शेती नियोजनापुढे बदलत्या ऋतुचक्राचे आव्हान

शेती नियोजनापुढे बदलत्या ऋतुचक्राचे आव्हान

Published on

rat23p3.jpg-
06148
हापूसची बाग
rat23p4.jpg
06149
झोडणीसाठी ठेवलेले भात पूर्णतः भिजून गेले आहे.
rat23p5.jpg
06150
पावसामुळे भातशेतीचे झालेले नुकसान.
rat23p6.jpg-
O06151
हापूस कलमांना फवारणीनंतर आलेली पालवी.
----------

बिग स्टोरी--लोगो

इंट्रो

कोकणातील शेती, बागायती आणि लोकांची जीवनपद्धती ही उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या ऋतूंवर आधारित आहे; परंतु फयाननंतर हे ऋतूचक्र बदलू लागले आहे. पावसाळा सहा महिन्यांचा झाला आहे. यंदा त्याचा प्रत्यय तीव्रतेने अनुभवायला मिळाला. यावर्षी मे महिन्यात दुसऱ्या पंधरवड्यात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर जून महिन्यात मान्सून सक्रिय झाला. सप्टेंबर अखेरीस मोसमी पाऊस परतेल, अशी आशा होती; मात्र पश्चिम बंगालसह अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे परतीचा प्रवास लांबला. संपूर्ण ऑक्टोबरमध्ये पाऊस पडतच राहिल्यामुळे शेती, बागायतीचे चित्रच बदलले. उत्पादन हाती येण्याच्या वेळीच ४० टक्केहून अधिक भातकापणी पावसाच्या तडाख्यात सापडली. त्यामुळे उत्पादनात १५ टक्के घट झाल्याचा अंदाज आहे. या पावसाने आंबा हंगाम एक ते दीड महिना लांबणीवर गेला. परिणामी, मार्च महिन्यात अपेक्षित असलेल्या हापूसच्या उलाढालीला फटका बसला आहे. रब्बी हंगामात कलिंगडासह विविध प्रकारच्या दुबार शेतीच्या उत्पादनातही घट होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शेती, बागायतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या अर्थचक्रावर याचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे भविष्यकाळातील बदलत्या ऋतुचक्राचा अंदाज घेऊन शेती, बागायतीचे नियोजन हे कोकणातील शेतकऱ्यापुढील आव्हान असणार आहे.

- राजेश कळंबटे, रत्नागिरी
------

शेती नियोजनापुढे बदलत्या ऋतुचक्राचे आव्हान

यंदा हंगामात सर्वाधिक फटका ; वायंगणीसह बागायतीचे गणित बिघडणार

रत्नागिरी जिल्ह्याचे खरीप हंगामातील क्षेत्र सुमारे ७१ हजार हेक्टर आहे. यंदा जिल्ह्यात ५५ हजार हेक्टरवर भात, नाचणी आणि अन्य पिकांची लागवड करण्यात आली आहे. त्यामध्ये ४६ हजार हेक्टरवर भात लागवड केली गेली. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी भाताची लागवड अधिक झाली आहे तसेच रत्नागिरी जिल्ह्यात हापूसचे क्षेत्र ६५ हजार हेक्टर असून, १ लाख ११ हजार ६२५ हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड आहे. दरवर्षी रब्बी हंगामात कलिंगड, भाजीपाला यासह कुळीथ, पावटा यांची सुमारे १० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होते. यामध्ये कलिंगड लागवड ऑक्टोबर ते मे या कालावधीत पाणी उपलब्ध असेल तिथे ३ वेळा होते.
--------
* बदलते ऋतूचक्र

- उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीन ऋतूचक्रांचा कालावधी साधारणपणे चार-चार महिन्यांचा आहे; परंतु गेल्या काही वर्षात वातावरणातील बदलाचा प्रचंड परिणाम ऋतूचक्रावर होत आहे. फयान वादळानंतर म्हणजेच २००९ नंतर वातावरणात बदलांना सुरवात झाली. सुरवातीच्या तीन वर्षात वातावरण बदलाचा प्रभाव नव्हता; मात्र गेल्या पाच ते सहा वर्षांपासून त्याचे विपरित परिणाम दिसत आहेत. या वातावरणाने शेती, बागायतीचे वेळापत्रक बिघडू लागले आहे. उन्हाळ्यात पावसाळा, हिवाळ्यात पावसाळा असे चित्र यंदा पाहायला मिळत आहे. अजूनही हवामान विभागाकडून, पुढील पंधरवड्यात पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. या परिस्थितीचा फटका शेती, बागायतीवर अवलंबून असलेल्यांना बसत आहे.
-------
* सहा महिने बरसला पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी साधारणपणे मान्सूनपूर्व पाऊस २५ मे नंतर सुरू होतो. तत्पूर्वी एक ते दोन दिवस अवकाळी पाऊसदेखील पडून जातो. परंतु यंदा जिल्ह्यात १५ मे पासून मुसळधार पाऊस सुरू झाला. तो सलग २८ मे पर्यंत सुरू होता. त्यानंतर लगेचच मान्सून दाखल झाला. मे महिन्यातच नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले. हे चित्र रत्नागिरी जिल्ह्यात बऱ्याच कालावधीनंतर पाहायला मिळाले होते. पुढे जुन, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरूच राहील. ऑक्टोबर महिन्यात पाऊस थांबेल, अशी शक्यता होती; परंतु ती फोल ठरली. संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात पाऊस राहिला. सुदैवाने, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस थांबला. १ नोव्हेंबरला जिल्ह्यात सरासरी ४५.८४ मिमि पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे यंदाचा पावसाचा हंगाम मे ते ऑक्टोबर, असा सहा महिन्याचा राहिला.
-------
* पावसाचे दिवस वाढले ः
रत्नागिरी जिल्ह्यात १ जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत यंदा पडलेला पाऊस गतवर्षीच्या तुलनेत सरासरी ६०० मिलीमिटर कमी आहे. जून, जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर या कालावधीत असमान पाऊस झालेला आहे. जिल्ह्यात सरासरी पाऊस हा ३,३६४ मिमीइतका होतो. यंदा १ जून ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत ३,१८७ मिमी पावसाची नोंद झाली. गतवर्षी याच कालावधीत ३,७७२ मिमी पाऊस झाला होता. मोसमी हंगामात सरासरीपेक्षा पाऊस कमी झालेला असला तरीही मे ते ऑक्टोबर अशा ६ महिन्यातील पावसाची सरासरी पाहिली तर तुलनेत गतवर्षी एवढाच पाऊस झाल्याचे लक्षात येते. यंदाच्या मोसमी पावसातील हा मोठा फरक आहे. पावसाचे दिवस वाढलेले आहेत. जिल्ह्यात १४० दिवस पाऊस झाला आहे.
-----------------

- शेती-बागायतींना फटका

* खरिपातील पिकांच्या उत्पादनावर परिणाम ः असंतुलित पावसाचा सर्वाधिक फटका रत्नागिरी जिल्ह्यातील भातपिकांना बसला आहे. यंदा पेरणीपूर्व मशागती शिल्लक असतानाच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुरवातीलाच बॅकफूटवर गेला. त्यामधून तो कसाबसा सावरला आणि भातपेरण्या सुरू केल्या; परंतु जून महिन्यात विलंबाने पेरण्या केल्यामुळे संगमेश्वर तालुक्यासह काही ठिकाणी रोपांची रूजवात कमी झाली. त्यामुळे काहींना पुन्हा पेरण्या कराव्या लागल्या होत्या. पुनर्लागवडीला रोपं कमी पडू नयेत यासाठी हा खटाटोप करावा लागला. हे प्रमाण तुलनेत कमी असले तरीही हा प्रश्न पावसाच्या विलंबामुळेच झाला आहे. ऑगस्ट महिन्यात सलग पाऊस झाल्याने रोपांना लोंब्या येण्याच्या प्रक्रियेवर परिणाम झाला होता. हे सुमारे २ टक्के प्रमाण होते. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पाऊस थांबायचा विसरून गेला. ४६ हजार हेक्टरपैकी सुमारे ६० टक्केहून अधिक क्षेत्रावर निमगरवी (मध्यम कालावधी) आणि गरवी (दीर्घ कालावधी) बियाणे पेरलेली होती. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात कापणीयोग्य झालेली पावसाच्या तडाख्या सापडली. जिल्ह्यात २० हजार ८११ शेतकऱ्यांचे ३ हजार ९५० हेक्टरवरील क्षेत्राचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून झालेल्या सर्व्हेक्षणातील आकडेवारीनुसार ३ कोटी ६६ लाख रूपयांची भरपाई शेतकऱ्यांनी द्यावी लागणार आहे. त्या व्यतिरिक्त अनेक छोट्या शेतकऱ्यांनी पावसामुळे भिजलेल्या भाताचे पंचनामे झालेले नाहीत. त्यांचेही नुकसान झालेले आहे. एकूणच भात उत्पादनात सुमारे १५ टक्के घट झाली आहे. तसेच पेंढा भिजल्यामुळे यंदा गुरांसाठीचा चारा आणि हापूसच्या पेट्या भरण्यासाठी लागणारे गवत याचीही कमतरता भासणार आहे. त्याचबरोबर खरेदी-विक्री संघाच्या भातखरेदीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात भाताची उत्पादकता हेक्टरी ३२ क्विंटल इतकी आहे. यंदा पावसामुळे झालेले नुकसान पाहता हेक्टरी २ ते ३ क्विंटल भात उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
-------
- पावसामुळे काय झालं?

