गुहागर- नगरपंचायत वार्तापत्र
गुहागर नगरपंचायत वार्तापत्र--लोगो
राष्ट्रवादी काँग्रेसची नाराजी महायुतीसाठी अडचणीची
नगराध्यक्षपदासाठी चार, सदस्य पदांसाठी ४० उमेदवार ; लढतीकडे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २२ ः गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, नगराध्यक्षपदासाठी चार महिला उमेदवार रिंगणात उभ्या राहिल्याने या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या ठिकाणी महायुतीतील जागावाटपावर नाराजी दर्शवून राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) नगराध्यक्षपदासह पाच प्रभागात स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेना, भाजपसमोर आव्हान उभे राहिले आहे.
--मयुरेश पाटणकर, गुहागर
--
गुहागर नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षपदासाठी ॲड. सुप्रिया वाघदरे (अपक्ष), पारिजात कांबळे (उबाठा शिवसेना), सुजाता बागकर (राष्ट्रवादी) आणि नीता मालप (भाजप–शिवसेना युती) या चार उमेदवारांच्या चौरंगी लढतीकडे उत्सुकता आहे. भाजप–शिवसेना युतीची घोषणा झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात उभे केलेले उमेदवार मागे घेतले; मात्र, जागावाटपावर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) नगराध्यक्ष पदासह पाच प्रभागात स्वतंत्र लढत देण्याचा निर्णय घेतला आहे. गुहागरमध्ये १७ प्रभागांमधून ४० उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असून, अनेक प्रभागांत दुरंगी किंवा तिरंगी लढती रंगल्या आहेत. प्रभाग क्र. १ मध्ये तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर (युती) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्या विरूद्ध समीर बागकर (उबाठा शिवसेना) आणि दीपक शिरधनकर (राष्ट्रवादी) असे तिघे उमेदवार आहेत. प्रभाग २ व ३ मध्ये दुरंगी लढती होत असून, उमेश भोसले, सतीश शेटे, रिद्धी घोरपडे आणि स्वरा तेलगडे यांच्यात थेट सामना रंगणार आहे. प्रभाग ४ आणि ९ मध्ये तिरंगी लढत आहे. प्रभाग ५ मधून भाजपच्या वैशाली मावळंकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत. बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ६ मधील निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे. येथे रिद्धी रहाटे (उबाठा शिवसेना) आणि अनुषा भावे (युती) आमनेसामने आहेत. प्रभाग ७ आणि ८ मध्येही दुरंगी लढती असून, प्रगती वराडकर–विदिशा दणदणे तसेच सुषमा रहाटे–रिया गुहागरकर असे उमेदवार रिंगणात आहेत. दिग्गजांचा मुकाबला असलेला प्रभाग १० विशेष लक्षवेधी असून, येथे साहित्यिक राजेंद्र आरेकर (उबाठा शिवसेना) आणि प्रदीप बेंडल (स्वतंत्र) आमनेसामने आहेत. माजी सभापती प्रवीण रहाटे प्रभाग ११ मधून पुन्हा मैदानात उतरले आहेत. प्रभाग १२, १४ आणि १७ मध्ये तिरंगी लढती तर प्रभाग १३ व १४ मध्ये बाप–लेक राजेंद्र भागडे आणि सौरभ भागडे वेगवेगळ्या पक्षांकडून उमेदवार असल्याने या दोन प्रभागांतील निवडणूक ग्रामराजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. प्रभाग १६ मध्ये अमोल गोयथळे, राज विखारे आणि मनिष गोयथळे यांच्यातील त्रिकूट लढतीमुळे वातावरण तापले आहे. एकूणच, नगराध्यक्षपदासाठी ४ आणि सभासद पदांसाठी ४० उमेदवार रिंगणात असल्याने गुहागर नगरपंचायतीची निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची व रंगतदार ठरणार आहे.
------
चौकट
भूसंपादन कोणाच्या पथ्थ्यावर
गुहागर बाजारपेठ परिसरात दिवाळीनंतर रस्ता रुंदीकरणासाठी दुकानदारांना जागा मोकळ्या कराव्या लागल्या होत्या. २०१९ पासून गुहागर-विजापूर महामार्गाच्या कामासाठी त्या जागा रिकाम्या कराव्या लागतील, अशी चर्चा होती. त्याला पर्याय मिळावा म्हणून बाजारपेठेतील अनेक दुकानदारांनी मागणी केली होती; परंतु यावर्षी भूसंपादनाची प्रक्रिया प्रशासनाने पूर्ण केली; मात्र दुकानदारांनी स्वत:हून आपल्या दुकानांच्या जागा मोकळ्या करून दिल्या. नगरपंचायतीच्या पूर्वीच दुकाने खाली करून कोणी काय साधले, यावर चर्चा सुरू आहे. त्याचा परिणाम निवडणुकीवर होणार का? याबाबत आडाखे बांधले जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

