सरकारनामासाठी
चिपळुणात अर्ज माघारीसाठी मनधरणी
आज चित्र ठरणार ; पक्षासह नेत्यांच्या बैठका सुरू
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० : नगरपालिका निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मंगळवारी छाननीप्रक्रिया पूर्ण झाली असली तरी प्रत्यक्षात अर्ज माघारीनंतरच (ता. २१) चित्र स्पष्ट होणार आहे. आपल्याला अडथळा ठरणाऱ्या उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी अधिकृत उमेदवारांकडून संबंधितांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
नगराध्यक्षपदासाठी एकूण १३ अर्ज दाखल झाले होते. यातील तीन अर्ज छाननीत अवैध ठरले आहेत. ८ जणांचे १० अर्ज वैध राहिले आहेत. नगरसेवकपदासाठी १५४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १३ जणांचे अर्ज बाद ठरल्याने १४१ अर्ज वैध ठरले आहेत. नगरसेवकपदासाठी एकूण १२९ उमेदवार रिंगणात आहेत. २१ नोहेंबरपर्यंत यातील किती उमेदवार माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही डमी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत; मात्र अजूनही काही प्रभागातील तिढा सुटलेला नाही. तो सुटावा यासाठी साम-दंड-भेद-नीतीही वापरली जात आहे. अर्जमाघारीचा अखेरचा दिवस २१ नोव्हेंबर आहे. त्यामुळे उमेदवारांची मनधरणी करण्याचे काम नेतेमंडळींना करावे लागत आहे.
---
चौकट
एका अक्षरामुळे अवैध ठरला अर्ज
फॉर्ममध्ये लिहिलेली माहिती आणि सोबत जोडलेला पक्षाचा एबी फॉर्म यात एका अक्षराचा फरक असल्याने उमेदवारी अर्ज छाननीमध्ये अवैध ठरल्याचा प्रकार चिपळूणमध्ये घडला. हा विषय चांगलाच चर्चेचा झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार दीक्षा कदम यांनी आपल्या नामनिर्देशन पत्रात ‘१ ब’ असा उल्लेख केला आणि सोबत जोडलेल्या ''एबी फॉर्म''मध्ये ‘१ अ’ असा उल्लेख होता. त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरला.

