सप्तलिंगी लाल भात झळकणार राष्ट्रीय बाजारात

सप्तलिंगी लाल भात झळकणार राष्ट्रीय बाजारात

Published on

०५५६३

सप्तलिंगी लाल भात


सप्तलिंगी लाल भात आता झळकणार राष्ट्रीय बाजारात
संगमेश्वर तालुक्याला मिळणार नवी ओळख ः शेतकरी कंपन्यांचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २० ः संगमेश्वर तालुक्यातील सुपीक दरी, सप्तलिंगी नदीचे पवित्र जल आणि स्थानिक शेतकऱ्यांची परंपरागत शेतीकला यांच्या मिलाफातून निर्माण झालेला लाल भात आता एका नव्या ओळखीसह समोर येत आहे. सप्तलिंगी लाल भात या नावाने हा चविष्ट आणि पौष्टिक भात अधिकृतपणे ब्रँड केला जाणार असून, त्याला राष्ट्रीयस्तरावर नेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्याच्या कृषी क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.
कोकणात उत्पादित होणाऱ्या लाल भाताला मुंबई, पुण्यासह विविध भागांतून मागणी असते. त्याचाच आधार घेऊन व्यापारी, वाणिज्य, उद्योग आणि शेती या चार स्तंभांवर कार्य करणाऱ्या संगमेश्वर येथील क्रांती व्यापारी संस्थेने सप्तलिंगी लाल भात ब्रँड विकसित करण्याचा निर्धार केला आहे. संगमेश्वर तालुका अॅग्रोस्टार शेतकरी उत्पादक कंपनी आणि कृषी संकल्प प्राईड शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या सहकार्यातून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी यंदा सांगवे परिसरात लाल भाताचे उत्पादन घेण्यात आले होते. हे भात सप्तलिंगी नावाने बाजारात आणले जाणार आहे. कोकणातील भौगोलिक परिस्थिती आणि योग्य हवामानामुळे या भागातील लाल तांदळाला एक विशिष्ट नैसर्गिक सुगंध, चव आणि औषधी गुणधर्म प्राप्त झाले आहेत. याच भौगोलिक वेगळेपणाचा उपयोग करून देवरूखची ही ओळख आता जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला आता स्थिर बाजारपेठ आणि योग्य दर मिळणार असल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. उत्पादन, गुणवत्ता आणि मार्केटिंग या तिन्हींची सांगड घालत संगमेश्वर तालुक्यातून एक मजबूत ग्रामीण औद्योगिक ब्रँड उभा राहत आहे. सप्तलिंगी लाल भात केवळ तंदुरुस्तीसाठी मर्यादित नसून, तो स्थानिक अर्थव्यवस्था, पर्यटन आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाचा एक नवा अध्याय ठरू शकणार आहे. देवनगरी देवरूखची ही अनोखी नैसर्गिक देणगी आता आरोग्यासह अर्थव्यवस्थेचाही कणा बनणार आहे.
---
चौकट
आरोग्यासाठीही उपयुक्त भात
सप्तलिंगी लाल भात हा आरोग्याच्यादृष्टीने अत्यंत गुणकारी मानला जातो. त्यात लोहाचे प्रमाण मुबलक असल्याने तो रक्तवर्धक असून, शरीरातील दाह कमी करण्यास मदत करतो. यातील उच्च फायबरमुळे पचनाच्या तक्रारी कमी होतात आणि पोट हलके राहते. तसेच, नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आणि मॅग्नेशियममुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यास आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. विशेष म्हणजे, याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखर वाढण्याचे प्रमाण मंदावते, ज्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी हा भात लाभदायी ठरतो. याशिवाय झिंक, बी-विटामिन्स आणि खनिजे यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते तसेच त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीही हा भात उपयुक्त ठरतो.
-------

कोट १
संगमेश्वर येथील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन लाल भाताचे उत्पादन केल्यामुळे त्याला अधिकचा दर मिळू शकतो. तसेच, चांगल्या पद्धतीने मार्केटिंगही होईल. लाल भात हा आरोग्यदायी असल्याने मागणीही अधिक आहे. यंदा शेतकऱ्यांनी लागवड केली असून, हे भात सप्तलिंगी नावाने बाजारात विक्रीसाठी आणले गेले आहे.
- विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी, संगमेश्वर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com