प्रभाग सहाचे पार्किंग आरक्षण रखडले

प्रभाग सहाचे पार्किंग आरक्षण रखडले

Published on

निवडणुक पानासाठी मेन करावी

प्रभागाचे अंतरंग - भाग ६

swt2011.jpg
05656
कणकवली : शहरातील तेलीआळी डीपी रोड येथील आरक्षित जागेत पार्किंग आरक्षण विकसित न झाल्‍याने तेथे जंगल वाढले आहे.

swt2012.jpg
O05657
कणकवली : शहरात पार्किंग झोन नसल्‍याने तेलीआळी डीपी रोडसह सर्वच अंतर्गत रस्ते पार्किंगसाठी वापरले जात आहेत.

swt2013.jpg
05658
कणकवली : बाजारपेठेत मोकाट जनावरांच्या त्रास नेहमीच व्यापारी, ग्राहकांना सहन करावा लागत आहे.

swt2014.jpg
05659
कणकवली : येथील बाजारपेठेत वाहतूक कोंडी नित्‍याचीच बाब झाली आहे.

प्रभाग सहाचे पार्किंग आरक्षण रखडले
वाहतूक कोंडी सुटेनाः पार्किंग व्यवस्था नसल्‍याने बाजारपेठेवरही परिणाम
राजेश सरकारेः सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २०ः शहरातील दक्षिण बाजारपेठेचा भाग प्रभाग सहामध्ये समाविष्ट झाला आहे. दक्षिण बाजूने मुख्य बाजारपेठ, त्‍या पाठीमागे तेली-हर्णेआळी डीपी रस्ता, पश्‍चिमेला बाजूला राष्ट्रीय महामार्ग, पूर्वेला तेलीआळी, कणकवली कॉलेज रस्ता अशा सुवर्ण चतुष्कोनामध्ये हा प्रभाग आहे. पण, राजकीय चढाओढीमध्ये या प्रभागातील पार्किंगचे आरक्षण रखडले आहे. तब्‍बल ५६ लाखाचे बजेट असलेले स्वच्छतागृह पटवर्धन चौक परिसरात कार्यान्वित झालेय. पण, ते रात्री बंद असते. याखेरीज नेहमीची वाहतूक कोंडी बाजारपेठ आणि मागील बाजूच्या डीपी रस्त्यावर होत असते. त्‍याचा मोठा फटका इथल्‍या व्यापार उदिमालाही बसला आहे.
शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौक ते पटकीदेवी मंदिर तेथून नगरपंचायत कार्यालय ते डीपी तेली आळी रोड ते राष्ट्रीय महामार्ग अशा दक्षिण बाजारपेठेचा हा प्रभाग प्रचंड वर्दळीचा आहे. बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांची दुचाकी, चारचाकी वाहने राष्ट्रीय महामार्ग तसेच बाजारपेठेत मिळेल त्या जागी उभी केली जातात. ही वाहने एकाच ठिकाणी पार्किंग व्हावीत यासाठी डीपी रोड लगतच्या २० गुंठे क्षेत्रात नगरपंचायतीचे पार्किंग आरक्षण आहे. खासगी विकासकाच्या माध्यमातून हे आरक्षण विकसित करण्याचा प्रयत्‍न नगरपंचायत सत्ताधाऱ्यांनी केला. मात्र, तत्‍कालीन विरोधकांनी तांत्रिक मुद्दयावर बोट ठेवून पार्किंग आरक्षण विकासाला विरोध केला. त्‍यानंतर विकासकानेही पार्किंग आरक्षण विकसित करण्याचा प्रयत्‍न सोडून दिला. सध्या या जागेत जंगल वाढले आहे. नगरपंचायतीकडे आर्थिक तरतूद नसल्याने नगरपंचायत हे आरक्षण विकसित करू शकत नाही, अशी स्थिती आहे.
शहरात पार्किंगसाठी जागा नसल्याने राष्‍ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली वाहने पार्किंग केली जातात. तेथेही जागा कमी पडत असल्‍याने महामार्गाच्या सेवा रस्ता दुतर्फा वाहने पार्किंग केली जातात. यात एका बाजूने तीन आसनी रिक्षा, चारचाकी तर दुसऱ्या बाजूला दुचाकी लावल्‍या जातात. यात अवजड वाहने आली, तर सेवा रस्त्यावरही वाहतूक कोंडी होते. शहरातील पटवर्धन चौक तसेच, तेली आळीतील संत जगनाडे चौक आणि झेंडा चौक येथेही चारही रस्त्याने वाहने एकत्र येत असल्‍याने सातत्‍याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
