शिरोड्यात बुधवारी आरोग्य चिकित्सा
शिरोड्यात बुधवारी
आरोग्य चिकित्सा
आरोंदाः शिरोडा (ता. वेंगुर्ले) येथील उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी (ता. २६) सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत मोफत आयुर्वेदिय तपासणी व औषध वितरण शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात संधिवात (सांधे व गुडघेदुखी), पाठदुखी, मानदुखी, त्वचारोग (खाज, खरूज, एक्झिमा), पचनाचे त्रास (आम्लपित्त, बद्धकोष्ठता), श्वसनाचे आजार (दमा, सर्दी, खोकला) या आजारांवर तसेच मधुमेह व उच्च रक्तदाब मार्गदर्शन, स्त्रीरोग व बालरोग सल्ला व मार्गदर्शन केले जाणार आहे. शिबिर मोफत असून तपासणी व औषध वितरण होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण देसाई यांनी केले आहे.
..................
गणितीय प्रतिकृतीची
विज्ञान जत्रेसाठी निवड
ओरोसः बांबुळी प्राथमिक शाळेच्या पदवीधर शिक्षिका गायत्री धुरी यांच्या राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त गणितीय प्रतिकृतीची राष्ट्रीय स्तरावरील पश्चिम भारत विज्ञान जत्रेसाठी (प्रदर्शनासाठी) निवड झाली आहे. संस्कृती मंत्रालय भारत सरकारमार्फत नेहरू विज्ञान केंद्र, वरळी-मुंबई येथे १० ते १३ डिसेंबर या कालावधीत ''पश्चिम भारत विज्ञान जत्रा २०२५-२६'' चे आयोजन केले आहे. या विज्ञान जत्रेसाठी महाराष्ट्रातून ३ शिक्षक व ५ विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यात गायत्री धुरी यांच्या प्रतिकृतीचाही समावेश आहे. अमरावती येथे २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या ५२ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात कुडाळ तालुक्यातील बांबुळी प्राथमिक शाळेच्या पदवीधर शिक्षिका गायत्री धुरी यांच्या ''गायत्रीज मॅथस् मॅजिक विथ ब्लॉक्स'' या गणित साहित्य प्रतिकृतीला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त झाला होता.
....................
तेर्सेबांबर्डेत उद्या
वार्षिक जत्रोत्सव
कुडाळः तालुक्यातील तेर्सेबांबर्डे येथील ग्रामदैवत देव रामेश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शनिवारी (ता. २२) साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी ८ वाजता धार्मिक कार्यक्रम, दुपारी ३ वाजल्यापासून ओटी भरणे, केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे कार्यक्रम, रात्री १०.३० वाजता ''श्रीं''ची पालखी मिरवणूक, १२.३० वाजता खानोलकर दशावतार मंडळाचे (खानोली) नाटक होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती, मानकरी, सेवेकरी व ग्रामस्थांनी केले आहे.
....................
सावंतवाडीत डिसेंबरला
तालुका वाचक स्पर्धा
सावंतवाडीः श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी या संस्थेच्या वतीने ६ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचा विषय लेखक कै. गंगाराम गवाणकर (वस्त्रहरणकार) यांच्या कोणत्याही साहित्यकृतीवर विवेचन करणे हा आहे. स्पर्धेत १६ वर्षे व त्यावरील कोणत्याही स्पर्धकाला भाग घेता येईल. स्पर्धक सावंतवाडी तालुक्यातील कोणत्याही वाचनालयाचा वाचक असावा. दिलेल्या विषयाचे रसग्रहण विवेचन (वक्तृत्व) अपेक्षित आहे. वेळमर्यादा १० मिनिटे आहे. प्रथम तीन क्रमांकांना ५००, ३००, २०० रुपये, पुस्तक आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येईल. स्पर्धकांनी आपली नावे ४ डिसेंबरपर्यंत श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी येथे ग्रंथालयाच्या कार्यालयीन वेळेत द्यावीत. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना जिल्हा ग्रंथालय, कुडाळ येथे २० डिसेंबरला होणाऱ्या जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत गौरविण्यात येईल. सावंतवाडी तालुक्यातील अधिकाधिक वाचकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थेचे कार्यवाह रमेश बोंद्रे यांनी केले आहे.
......................
सावडाव येथे उद्या
रक्तदान शिबिर
कणकवलीः सत्यविजय भिसे यांच्या २३ व्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी (ता. २२) शिवडाव राऊतखोलवाडी येथील बाळा भिसे निवासस्थानी (कै.) सत्यविजय भिसे मित्रमंडळ (शिवडाव) यांच्या वतीने स्मृतीदिन कार्यक्रम आणि रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. सकाळी ९ वाजता (कै.) सत्यविजय भिसे करून यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर रक्तदान शिबिराचे उद्घाटन होणार आहे. शिवडाव ग्रामस्थ आणि सत्यविजय भिसेप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन मित्रमंडळातर्फे केले आहे.
...................
कसाल नेत्र शिबिरात
५५ जणांची चिकित्सा
कुडाळः ‘सेंट विन्सेंट दी पॉल’ सोसायटीमार्फत कसाल चर्च येथे मोफत नेत्रदान शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिराचा कसाल येथील ५५ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. या शिबिरासाठी कणकवली येथील विवेकानंद नेत्रालयाचे सहकार्य लाभले. सर्वांनी या सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल विन्सेंट दी पॉल सोसायटी मेंबर्सचे आभार मानले. या कार्यक्रमाला कसाल चर्चचे धर्मगुरू फादर थॉमस तसेच सोसायटीचे अध्यक्ष फर्नांडिस, इर्जिन, शाबिना, फातिमा, जास्मिन, पिटर फर्नांडिस, दुमिंग फर्नांडिस आणि व्हिक्टर फर्नांडिस आदी उपस्थित होते. लवकरच आरोग्य शिबिर आयोजित करण्याचा मानस विन्सेंट दी पॉल सोसायटीच्या अध्यक्षांनी व्यक्त केला.
....................
‘ई-केवायसी’साठी
३१ पर्यंत मुदतवाढ
कणकवलीः मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांची पडताळणी आणि प्रमाणिकरण करण्यासाठी ई-केवायसीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत तसेच पतीही हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-केवायसी करावे. त्यानंतर त्यांनी त्यांचे पती अथवा त्यांचे वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा संबंधित अंगणवाडीसेविका यांच्याकडे न्यायालयाचा आदेश यांची सत्यप्रत ३१ डिसेंबरपर्यंत जमा करायची आहे. अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या पात्र असल्याची शिफारस बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

