कोकणातील पर्यावरण आणि पर्यटन एकाच नाण्याच्या दोन बाजू......
rat23p7.jpg-
06152
डॉ. प्रशांत परांजपे
वसा वसुंधरा रक्षणाचा...लोगो
इंट्रो
निसर्ग आणि पर्यावरण वाचलं तरच मानवी जीवन शक्य आहे. हे कोकणच्या पर्यटनावरून दिसून येतं. निसर्ग आपल्याला भरभरून देतो आहे. त्याला जपलं पाहिजे. त्याचं संवर्धन केलं पाहिजे. निसर्गावरील अनन्वित अत्याचार थांबवले पाहिजेत. कोकणावर निसर्गदेवतेने दोन्ही हाताने भरभरून सौंदर्याचे उधळण केली आहे तिची जपणूक होणं संवर्धन होणे काळाची गरज आहे.
- डॉ. प्रशांत परांजपे, दापोली
कोकणातील पर्यावरण आणि पर्यटन एकाच नाण्याच्या दोन बाजू..
कोकणातील प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर गणपतीपुळे आणि रत्नागिरी या ठिकाणांना पर्यटक अधिक पसंती देत आहेत. कोकणातील पर्यटनदृष्ट्या विकसित होणाऱ्या या तालुक्यांना किंवा ठिकाणांचे अर्थकारण निश्चितच पर्यटन व्यवसायामुळे वधारत आहे. कोकणाकडे पर्यटक का आकर्षित होतात त्याची कारणमीमांसा होणे देखील आवश्यक आहे. कोकणातील अथांग समुद्र आणि मिनी महाबळेश्वर दापोलीची थंड हवा ही प्रामुख्याने पर्यटकांना आकर्षित करताना दिसते आहे. त्याचप्रमाणे नयनरम्य समुद्रकिनारी असलेली धार्मिक पर्यटनस्थळे अर्थात् गुहागर आणि गणपतीपुळे, रत्नागिरी या ठिकाणांचेही आकर्षण असून, पर्यटकांचा ओघ प्रचंड प्रमाणात वाढलेला दिसून येतो आहे.
* हा ओघ का वाढतो आहे?
सर्वात महत्त्वाची आणि दुर्लक्षित गोष्ट....ज्यामुळेच कोकणचे सौंदर्य अबाधित आहे असा निसर्ग. निसर्गदेवतेने कोकणावर भरभरून अशी दोन्ही हाताने निसर्गसौंदर्याची उधळण केली आहे. सह्याद्रीचे कडे, डोंगरदऱ्या, घनदाट अरण्य, पशुपक्षी, वेली, खळखळणाऱ्या नद्या, अथांग विस्तीर्ण समुद्रकिनारे, खाडी आणि त्यावरील जीवनशैली अशा अनेक कंगोऱ्यांनी कोकणचे सौंदर्य खुलले आहे. अर्थात् निसर्गसौंदर्य आणि पर्यावरण याची झालर असल्यामुळे किंबहुना हा मुख्य भाग हा कोकणच्या पर्यटनाला लाभदायी ठरलेला आहे हे विसरून चालणार नाही; मात्र सद्यस्थिती कोकणची पाहता कारखानदारी आणि विकासाच्या चुकीच्या संकल्पनामुळे अनेक डोंगर उघडेबोडके होऊ लागले आहेत. हरित आच्छादन कमी होऊ लागले आहे. त्याचा परिणाम कोकणातील वातावरणावरही झालेला दिसून येऊ लागला आहे.
सागरी पर्यटन, धार्मिक पर्यटन, जंगल पर्यटन, ग्रामीण पर्यटन ,कृषी पर्यटन, साहित्यिक पर्यटन, शैक्षणिक पर्यटन, सामाजिक पर्यटन, औद्योगिक पर्यटन असे अनेक पैलू हे कोकणच्या पर्यटनाला असलेले पाहायला मिळतात. हे सर्व निसर्ग आणि पर्यावरण या दोन प्रमुख तत्त्वांवर आधारित आहेत याची जाणीवजागृती असणे अत्यावश्यक आहे. दापोलीच्या या निसर्गसंपन्न आणि विद्वत्ता पूर्ण अशा परिघाला साहित्य पर्यावरण आणि पर्यटनाचे कोंदण आम्ही दिले आहे. दापोली ही नररत्नांची खाण आणि निसर्गसंपन्नतेचे माहेरघर. दापोलीच्या प्रत्येक पर्यटन स्थळाला भेट देत असताना एखादया भारतरत्नांच्या किंवा साहित्यिकांच्या, महनीय व्यक्तिमत्त्वांच्या घरावरून किंवा गावातून आपण जात असतो याची ओळख आलेल्या पर्यटकांना करून दिली तर त्यांना एक वेगळा अनोखा आनंद घेता येतो. याच पद्धतीने गुहागर आणि रत्नागिरीतील पर्यटनालाही अशा पद्धतीचा साहित्य आणि पर्यावरण आणि पर्यटन याची सांगड घालून वेगळा आयाम देता येणार आहे.
दापोली येथील निवेदिता प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण संदर्भात विविध विषयांमध्ये अनेक संशोधन आणि सिद्धता दिली आहे. दापोली तालुक्यातील जालगाव येथे पर्यावरणाचा समतोल कसा साधायचा याचे एक म्युझियमच पहायला मिळते. या म्युझियमला कुठेही भिंती नाहीत; पण तरीही पाहण्याजोगे बरेच काही आहे. पर्यावरणीय आनंद घेत असतानाच चालता-बोलता पर्यावरण संवर्धन कसं करावं आणि हरित आच्छादन आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी कोणत्या सोप्या संकल्पना वापरायच्या याची माहिती प्रत्यक्ष अनुभवता येते. दापोलीच्याच नव्हे तर कोकणच्या पर्यटनाला एक वेगळा आयाम या निमित्ताने दापोलीतून दिला जातो आहे.
