रत्नागिरी-निवडणुकीमुळे रत्नागिरी पालिकेचा ६० लाखाचा कर वसूल
रत्नागिरीत ६० लाखाची थकीत करवसुली
निवडणुकीचा फायदा; उमेदवारांना भरावा लागला कर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : रत्नागिरी पालिकेची सार्वत्रिक निवडणूक पालिकेला फळली आहे. इच्छुक असलेल्या अनेकांनी थकलेली पालिकेचे घरपट्टी, पाणीपट्टी भरल्यामुळे पालिकेचा ६० लाखाचा थकीत कर वसूल झाला आहे. विशेष म्हणजे उमेदवारांना सूचक राहिल्यांचे फावले असून, इच्छुक उमेदवारांनी त्यांचाही कर भरल्याने सूचक फुकटचे करमुक्त झाले आहे.
रत्नागिरी पालिकेची घरपट्टी आणि पाणीपट्टीची वसुली मिळून सुमारे बारा ते चौदा कोटीच्यादरम्यान आहे. पालिकेच्या मालमत्ता विभागाच्या पथकाकडून आणि नागरिक कर भरत असल्याने मार्चपर्यंत सुमारे ६० ते ७० टक्के करवसूल होते तसेच शासकीय थकबाकी मोठी असल्याने थकबाकीची टक्केवारी मोठी दिसते; मात्र या वसुलीसाठी पालिकेच्या मालमत्ता विभागाला अनेक व्याप करावे लागतात. नोटिसा बजवा, नोटीस मुदत संपल्यानंतर अंतिम नोटीस द्या त्यानंतर घर सील करा किंवा पाणीजोडणी तोडा, अशा स्वरूपाची कारवाई करावी लागते; परंतु रत्नागिरी पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे मोठ्या प्रमाणात थकीत कर वसूल झाला आहे.
इच्छुक उमेदवार पालिकेचा थकबाकीदार नसावा, ठेकेदार नसावा. त्याच्या घरी शौचालय असावे, मालमत्तेचे प्रतिज्ञापत्र केलेले असावे, असे अनेक दाखले अर्जाबरोबर जोडावे लागतात. तुम्ही पालिकेचे कोणतेही देणेकरी किंवा थकबाकीदार नाही, असे नाहरकत दाखला अर्जाबरोबर जोडल्यावरच उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला जातो. रत्नागिरी पालिकेच्या निवडणूक रिंगणात १३२ उमेदवार होते. त्यापैकी काहींचे अर्ज बाद झाले. आता १२२ उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज माघारीची तारीख आज असल्याने ही संख्यादेखील कमी होणार आहे. त्यात अर्जदराबरोबर सूचक लागतात. अपक्ष असेल तर त्याला ५ सूचक द्यावे लागतात. राजकीय पक्षाकडून असले तर एक सूचक लागतो. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पालिकेला घरपट्टीच्या माध्यमातून ५६ लाख रुपये कर वसूल झाला आहे. उर्वरित पाणीपट्टी कर वसूल झाला आहे. असा सुमारे ६० लाखाच्या वर करवसुली झाली आहे.

