सिंधुदुर्गात शिवसेनेचे झेंडे फडकणार

सिंधुदुर्गात शिवसेनेचे झेंडे फडकणार

Published on

swt2010.jpg
05647
कणकवली : शहरातील राजन तेली यांच्या निवासस्थानी झालेल्‍या सभेत आमदार निलेश राणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संदेश पारकर, सतीश सावंत, संजय आग्रे आदी उपस्थित होते. (छायाचित्र : प्रथमेश जाधव)

सिंधुदुर्गात शिवसेनेचे झेंडे फडकणार
निलेश राणेः कणकवलीच्या विकासाची पारकरांमध्येच क्षमता
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २०ः राज्‍याचे नगरविकास खातं आमच्याकडे आहे. त्यामुळे कणकवलीच्या विकासासाठी वाट्टेल तेवढा निधी आणण्याची धमक आमच्यात आहे. संदेश पारकर हेच शहराचा विकास करू शकतात हे कणकवलीवासीयांनी लक्षात घ्यावं. कणकवलीसह मालवण, सावंतवाडी सगळीकडे आमचेच झेंडे लागणार, असा विश्‍वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्‍त केला.
एकवेळ कुडाळ-मालवणमध्ये निधी कमी पडेल. पण, कणकवलीसाठी आम्‍ही निधी कमी पडू देणार नाही. मालवण, कुडाळ प्रमाणेच आमच्या संकल्‍पनेतील विकसित शहर म्‍हणून आम्‍ही कणकवलीची उभारणी करणार आहोत. त्‍यासाठी पारकर निवडून यायला हवेत. त्‍यासाठी एक रूपयाची तडजोड कार्यकर्त्यांनी करू नये. तडजोडीसाठी कुणी येत असेल तर त्‍याचा तुम्‍हीच बंदोबस्त करा. गरज लागली तर मला फोन करा मी त्‍यांचा बंदोबस्त करायला सक्षम आहे, असेही श्री. राणे यावेळी म्‍हणाले.
माजी आमदार राजन तेली यांच्या येथील निवासस्थानी शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची सभा झाली. यात श्री. राणे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेनेचे शिंदे गटाचे उपनेते संजय आग्रे, शहर विकास आघाडीचे नेते तथा क्रांतिकारी विचार पक्षाचे उमेदवार संदेश पारकर आदी उपस्थित होते.
श्री. राणे म्‍हणाले, ‘‘कणकवली शहरातील मतदारांचा आम्‍ही सर्वे केलाय. यात श्री. पारकर यांच्याविषयी शहरवासीयांचं मत चांगलं आहे. पारकर यांच्याविषयी एक आपुलकीची भावना आहे. आपलं कोण? परक कोणं? हे शहरवासीयांनी ओळखलं आहे. पारकर यांना एक संधी द्यावी असं जनतेला वाटतेय. त्‍यामुळे कार्यकर्त्यांनी कुठेच कमी पडू नये. कार्यकर्त्यांसाठी आम्‍ही कमी पडणार नाही याची हमी मी देतोय. आत्तापासूनच जिद्दीने आणि तडफेने कार्यकर्त्यांनी काम करावं.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘माझा दोन वेळा पराभव झाला. दहा वर्षे राजकारणाबाहेर फेकलो गेलो होतो. तसेच माझी इमेज देखील वाईट झाली होती. पण, मी जिद्द सोडली नाही. कार्यकर्त्यांनी प्रत्‍येक मतदारापर्यंत जाऊन मी दिसायला आहे तसा प्रत्‍यक्षात नाही हे पटवून दिलं. जनतेलाही ते पटलं. त्‍यामुळे मला कुडाळ-मालवणमधून आमदारकीची संधी मिळाली. त्‍याधर्तीवर पारकर आणि त्‍यांच्या १७ सहकाऱ्यांसाठी काम करावं.’’
आजच्या सभेत एका बाजूला सतीश सावंत, दुसऱ्या बाजूला राजन तेली आहेत. वेगवेगळ्या पक्षात ते असले तरी त्‍यांचे माझ्यावर, राणेंवर कायमच प्रेम राहिले आहे. पक्ष कार्यात आम्‍ही कधी तडजोड केली नाही. पण, या सर्वांचे आमच्याशी जीवाभावाचे संबंध आहेत. आमचा हेतू साफ आहे, असेही श्री. राणे यावेळी म्‍हणाले.

चौकट
...तर ते विरोधात का ?
कणकवली नगरपंचायत निवडणुकीत दोन्ही राणे बंधू आपापल्‍या उमेदवारांच्या प्रचारासाठी उतरणार आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी संभ्रमित होऊ नये या मुद्यावर श्री. राणे यांनी भर दिला. त्‍याबाबत महाभारतामधील दाखला देताना राणे म्‍हणाले की, ‘सगळेच आपले आहेत तर ते आपल्‍यासोबत असायला हवेत. ते आपल्‍या विरोधात का आहेत?’ अशी विचारणा त्‍यांनी कार्यकर्त्यांना केली.
----------------
swt209.jpg
05648
मालवणः येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी येथील कार्यालयास भेट देत भाजपच्या उमेदवारांना मार्गदर्शन केले.