भारतातील पहिले कचरामुक्त पर्यटन गाव कोकणात होऊ शकते. कचरामुक्त पर्यटन अशी संकल्पना दापोली तालुक्यातील काही होम स्टे पर्यटन संकुलांमध्ये राबवण्यात येते. कचरा हा जागतिक प्रश्न झाला असतानाच फिरायला गेल्यावर प्रत्येक पर्यटनस्थळाच्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात कचरा झालेला दिसून येतो. त्याला छेद देत दापोली तालुक्यातील जालगाव येथील काही ग्रामीण पर्यटन संकुलांमध्ये कचरामुक्त पर्यटन संकुल अशी संकल्पना यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. त्या समवेतच या संकुलामध्ये शेकडो वनौषधींची जवळून ओळख करून दिली जाते. हे पाहण्यासाठी आणि या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आवर्जून इथे भेट देतात. येथे आल्यानंतर कचरा करावा असं न वाटणं अशीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण करण्यात आली आहे. त्या समवेतच कचरा हे दुसऱ्या वस्तूचं रॉ मटेरियल आहे हे प्रात्यक्षिकातून जागोजागी पाहायला मिळत असल्यामुळे आलेल्या विविध वयोगटातील पर्यटकांना या ठिकाणी कचरा करावासाच वाटत नसून कचरा टाकण्यासाठी केलेल्या विविध सुविधांचा उपयोग येथे आलेले पर्यटक आवर्जून करतात. या संकुलामध्ये जमा होणारा अविघटनशील कचरा हा डंपिंग ग्राउंडवर न पाठवता थेट पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठवण्याची व्यवस्था आहे तर या संकुलात शिल्लक राहणाऱ्या किचन वेस्टपासून उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत तयार केले जाते आणि ते बागेमध्ये घातले जाते. इतकेच नव्हे तर या ठिकाणी मातीविरहित मचाण शेतीचा प्रकल्प ही पाहता येतो.
भविष्यामध्ये "कचरामुक्त पर्यटन गाव" अशी पाटी कोकणातील जेथे पर्यटन विकसित झाले आहे अशा गावांवर लावली जाणे आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणं ही काळाची गरज आहे. याकरिता सर्व प्रकारच्या युज अँड थ्रो वस्तू या गावातून हद्दपार होणे ही पहिली पायरी असेल. स्थिर जीवनशैली करता पारंपारिक साधनांचाच वापर अत्यावश्यक आहे. असे झाल्यास काय होईल? जर का कोकणातील गावांवर ‘‘कचरामुक्त पर्यटन गाव’’ अशी पाटी लावून तशा पद्धतीने जाहिरात केली आणि शासनानेही त्यांना प्रोत्साहन दिले तर महाराष्ट्रातूनच नव्हे, देशातूनच नव्हे तर जगभरातून अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देतील आणि पर्यटनात प्रचंड प्रमाणात वाढ होऊन मोठ्या प्रमाणात अर्थकारणही सुधारू शकते.
धकाधकीच्या आणि यूज अँड थ्रो च्या जमान्यात स्थिर आणि शाश्वत जीवनशैली चा अंगीकार म्हणजे नक्की काय याचा अनुभव घेण्यासाठी दापोलीतील जालगाव येथील निवेदिता प्रतिष्ठान या संस्थेला आणि संकुलाला भेट देणे आवश्यक आहे.
अर्थात् हे सर्व माहिती करून देण्याचा उद्देश इतकाच आहे की आपण प्रत्येकाने जर पर्यावरण राखलं नाही तर आपल्या जीवनाला अर्थ शून्य उरणार आहे. कोकणातल्या पर्यटनातून निसर्ग आणि पर्यावरण वजा केलं , वृक्षवल्लीची कटाई केली डोंगर उघडे बोडके केले निसर्ग संपन्नतेचा ऱ्हास केला प्रचंड प्लास्टिकचा आणि एजंटच्या वस्तूंचा वापर करून जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण केलं, तर या ठिकाणी पर्यटक येतील का हा प्रश्नच आहे. किंबहुना जंगल पाहण्यासाठी, वनौषधींची माहिती घेण्यासाठी आणि कायम गुगलच्या गर्तेत अडकलेली जी पिढी आहे तिला आत्मिक शांतता मिळावी म्हणून पैसे खर्च करून या ठिकाणी येणारी पिढी भविष्यात वाढून पर्यटनात अधिक वाढ होणार आहे; पण त्याकरिता त्याचे संवर्धन होणे अत्यावश्यक आहे. म्हणजे कोकणच्या अर्थकारणामध्ये निसर्ग आणि पर्यावरण याचं संवर्धन आणि संतुलन राखणं ही किती अनिवार्य गोष्ट आहे ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आजची परिस्थिती पाहता दिल्ली आणि महाराष्ट्रातीलही महानगरांमधील वायूची आणि हवेची गुणवत्ता घसरली असल्यामुळे भविष्यामध्ये कोकणात शुद्ध हवा खाण्यासाठी लोक आवर्जून येतील. त्यामुळे आपण स्वतःहून कोकणची आब राखणं; निसर्गाने मोफत दिलेलं जी काही निसर्गाची देणगी आहे तिचं संवर्धन संरक्षण करणे ही काळाची गरज आहे.
(लेखक पर्यावरणाचा शाश्वत विकास या विषयातील डॉक्टरेट पदवीधर आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

