राज्य नाट्य स्पर्धा

राज्य नाट्य स्पर्धा

Published on

-rat२०p८.jpg-
२५O०५५७९
रत्नागिरी ः राज्य नाट्यस्पर्धेत नेहरू युवा कला केंद्र पाली यांनी सादर केलेल्या ऑक्सिजन या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळ- सकाळ छायाचित्रसेवा)

राज्य नाट्य स्पर्धा---------लोगो

‘ऑक्सिजन’ने मांडली
कुटुंबवत्सल तरुणाची कथा

नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० ः जीवनात परिस्थितीने गांजलेल्या लोकांना आजुबाजूच्यांकडून मिळणारा हातभार म्हणजे ऑक्सिजनरूपी जगण्याची उमेदच असते. आई आजारी पडल्यानंतर मातृप्रेमात स्वतःला वाहून घेणाऱ्या कुटुंबवत्सल तरुणाच्या कथा लेखक अनिल काकडे यांनी ऑक्सिजन या संहितेतून मांडली आहे. नेहरू युवा कला केंद्र-पाली यांनी राज्यनाट्य स्पर्धेत सादरीकरण केले. दिग्दर्शन रोहित नागले यांच्या संकल्पनेतून नाटक साकार झाले. कलाकारांचा अभिनय, नेपथ्य, रंगभूषा, प्रकाशयोजना अशा चोहोबाजूंनी नाटक रंगतदार झाले.
ऑक्सिजन या नाटकाने रत्नागिरी केंद्रात तिकिटविक्रीत उच्चांक केला. १७ हजार रुपयांची तिकीटविक्री झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात ‘हाऊसफुल’ मध्ये रंगलेल्या नाटकाला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले तसेच ज्येष्ठ रंगकर्मीकडून वाहवा मिळवली.
---
काय आहे नाटक?

आईच्या आजारपणात तिची सेवा करणाऱ्या तरुणाची कथा ऑक्सिजन या नाटकातून मांडण्यात आली आहे. कथेतील नायक श्री त्याची आई आणि पत्नी रेणू या तिघांमध्ये फिरणारी संहिता आहे. आईला पॅरालिसिस झालेला असतो. नोकरी व आईच्या सेवेत श्री व्यस्त असतो. यामध्ये त्याची प्रेमिका रेणू त्याला भेटत नाही. ती लग्नालाही होकार देत नाही. एके दिवशी रेणू घरी येते त्या वेळी श्रीच्या व्यथा तिला समजतात. तो रेणूला समाजावतो की, तू माझ्यासाठी थांबू नकोस; पण प्रेमासाठी आणि आईच्या वात्सल्यासाठी ती श्री कडे राहते. दोघेही आईची सेवा करतात. एक दिवस श्री कामावरून घरी येतो तेव्हा त्याच्या लक्षात येते, रेणूने आईला खायलाही दिलेले नाही. तिचे कपडेही बदललेले नाहीत. तेव्हा दोघांमध्ये वाद होतो; पण प्रेमापोटी रेणू श्री ला सावरून घेते. आईला हॉस्पिटलमध्ये हलवावे लागते. आईच्या आजारपणामुळे श्री आणि रेणूच्या संसारात वाद सुरू होतात. श्रीचे जीवन मेटाकुटीला येते. घरातील दागिनेही गहाण पडतात. घरातील वीज, पाणी तोडले जाते. अतिशय बिकट परिस्थितीला दोघेही तोंड देत असतात. याचवेळी श्री ला मदत करणारा लंपट-खोत रेणूच्या घरात येतो. त्याची नजर रेणूवर असते; पण तो असफल होतो. इकडे आई ऑक्सिजनवर असते. त्याला कुणीही मदत करत नाही. डॉ. दातार त्यांना माझ्याकडून आणखीन मदत होणार नाही, आईला घेऊन जा असे सांगतात. त्या वेळी श्री ला त्याचा मावस भाऊ राकेश ७५ लाख रुपये देतो, असे सांगतो. फक्त तुझ्या आईची बॅाडी माझ्याकडे दे, असे सांगतो. फक्त मृत्यू फॉर्मवर तू सही कर, असेही बजावतो; पण हे रेणूला कसे सांगणार? दोघेही श्री-रेणूची मैत्रीण तृप्तीकरवी आईच्या मृत्यूनंतर बॉडी राकेशच्या ताब्यात द्यायची. त्या बदल्यात तुम्हाला ७५ लाख रुपये मिळतील, असे सांगतात. अखेर परिस्थितीने गांजलेली रेणू-श्री या गुन्ह्याला बळी पडतात. या घटनेची उकल अखेर पोलिस साळींदेकर व शिर्के करतात. साळींदेकर श्रीच्या घरी येतात त्या वेळी राकेशची आजारी आई, रेणू, राकेश घरात असतात. त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करताच. सर्वजण हकीगत कथन करतात. साळींदेकर राकेशकडे दोन करोडची मागणी करतात. नाहीतर जेल, अशी धमकी देतात. राकेश देतो म्हणून सांगतो. त्या आधी श्री मिळालेल्या पैशातून हॉस्पिटलला डायलिसिस सेवा स्वखर्चाने देत असतो. हे कळल्यावर साळींदेकर श्री व रेणूला राकेशच्या आईची सेवा करण्यास सांगतो आणि राकेशला पोलिस घेऊन जातात. जीवनात माणसाला ऑक्सिजन जे आजारी माणसालाही लागते आणि परिस्थितीने गांजलेल्या माणसाला वेगवेगळ्या रूपात ऑक्सिजन मिळाले तर त्याची जगण्याची उमेद वाढते. अशा दोन सख्ख्या वृद्ध आजारी बहिणींची कथा रंगवण्यात नेहरू युवा केंद्र पाली यशस्वी झाली.
---
सूत्रधार आणि सहाय्य
निर्माता व सूत्रधार ः जयू पाखरे, पार्श्वसंगीत ः तन्मय डांगे, प्रकाशयोजना ः यश सुर्वे, वेशभूषा ः महेश पाखरे, रंगभूषा ः नरेश पांचाळ, नेपथ्य निर्माण ः महेश धालवलकर, रंगमंच सहाय्यक ः मनिष लिंगायत, संकेत पालकर, आदित्य पांचाळ, मंदार लिंगायत.
-----
पात्र परिचय
श्री ः संकेत साळवी, रेणू ः सायली शिंदे, आई- निवेदिता मणचेकर, राकेश ः मिथिल दळवी, शिर्के ः अभिजित सावंत, खोत ः कुलदीप कुरूप, साळिंदेकर ः जयू पाखरे.
---
आजचे नाटक
नाटक - अग्निपंख, सादरकर्ते ः समर्थ रंगभूमी, रत्नागिरी. स्थळ ः वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी. वेळ ः सायंकाळी ७ वाजता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com