फ्लॅश बॅक ः निवडणुकाविना चाले रत्नागिरीचा कारभार

फ्लॅश बॅक ः निवडणुकाविना चाले रत्नागिरीचा कारभार

Published on

rat21p16.jpg-
05840
रत्नागिरी ः जुने मारुती मंदिर
---------
फ्लॅश बॅक---लोगो

रत्नागिरी पालिकेची वाटचाल दीडशे वर्षांत - भाग १

इंट्रो

ग्रामीण जीवनापेक्षा व्यापारउदीम अधिक असलेल्या भागांमध्ये वेगळ्या पद्धतीचे जीवनमान रूळू लागले आणि शहरे वसू लागली. रत्नागिरी शहर हे पौराणिक, सामाजिक, ऐतिहासिकदृष्ट्या वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण शहर आहे. या शहराचा आणि या नगरपालिकेचा इतिहासही वेगळाच आहे. खरेतर, रत्नागिरी या नावाने हे शहर आणि नगरपालिका ओळखली जाते; परंतु शासनदरबारी महसुली नोंदीत रत्नागिरी नावाचे एकही शहर नोंदलेले नाही. किल्ले, झाडगाव, रहाटागर, पेठ शिवापूर, कर्ला आणि नाचणे अशी ६ गावे एकत्र येऊन रत्नागिरी हे शहर स्थापन झाले आहे.
- राजेश शेळके, रत्नागिरी
------------------------

निवडणुकाविना चाले रत्नागिरीचा कारभार

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी म्हणत असत की, भारत हा देश खेड्यांचा बनलेला आहे. देशाचा विकास करायचा असेल तर खेड्यांचा विकास करा; पण हळूहळू खेड्यांपासून लांब स्वतंत्र ठिकाणी व्यवसाय, उद्योगाच्यानिमित्ताने वस्ती रूजू लागली आणि वाढू लागली, तर काही ठिकाणी छोटी-छोटी खेडी एकत्र आली आणि त्यांनी स्वतःचा विकास करायला सुरुवात केली.
राज्यकारभारामध्ये हळूहळू जनतेला सहभागी करून घेण्याच्या धोरणानुसार, भारतात नगरपालिका स्थापन करण्याचा अधिकार १८५०ला ब्रिटिशांच्या कालखंडातच मिळाला आणि त्यानंतर रत्नागिरीमध्ये पालिकेची स्थापना १ एप्रिल १८७६ रोजी झाली. त्या वेळी रत्नागिरी शहराची लोकसंख्या अवघी ११ हजार होती. नगरपालिकेच्या स्थापनेवेळी जिल्हाधिकारी हे नगरपालिकेचे पदसिद्ध अध्यक्ष असत. चार इतर पदसिद्ध अधिकारी, १२ सरकार नियुक्त, तीन सरकारी अधिकारी, ९ स्थानिक नागरिक यांचा समावेश पालिका बोर्डात होता. त्यातही ९ स्थानिक २ युरोपियन आणि १४ स्थानिक नागरिक यांचा या मंडळामध्ये समावेश होता. त्या वेळी यात एकही लोकनियुक्त सभासद त्यामध्ये नव्हता म्हणजेच त्या वेळेला निवडणुका होत नव्हत्या.
पूर्वी गावाचा कारभार गावप्रमुख बघत होता. कालांतराने त्याला सरपंच म्हटले जाऊ लागले. यातच नव्याने स्थापन होत असलेल्या शहरांमध्ये सोयीसुविधा पुरवणे, त्यांचा कारभार चालवणे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगरपालिका स्थापन झाल्या. तो अधिकार १८५० ला ब्रिटिशांच्या काळखंडातच मिळाला. १८५० नंतर पुढे पंधरा-वीस वर्षांनी भारतातील अनेक शहरांत नगरपालिका स्थापन झाल्या. दीडशे वर्षे पूर्ण करण्याकडे रत्नागिरी नगरपालिकेची वाटचाल सुरू आहे. रत्नागिरी पालिकेची स्थापना १ एप्रिल १८७६ला झाली. १ एप्रिलला १४७ वर्षे पूर्ण झाली. म्हणजे १४८ वर्षांची मोठी परंपरा या पालिकेला आहे. विजापूरचा आदिलशहा, पेशवे, ब्रिटिश यांचा अंमल या शहरावर होता. रत्नागिरी शहरातील आता समाविष्ट असलेल्या मारुती आळी, रामआळी, खालची आळी, तांबटआळी या भागांची त्या वेळी स्वतंत्र ओळख होती. या शहरांमध्ये तेव्हा अवघी ४ हजार ५०० माणसं राहात होती. ब्रिटिशांच्या अंमलात पहिली सुमारे ५० वर्षे गव्हर्नर जनरल यांचा एकतंत्री कारभार सुरू होता. उपलब्ध माहितीनुसार, १८३० पूर्वी रत्नागिरी हे नाव नकाशावर उपलब्ध नव्हते. १८३०ला इंग्रजांनी त्यांच्या प्रशासकीय कारभारासाठी जिल्ह्याचे ठिकाण म्हणून रत्नागिरीला मान्यता दिली, तर १८३२ ला रत्नागिरीला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झाले.

Marathi News Esakal
www.esakal.com