सिंधुदुर्ग पर्यटनाला ''चार्टर फ्लाईट'' देणार बळ
swt205.jpg
05612
मोपा विमानतळ
swt206.jpg
05613
मोपा येथील विमानतळ गर्दीने लगबगलेले असते. (संग्रहीत छायाचित्रे)
सिंधुदुर्ग पर्यटनाला ‘चार्टर फ्लाईट’ची झेप
‘मोपा’कडे कल वाढलाः हंगामाच्या सुरुवातीला पोलंडहून पहिले विमान
नीलेश मोरजकर ः सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २० ः सिंधुदुर्गाच्या हद्दीवर असलेल्या मोपा विमानतळावर पर्यटकांना घेऊन येणाऱ्या चार्टर फ्लाईटची संख्या वाढत आहे. मंगळवारी (ता. १८) पोलंडहून आलेले या पर्यटन हंगामातील पहिले चार्टर विमान मोपामध्येच उतरले. दाभोळी विमानतळा पेक्षा मोपाला चार्टरसाठी मिळणारा वाढता प्रतिसाद लगतच्या सिंधुदुर्ग पर्यटनासाठी आशादायक मानला जात आहे.
गोव्यासह सिंधुदुर्ग या पहिल्या पर्यटन जिल्ह्याच्या पर्यटन हंगामाची सुरुवात झाली आहे. हंगामाच्या प्रारंभीच आंतरराष्ट्रीय पर्यटकांची पावले या भागाकडे वळली आहेत. मंगळवारी पोलंडमधून आलेले हंगामातील पहिले चार्टर विमान मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाने दिली. या विमानातून तब्बल १८५ पोलिश पर्यटक या ठिकाणी दाखल झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले सिंधुदुर्ग व विजयदुर्ग या जलदुर्गांची नोंद युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात झाल्याने विदेशी पर्यटकांची यावर्षी मोठी गर्दी पाहावयास मिळण्याची शक्यता आहे.
याही पलिकडे चार्टर विमानातून येणारे पर्यटक जास्त करण्याची क्षमता असणारे असतात. गोव्याच्या पर्यटन विकासात याच पर्यटकांचा मोठा वाटा आहे. पूर्वी ही विमाने वास्कोजवळच्या दाभोळी विमानतळावर उतरायची कारण या विमानांचा पार्किंग खर्च तेथे कमी होता. अलिकडे युरोप, रशिया आदी प्रांतातून येणाऱ्या पर्यटकांमध्ये लहानऐवजी मोठी चार्टर विमाने घेऊन येण्याचा ट्रेंड सेट झाला आहे. यातून जास्त संख्येने पर्यटक येतात. ही मोठी विमाने दाभोळी येथे ठेवण्याचा पर्याय मर्यादीत आहे. यामुळे मोपाकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे. ही गोष्ट लगतच्या सिंधुदुर्गसाठी आशादायक आहे.
जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या पातळीवर बरेच सकारात्मक बदल झाले आहेत. गोवा आणि सिंधुदुर्ग हे नैसर्गिक सौंदर्य, किल्ले, समुद्रकिनारे आणि सांस्कृतिक वारशामुळे एकमेकांचे पूरक जिल्हे आहेत. गोव्यातील चार्टर पर्यटन वाढल्याचा थेट परिणाम सिंधुदुर्गावरही होतो. गोव्यामध्ये येणारा मोठा युरोपीय पर्यटक वर्ग सहजपणे पेडणे मार्गे अथवा बांदा-सावंतवाडी मार्गे सिंधुदुर्गात प्रवेश करतो. तिथून तारकर्ली, देवबाग, मालवण, आचरा किनारपट्टी, आंबोली, सावंतवाडी राजवाडा, अशा अनेक आकर्षक स्थळांना भेट देणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. जागतिक दर्जाच्या होमस्टे, रिसॉर्ट्स, वॉटर स्पोर्ट्स, स्कूबा डायविंग, बोटींग, सेंद्रिय पर्यटन, फॉरेस्ट ट्रेल्स यांना गेल्या काही वर्षांत पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
अलीकडेच युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाच्या यादीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन किल्ल्यांचा समावेश केल्याने युरोपीय पर्यटकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. युरोपातील अनेक देशांतून गोवा पर्यटनासाठी मोठी मागणी वाढत आहे; पण याचा थेट फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्याला देखील मिळत आहे.
