रत्नागिरी- कुतुहलात्मक प्रश्नांतून संशोधक घडतील
rat21p15.jpg-
05813
रत्नागिरी : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. अलिमियाँ परकार.
-----------
कुतुहलात्मक प्रश्नच घडवतील भावी वैज्ञानिक
डॉ. अलिमियाँ परकारः ‘गोगटे’ची आंतरराष्ट्रीय विज्ञान, तंत्रज्ञान परिषद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : मूलभूत विज्ञानाने मानवी जीवनात प्रगती घडवली. शिक्षणपद्धती आता बदलत आहे. मानसिकताही बदलत आहे. कुतुहलात्मक प्रश्न विद्यार्थ्यांचे भविष्यातील संशोधक निर्माण करायला मदत करतील, असे प्रतिपादन डॉ. अलिमियाँ परकार यांनी केले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे विवा एक्झिक्युटिव्हमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पीएम-उषा योजनेंतर्गत ऑनलाईन व ऑफलाईन अशा हायब्रिड पद्धतीने येथे ही परिषद आजपासून सुरू झाली. यात देश-विदेशातील विविध अभ्यासतज्ज्ञ आणि संशोधक मार्गदर्शन करत आहेत.
या वेळी व्यासपिठावर र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, सचिव सतीश शेवडे, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी, परिषदेच्या संयोजक डॉ. मधुरा मुकादम उपस्थित होत्या. पटवर्धन म्हणाल्या, वाईट गोष्टींचे चक्र आपोआप चालते; परंतु चांगल्या गोष्टींचे चक्र चालवायला वेळ लागते. त्याकरिता पालक, शिक्षकांनी लहान वयापासूनच विद्यार्थ्यांवर संस्कार करावेत.
प्राचार्य डॉ. साखळकर यांनी सांगितले, विज्ञानातील नवीन क्षेत्रे भविष्यातील नवीन संधींना वाट करून देतात. संशोधन हे केवळ शैक्षणिक कार्य नसून, ते मूल्याधिष्ठित कार्य आहे. या वेळी परिषदेतील शोधनिबंधांच्या संचाचे प्रकाशन करण्यात आले. परिषदेत पर्यावरण व संवर्धन जीवशास्त्र, हवामान बदल व जैवविविधता, शाश्वत विकासासाठी जैवतंत्रज्ञान, सूक्ष्म जीवशास्त्रातील नव्या प्रगती, अनुप्रयुक्त गणित व भविष्य तंत्रज्ञान, डाटा अॅनालिटिक्स व कृत्रिम बुद्धिमत्ता, विज्ञानासाठी मशिन इंटेलिजन्स, हरित रसायनशास्त्र व पर्यावरणीय शाश्वतता, प्रगत पदार्थविज्ञान व नॅनोसायन्स, आरोग्य व औषधातील रासायनिक प्रगती आणि पारंपरिक ज्ञान व वनौषधी यावर संशोधन निबंध सादरीकरण व चर्चासत्र होणार आहेत.
चौकट १
परिषदेमुळे जागरूकता
उद्घाटनावेळी मुंबई विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी ऑनलाइन माध्यमातून बीजभाषण सादर केले. ते म्हणाले, भारताने गेल्या दहा वर्षांत संशोधनामध्ये मोठी झेप घेतली आहे. संशोधनामध्ये भारताने सातव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर यशस्वी झेप घेतली. बायोफ्युएल, बायोलॉजिकल मॅन्युफॅक्चरिंग, क्रिप्टोग्राफी, सायबर सिक्युरिटी ही नवनवीन संशोधन क्षेत्रे आहेत. भारत सेमिकंडक्टर क्षेत्रातही प्रगती करत आहे. अवकाश आणि खोल समुद्रातही भारत प्रगती करत आहे. ही परिषद संशोधनामध्ये जागरूकता निर्माण करण्यास मदत करेल.

