रत्नागिरी-  निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत फूट

रत्नागिरी- निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत फूट

Published on

०५९१५

रत्नागिरीत महाविकास आघाडीत फूट
राष्ट्रवादी, काँग्रेसचा वेगळा गट : उद्धव ठाकरे गटावर विश्वासघाताचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : जागा वाटपाच्या मुद्द्यावर एकमत न झाल्यामुळे आणि दिलेला शब्द उद्धव ठाकरे गटाने न पाळल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेसने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटासोबतच्या महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. बाळ माने यांना याबाबत चर्चा करण्यासाठी आणि फोन उचलण्यासाठी वेळ नाही. त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही, आमचा विश्वासघात केला. भविष्यात आम्ही याचा विचार नक्की करू; परंतु आता आम्ही १३ जागांवर स्वतंत्रपणे लढणार आहोत. रत्नागिरीतील महाविकास आघाडीतून आम्ही बाहेर पडत आहोत, असे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश कीर यांनी सांगितले.
निवडणुकीच्या ऐन तोंडावर महाविकास आघाडीमध्ये रत्नागिरी मोठी फूट पडल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेसभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मिलिंद कीर आदी उपस्थित होते.
रमेश कीर म्हणाले, ‘शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांनी जागावाटपाचे आश्वासन देऊनही त्यांचे उमेदवार मागे घेतले नाहीत, त्यांनी आमचा विश्वासघात केला. रत्नागिरी पालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटासोबत एकत्र निवडणूक लढण्याबाबत चर्चा झाली होती. सामंजस्याने जागावाटप स्वीकारले होते. राष्ट्रवादी, काँग्रेसने सुरुवातीला १८ जागांची मागणी केली होती; पण केवळ ८ जागा आम्ही दोन्ही पक्षांनी सामंजस्याने स्वीकारल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी फॉर्म सादर केल्यानंतर बाळ माने यांनी आम्ही दिलेल्या उमेदवारांसमोर आपले उमेदवार उभे केले. प्रभाग १६ आणि १३ ‘अ’ प्रभागात राष्ट्रवादीच्या उमेदवारांसमोर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार कायम ठेवले. आमच्या उमेदवारांसमोरील ठाकरे गटाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यासाठी बाळ माने यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे रत्नागिरी पालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडत आहोत.’


महाविकास आघाडीचा धर्म
ठाकरे गटाने पाळला नाही
आम्ही कोणावर टीकाटिप्पणी करणार नाही; पण ठाकरे गटाने दिलेले उमेदवार मागे घेतले नाहीत. आम्ही आघाडीचा धर्म पाळला होता; पण त्यांना आम्ही नको आहे, अशी खंत कीर यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडी म्हणून न लढता स्वतंत्रपणे आम्ही निवडणूक लढवणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com