपल्याला साथ देतील, असा विश्वास त्यांना वाटत आहे; मात्र या प्रभागात मतदार कोणाच्या पाठीशी राहणार याचे चित्र येत्या काळात दिसून येणार आहे.
या प्रभागात रस्ते, कोळंब खाडी किनारी आकर्षक पद्धतीने रेलिंग आणि पाथ वे यांसारख्या सुविधा गेल्या काही वर्षात निर्माण करण्यात आल्या आहेत; मात्र दुसरीकडे धुरीवाडा कुरण या भागाकडे जाण्यासाठी मोठा रस्ता नाही. त्यामुळे या भागातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास मोठी समस्या भेडसावत आहे. धुरीवाडा भागातील अंतर्गत रस्ते हे खूपच अरुंद असल्याने या भागात एखाद वेळी आग लागल्याची घटना घडल्यास अग्निशमन बंब ही पोहोचू शकत नाही, अशी स्थिती आहे. समुद्र किनारपट्टी लगतच हा भाग असल्याने या भागातील नागरिकांना गेली बरीच वर्षे क्षारयुक्त पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. धामापूर नळपाणी योजनेचा या भागात पाणीपुरवठा व्हावा, यासाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा सुरू आहे; मात्र हा प्रश्न सुटलेला नाही. खाडी गाळाने भरलेली असल्याने पावसाळ्याच्या काळात स्थानिक पारंपरिक मच्छिमारांना मासेमारी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या भागातील नागरिक या समस्या सोडविण्यावर जो उमेदवार भर देईल त्यांच्या पाठीशी राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एकंदरीत भाजप व शिंदे शिवसेना यांनी या प्रभागाची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे यात कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com