* हातातोंडाशी आलेले भातपिक मातीमोल
* उभ्या पिकांना शेतातच कोंब फुटले
* मुसळधार पावसाने पीक भूईसपाट
* कापणीचे वेळापत्रक बिघडले
* नाचणी पिकाचेही मोठे नुकसान
* हेक्टरी २ ते ३ क्विंटल भात उत्पादन घटेल
-----

* हापूसचे वेळापत्रक बिघडले

लांबलेल्या पावसाने फळांचा राजा हापूसलाही फटाका बसलेला आहे. आंबा बागायतदारांना व्यावसायिक गणिते सांभाळताना अडचण होणार आहे. आजही आंबा, काजू, कोकम, नारळ, सुपारी या पिकांवर कोकणातील अर्थकारण अवलंबून आहे. हापूस आणि काजू या दोन्ही पिकांचे हंगाम एक महिन्याहून अधिक काळ लांबणीवर जाणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात पाऊस थांबल्यानंतर मोहोर येण्यास सुरवात होते; पण यंदा पाऊसच राहिल्यामुळे झाडाच्या मुळांना ताण मिळाला नाही. पावसामुळे गेल्या वर्षी उत्पादन मिळालेल्या कलमांनाही वारेमाप पालवी फुटलेली आहे. त्याचा परिणाम पुढील वेळापत्रकावर झाला असून, हंगाम एक महिना लांबणीवर गेलेला आहे. मार्च महिन्यात पहिल्या आठवड्यात जेवढी आंबापेटी तयार होते तेवढी यावर्षी मिळणार नाही. मोठ्या प्रमाणात आंबा तयार होण्यासाठी एप्रिल महिना उजाडणार आहे तोही एकाच वेळी आंबा तयार होण्याचीच दाट शक्यता आहे.
----------
* भविष्यातील धोका आणि उपाययोजना ः
बदलत्या वातावरणाचे होणारे परिणाम लक्षात घेऊन भविष्यातील धोके कमी करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठ, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सजग करण्यावर भर दिला गेला पाहिजे. बदलत्या वातावरणात तग धरणारी भात, नाचणी वाणांच्या लागवडीला प्रोत्साहन दिले पाहिजे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या कार्यशाळा आतापासूनच घ्यावयास सुरवात केली पाहिजे. यंदा निमगरव्या म्हणजेच मध्यम कालावधीच्या भातपिकाला अधिक फटका बसला आहे. हे लक्षात घेऊन गरवी (अधिक कालावधीची) भातबियाणे उपलब्ध करून दिली पाहिजेत तसेच आंबा, काजूपिकांना सक्षम पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी संशोधन झाले पाहिजे. हवामानातील बदल तत्काळ शेतकऱ्यांपर्यंत पोचवून त्यावरील उपाययोजनाही कृषि विद्यापिठाकडून सुचवण्यात आल्या पाहिजेत. प्रत्येक हंगामापूर्वी शेतकरी, बागायतदार यांच्या कार्यशाळा घेण्याची गरज आहे. तसेच येत्या काळात वातावरणाला अनुसरून कीडरोगांचे स्वरूप बदलणार असल्याने त्या दृष्टीने नियोजन करण्याची गरज आहे.
----------
दृष्टिक्षेपात...
* वार्षिक सरासरी पाऊस ः ३, ३६४ मिलिमीटर
* गतवर्षी १ जून ते ३१ सप्टेंबर ः ३७७२ मिमी
* यंदाचा पाऊस १ जून ते ३१ ऑक्टोबर ः ३,१८७ मिमी
--------
चौकट २
यंदा पडलेला तालुकानिहाय पाऊस ः

