रवींद्र चव्हाण यांच्यामुळे युती फिस्कटली ः नीलेश राणे
रवींद्र चव्हाण यांच्यामुळे युती
फिस्कटली ः नीलेश राणे
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २२ : सिंधुदुर्गात भाजप-शिवसेनेची युती झाली असती, तर कार्यकर्त्यांना समाधान वाटले असते, परंतु भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना कदाचित भाजप-शिवसेना युती नको होती, असा आरोप आमदार नीलेश राणे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला.
आमदार राणे म्हणाले, ‘खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप आणि शिवसेनेची युती झाली असती तर अधिक बरे झाले असते. कार्यकर्त्यांना समाधान वाटले असते. कदाचित निवडणूक सोपी झाली असती; मात्र, तसे झाले नाही. सिंधुदुर्गात शिवसेना-भाजप युती नको होती, हा भाग वेगळा आहे. बाजूच्या रत्नागिरीमध्ये जी युती झाली, त्याचे आकडे सांगितले तर आश्चर्य वाटेल. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाजपला राजापूरमध्ये जेमतेम एक जागा, लांजामध्ये एक, रत्नागिरीमध्ये सहा जागा आणि त्यामध्येही दोन जागा शिवसेनेने ‘अॅडजेस्ट’ केल्या आहेत. चिपळुणातही तीच परिस्थिती आहे. म्हणजे एक, दोन, पाच याच्यापलीकडे भाजपकडे तिकडे उमेदवार नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यात युतीसाठी हे चालू शकते; मात्र, सिंधुदुर्गात चालायला काय हरकत होती? रत्नागिरी जिल्हा हा मतदारसंघ खासदार राणे यांचा आहे. खासदार राणे यांनी युती झाली तर कार्यकर्त्यांसाठी आणि दोन्ही पक्षांच्या संबंधांसाठी चांगले होईल, असे सांगितले होते. मात्र, काही कारणांमुळे युती होऊ शकली नाही.’
ते पुढे म्हणाले, ‘चव्हाण हे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत. कोकणामध्ये आल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ते तीन तीन दिवस निवडणुकीच्या तोंडावर थांबतात, याविषयी आश्चर्य वाटते. भाजपचे बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील यांचे काम आम्ही पाहिले आहे. आम्हाला कधी वाटले नाही की ते अमुक-अमुक जिल्ह्यांचे आहेत. ते प्रदेशाचे नेतृत्व आहे. एवढ्या मोठ्या माणसाने केवळ दोन-तीन जिल्ह्यांचे राजकारण करावे आणि तीन तीन दिवस या जिल्ह्यात घालवावे आणि ते कशासाठी घालवले, ते निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सांगेन. या निवडणुकीत केवळ भाजप आणि शिवसेना समोरासमोर नाही, तर सगळेच पक्ष मैदानात उतरले आहेत. ३ डिसेंबरला निवडणुकीचा जेव्हा निकाल लागेल, त्यावेळी जनता कोणाबरोबर आहे हे दिसेल.’
..................
चव्हाणांमुळे युती तुटल्याचा
आरोप चुकीचा ः सावंत
मालवण, ता. २२ : कार्यकत्यांच्या मागणीनुसार भाजप स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरली आहे. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्षांमुळे युती तुटली, हे आमदार नीलेश राणे यांचे विधान चुकीचे आहे. महायुतीमध्ये शिंदे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाचे पहिल्यांदा उमेदवार जाहीर केले होते. आम्ही अखेरपर्यंत महायुती होण्याच्या दृष्टीने नगराध्यक्षपदाच्या उमेदवरीवर निर्णय घेतला नव्हता. शिंदे शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमच्याकडे पर्याय राहिला नाही, असे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले.
आमदार नीलेश राणे यांनी केलेल्या आरोपांना श्री. सावंत यांनी उत्तर दिले. भाजपचे जिल्ह्यात संघटनात्मक जाळे योग्य पद्धतीने उभारले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुती न होण्यामध्ये प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची भूमिका आहे, असे काहींनी केलेले विधान पूर्णत: चुकीचे आहे. खरं तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळेला या सर्व कोकणचे नेतृत्व खासदार नारायण राणेंसोबत प्रदेशाध्यक्ष चव्हाण करीत होते. त्यावेळी श्री. चव्हाण पालकमंत्री होते. ते कायमच युतीसाठी आग्रही राहिले. त्यामुळेच भाजपने लोकसभेतही मोठा विजय मिळवला, याचीही आठवण श्री. सावंत यांनी करून दिली.
श्री. सावंत म्हणाले, ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये संपूर्ण राज्याचा आढावा घेत असताना त्यांनी म्हटले होते की, स्थानिक पातळीवर त्यांनी या सगळ्याचा विचार करावा. अडचण आल्यास प्रदेशाध्यक्षांशी संपर्क साधा, असे सांगितले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्रक्रिया सुरू झाल्यानंतर खासदार राणे जिल्ह्यात आले. त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली. मालवणमध्ये भाजपचे १३ नगरसेवक होते. या जागांसह नगराध्यक्षपदासाठी भाजप आग्रही होता. त्यातून परत शिंदे शिवसेनेची नगराध्यक्षपदाची मागणीही होती. त्यांना बारापेक्षा जास्त जागा हव्या होत्या. या सगळ्यांचा समन्वय साधणे अवघड असल्याने येथील सर्व स्थिती मी प्रदेशाध्यक्षापर्यंत पोहोचविली.’
ते पुढे म्हणाले, ‘एकट्या चव्हाण यांनी युती तोडली, असे होत नाही. शिंदेसेनेने आपला नगराध्यक्षपदाचा पहिला उमेदवार जाहीर केला. आम्ही ही सगळी प्रक्रिया शेवटच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी करणार होतो. प्रस्ताव सर्व कार्यकर्त्यांना समाधान देणारा असता, तर हा सगळा विषय सुटला असता. शिवसेनेची जास्त जागांची मागणी होती. त्यामुळे स्थानिक पातळीवर याचे संतुलन राहिले नाही. भाजपमध्ये असलेले आणि तयार झालेले उमेदवारही महाविकास आघाडीने घेऊन त्यांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार बनविले. या सर्व गोष्टींचा विचार करून प्रदेशाध्यक्षांकडे प्रस्ताव दिला होता.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