‘ते’ कशासाठी मतं मागतात हाच प्रश्न
रविंद्र चव्हाणः शिंदे शिवसेनेवर अप्रत्यक्ष टिका
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २०ः काही लोक कशासाठी लोकांजवळ मत मागणार आहेत हेच काही कळत नाही. खरेतर त्यांनी आम्हाला या निवडणुकीत बाय दिली पाहिजे होती, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाव न घेता शिंदे शिवसेनेवर टिका केली. कोणाचेही मत फुकट जायचे नसेल तर कमळाला मतदान करायला सांगा. प्रत्येक मत हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे आणि मंत्री नितेश राणे यांच्यासाठी असणार आहे, हे लोकांना पटवून द्या, असेही आवाहन त्यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना केले.
येथील भाजपा कार्यालयाला श्री. चव्हाण यांनी काल (ता.१९) रात्री भेट देत उमेदवारांना मार्गदर्शन केले. यावेळी मत्स्योद्योग आणि बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, प्रमोद रावराणे, अशोक सावंत, धोंडी चिंदरकर, अशोक तोडणकर, बंडू सावंत, विजय केनवडेकर, बाबा परब, बाबा मोंडकर, विकी तोरसकर, शिल्पा खोत, अन्वेशा आचरेकर, वैष्णवी मोंडकर, महिमा मयेकर, राजेंद्र प्रभुदेसाई, महेश मांजरेकर, राजन गावकर, गणेश कुशे, मंदार केणी, यतीन खोत, सौरभ ताम्हणकर, आप्पा लुडबे, सेजल परब यांसह अन्य पदाधिकारी आणि नगरपालिका उमेदवार उपस्थित होते.
यावेळी श्री. चव्हाण म्हणाले, "आपल्याच पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष पदी निवडून येणार आहे असे जरी आपल्याला वाटत असले तरीही जे वाटत आहे ते घडवून आणण्यासाठी प्रत्येकाला लोकांमध्ये जावे लागणार आहे. केंद्राक व राज्यात आपले सरकार आहे. यामुळे लोकांची कामे आपणच करू शकतो हे लोकांना समजावून सांगा. मालवण शहराला मोठी किनारपट्टी लाभली आहे. निम्या पेक्षा जास्त मतदारांची कामे किनारपट्टीशी संबंधित आहेत. आम्ही तुमची कामे करू असे कोणी कोणी कितीही सांगु देत. किनारपट्टीवर पर्यटन, मत्स्य आणि बंदर विकासातून जी काही नागरिकांची कामे आहेत ती आमचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री राणे यांच्याच माध्यमातून होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व भारत पुरते मर्यादित राहिले नाही. कमळ आता जगाचे नेतृत्व करत आहे. राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने सक्षम नेतृत्व लाभले आहे. आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून समाजात वावरणाऱ्या आहेत." यावेळी मंत्री नितेश राणे, प्रभाकर सावंत, रणजीत देसाई, प्रमोद रावराणे आदी उपस्थित होते. यावेळी मालवण तालुक्यातील ठाकरे शिवसेनेचे हडी ग्रामपंचायत सदस्या दिक्षा गावकर, दशरथ गांवकर, मसुरे उपतालुका प्रमुख पराग खोत यांच्यासह प्रताप खोत, रणजित खोत, समीर खोत, सुधीर खोत, शंकर खोत, जितेंद्र खोत, अमोल परब, सार्थक परब, गौरव बागवे, स्वानंद बागवे, चंद्रसेन बागवे, समीर परब, एडवर्ड फर्नांडिस आदींनी श्री. चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
------------------
चौकट
बंद दाराआड चर्चा
मालवणच्या समस्यांना न्यायाच्या बाजूने नेणाऱ्या व्यक्तिमत्वाला मत देणे आवश्यक आहे. हे लोकांना सांगा. ही बूथवरील लढाई आहे. प्रत्येक उमेदवाराने स्वतःसाठी मत न मागता संपूर्ण पॅनलसाठी आणि कमळासाठी मत मागितले पाहिजे. आता वेळ न दवडता लोकांपर्यंत गेले पाहिजे, असे आवाहन करत श्री. चव्हाण यांनी कार्यालयात बंद दाराआड पालिकेच्या प्रत्येक भाजप उमेदवाराकडून प्रभागनिहाय प्रचाराचा आणि मतदारांचा आढावा घेतला.
----------------

Marathi News Esakal
www.esakal.com