नगरपंचायतीने पटवर्धन चौकात तब्‍बल ८६ लाख रूपये बजेट असलेले स्वच्छतागृह मंजूर केले होते. त्‍याबाबत विरोधकांनी आवाज उठविल्‍यानंतर या स्वच्छतागृहाचे बजेट ५६ लाख रूपये करून दोन वर्षापूर्वी हे प्रसाधनगृह खुले करण्यात आले. मात्र, रात्री आठ नंतर सकाळी सहा वाजेपर्यंत हे प्रसाधनगृह कुलूप बंद केले जाते. त्‍यामुळे रात्री बाजारपेठेत आलेले पर्यटकांना बसस्थानकामध्ये धाव घ्यावी लागते.
शहरातील बाजारपेठांच्या मागील बाजूला मोकळ्या जागा आहेत. यातील एक दोन गुंठे जागा विकत घेऊन तेथे स्वच्छतागृहाची उभारणी करणे नगरपंचायतीला शक्‍य होते. मात्र, गेल्‍या वीस वर्षात त्‍याबाबत फारसे प्रयत्‍न झालेले नाहीत. त्‍यामुळे पटवर्धन चौक ते पटकीदेवी मंदिर या दीड किलोमिटर परिसरात एकही सार्वजनिक शौचालय नाही. यात प्रत्‍येक मंगळवारी झेंडा चौक ते पटकीदेवी मंदिर या दरम्‍यान आठवडा बाजार भरतो. त्‍यावेळी आलेले विक्रेते, नागरिक यांची शौचालय नसल्‍याने गैरसोय होते. पर्यटन महोत्सव व इतर उपक्रमांसाठी लाखोंचा निधी खर्च होतो. पण, स्वच्छतागृहासाठी तरतूद होत नसल्याबाबतही नागरिकांतून खंत व्यक्त केली जात आहे.
मोकाट जनावरे देखील बाजारपेठेत फिरत असतात. त्‍याचबरोबर भटक्या कुत्र्यांचाही उपद्रव बाजारपेठेत आहे. दुचाकींना लावलेल्‍या साहित्‍याच्या पिशव्या फाडून आतील वस्तू देखील हे कुत्रे फस्त करतात. शहरातील बाजारपेठ अरुंद आहे. त्यात फिरते विक्रेते ठाण मांडून असल्याने सतत वाहतूक कोंडी होत असते. सणाच्या दिवसांत तर बाजारपेठेत गर्दी असल्‍याने दुचाकी किंवा तीन चाकी वाहनेही बाजारपेठेतून जात नाहीत. त्याचा फटका व्यापारालाही बसत आहे. वाहने उभी करण्यासाठी पार्किंग व्यवस्था नसल्‍याने शहरचा लगतचा परिसर, गावांमध्ये किरकोळ ते घाऊक साहित्‍य उपलब्‍ध होणारी दुकाने सुरू झाली आहेत. यात कणकवली बाजारपेठेतील वर्दळ देखील कमी झाली आहे.
बाजारपेठेतील पार्किंगचे नियोजन करण्यासाठी तत्‍कालीन नगराध्यक्षा ॲड. प्रज्ञा खोत यांनी बाजारपेठेत सम आणि विषम तारखांना पार्किंगची तरतूद करण्यात आली. याखेरीज बाजारपेठेचा भाग नो हॉकर्स झोन म्हणूनही जाहीर केला होता. मात्र नंतरच्या नगरपंचायत पदाधिकाऱ्यांनी बाजारपेठेतील पार्किंगच्या अंमलबजावणीबाबत गांभिर्याने घेतले नाही. याबरोबर बाजारपेठेत फिरत्या विक्रेत्यांचे अतिक्रमण, अस्ताव्यस्त पार्किंग, एक दिशा मार्गाची अंमलबजावणी न होणे यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न कायम राहिला आहे.

कोट
तेलीआळीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तेथील रस्त्यालगतची जागा नगरपंचायत संपादन करत असेल, तर बाजारपेठेच्या मध्यवर्ती भागात देखील जागा संपादन करून शौचालयाची उभारणी व्हायला हवी. याखेरीज भटके कुत्रे आणि मोकाट जनावरांचा प्रचंड त्रास बाजारपेठेतील व्यापारी ग्राहक आणि नागरिकांना सहन करावा लागतोय. त्‍यावर देखील लोकप्रतिनिधींनी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा आहे.
- सुनील धुरी, नागरिक

चौकट
अशी आहे रचना
* लोकसंख्या ९१३
* मतदार ७८३
* आरक्षण - सर्वसाधारण महिला
* प्रभागातील समाविष्ट भाग : दक्षिण बाजारपेठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com