तो वाढल्यास येथील पर्यटनाच्या अर्थकारणाचा चेहरामोहराच बदलणार आहे.
चौकट
काय आहेत अपेक्षा
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे उत्तर गोव्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने अनेक पर्यटकांची पसंती सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळत आहे; मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना दर्जेदार सुविधा, सुरक्षितता, उत्तम आदरातिथ्य आणि संस्मरणीय अनुभव देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. विमानतळ, रस्ते, समुद्रकिनारे, पर्यटन स्थळे आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्याची आवश्यकता आहे.
चौकट
आशादायक चित्र
विदेशी पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या संख्येने येऊ लागल्याने येथील पर्यटन स्थळे जागतिक नकाशावर पोहोचणार आहेत. येथील किल्ल्याचा इतिहास सर्वदूर पोहोचणार असून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार आणि ओळख वाढणार आहे, ज्यामुळे सिंधुदुर्गाचा पर्यटन नकाशा अधिक ठळक होणार आहे. गोव्यात येणारे चार्टर पर्यटक मालवण - सिंधुदुर्ग दौऱ्याला अधिक प्रमाणात प्राधान्य देतील. किल्ल्यांच्या आसपासच्या परिसरात स्थानिक मार्गदर्शक, स्थानिक कला - संस्कृती, कला – स्मृतीवस्तू, शेत पर्यटन, समुद्री खाद्य व्यवसाय यांना चालना मिळणार आहे. सरकार व युनेस्को मार्गदर्शक सुचनांनुसार पायाभूत सुविधा, स्वच्छता, दिशादर्शक फलक, संरक्षण कार्य यांना अधिक निधी उपलब्ध होणार आहे.
कोट
गोवा-सिंधुदुर्ग सीमाभाग हा नैसर्गिक सौंदर्य, स्वच्छ समुद्रकिनारे, ऐतिहासिक वारसा आणि खाद्यसंस्कृतीमुळे परस्परपूरक पर्यटन पट्टा बनला आहे. ‘चार्टर फ्लाइट’सारख्या पायाभूत सुविधांमुळे परदेशातून येणाऱ्या पर्यटकांत वाढ झाली तर त्याचा मोठा आर्थिक आणि व्यावसायिक फायदा या दोन्ही पर्यटन जिल्ह्यांना होणार आहे. आगामी हंगामात पोलंड, यूके, जर्मनी, रशिया आदी देशांतून आणखी चार्टर फ्लाइट्स येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोवा आणि सिंधुदुर्गातील संपूर्ण किनारपट्टीवर पर्यटनाला नवी दिशा मिळेल.
- मिलिंद पैदलकर, जनसंपर्क अधिकारी, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा
कोट
युरोपातून गोवा तसेच परिसरातील पर्यटन स्थळांना मागणी आणि पसंती वाढत आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, त्यांचे चांगले स्वागत व्हावे, त्यांना चांगली वागणूक मिळावी आणि चांगला अनुभव घेऊन पर्यटक परत जावेत, यासाठी पर्यटन महामंडळ प्रयत्नशील आहे. स्थानिक पातळीवर सेवा सुविधा सुधारण्यावर आमचा भर आहे.
- केदार नाईक, पर्यटन संचालक
कोट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक सुंदर नैसर्गिक पर्यटनस्थळे आहेत. इतिहासाची साक्ष देणारे गड किल्ले व स्वच्छ समुद्रकिनारे ही जिल्ह्याची ओळख आहे. देश विदेशातील अनेक पर्यटक हे येथील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी येत आहेत. विदेशी पर्यटकांची संख्या ही वाढत असून ऑनलाईन टॅक्सी बुकिंगचे प्रमाण देखील वाढत आहे. याचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायिकांना होणार आहे. मोपा विमानतळ जवळ असल्याने भविष्यात पर्यटन व्यवसायात वाढ होणार आहे.
- सत्यवान काळसेकर, पर्यटन व्यावसायिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