तालुका पाऊस (मिलिमीटर)
* मंडणगड ३१६५
* दापोली २७०८
* खेड ३४०९
* गुहागर ३१६२
* चिपळूण ३३७२
* संगमेश्वर ३५१२
* रत्नागिरी २९३३
* लांजा ३३४३
* राजापूर ३०८०
---------
कोट १
बदलत्या वातावरणाचा फटका यंदाच्या भात पिकांना बसलेला आहे. झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाला सादर केलेला. भविष्यात शेतकऱ्यांना अशा नुकसानीला सामोरे जावे लागू नये, यासाठी कृषि विभागाकडून मार्गदर्शन केल जाईल. तसेच उशिराने तयार होणाऱ्या भात बियाण्यांच्या लागवडीवर भर देण्याबाबत विचार करण्यात येईल. तसे नियोजन करणार आहोत.
- डॉ. शिवकुमार सदाफुले, जिल्हा कृषि अधीक्षक

------
कोट २
पाऊस लांबल्यामुळे यंदा हापसू हंगाम लांबणार हे निश्चित आहे. सध्या अनेक ठिकाणी पालवी येऊ लागलेली आहे. आता पालवी आली की पुढे फळ तयार होण्याचा कालावधी लांबेल. एप्रिल महिन्यात मोठ्याप्रमाणात उत्पादन मिळणार आहे.
- डॉ. विवेक भिडे, आंबा बागायतदार

-----
कोट ३

साडेपाच महिन्यांवर पोचलेला पावसाळा कोकणातील शेतीचा पुनर्विचार करायला लावणारा आहे. नारळ, सुपारी, अननस, मसाल्याची पिके, औषधी वनस्पती आणि बांबू यांना हे ऋतुचक्र फायदेशीर ठरेल. पण आंबा, काजू या पाण्याच्या ताणावर अवलंबून असणाऱ्या पिकांवर नव्याने विचार करावा लागेल. त्यात फणस, करवंद, जांभुळ यासारखी फळे या वाढलेल्या पावसात कशी तग धरतात हे पहाणे औत्सुकत्याचे आहे. पण पाण्याची वाढलेली उपलब्धता योग्य नियोजन केल्यास नवीन संधी निर्माण करतील.
- जयंत फडके, आदर्श शेतकरी
---
कोट ४

पाऊस लांबल्यामुळे काजू झाडांना पालवी आलेली आहे. पुढे ताण व्यवस्थित मिळाला तर मोहोर वेगाने येईल आणि डिसेंबर महिन्यात ओले काजू बी दिसू लागेल. परंतु हे सर्व पुढील वातावरणावर अवलंबून राहणार आहे. गेल्यावर्षी अधिक तापमानामुळे मोहोर जळून गेला होता. यंदा तसे चित्र नाही. त्यामुळे यावर्षी हंगाम चांगला राहील अशी आशा आहे.
- मकरंद जोशी, काजू बागायतदार
-----
कोट ५

यंदा उशिरा पाऊस झाला. त्याचा परीणाम लवकर उत्पादन देणाऱ्या आणि मध्यम कालावधीच्या भात बियाण्यांच्या लागवडीवर झाला. पावसामुळे त्यांचे सुमारे ४० टक्के नुकसान झाले. परंतु उशिराने होणाऱ्या भात बियाण्यांमधून चांगले उत्पादन मिळाले आहे. वातावरणातील बदल लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी भविष्यात सतर्क राहून शेती केली पाहिजे. एकदा पेरलं, लावणी केली कि थेट कापणीला गेलो असे न करता शेतीवर लक्ष ठेवले पाहिजे. फवारणीचे वेळापत्रक निश्चित केले पाहिजे.
- नीलेश सोनेने, प्रभारी अधिकारी, कृषि संशोधन केंद्र, शिरगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com