वन टू का फोर ते थेट नगराध्यक्षांचा राजीनामा
दीडशे वर्षांची रत्नागिरी नगरपालिका--------भाग ३ (समाप्त)
इंट्रो
रत्नागिरी पालिकेने गेल्या पंधरा ते वीस वर्षांमध्ये अनेक चढउतार पाहिले. पालिकेतील वन टु का फोर, नगराध्यक्षपदासाठी स्वतंत्र गट, पाच वर्षांसाठी थेट नगराध्यक्ष निवडून आला असताना घेतलेला अडीच वर्षानंतरचा राजीनामा आणि त्यानंतर झालेली पोटनिवडणूक देखील या रत्नागिरी पालिकेने पाहिली. त्यामुळे रत्नागिरी पालिका राजकारणातील विविध पैलू आणि स्तरातून गेलेली जिल्ह्यात नव्हे तर राज्यात चर्चेत राहिलेली पालिका आहे.
- राजेश शेळके, रत्नागिरी
--
वन टू का फोर ते थेट नगराध्यक्षांचा राजीनामा
रत्नागिरी पालिकेचे राजकारण गेल्या काही वर्षांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस -कॉंग्रेस आघाडी आणि शिवसेना-भाजप युतीच्या भोवतीच राहिले. तेव्हाची राजकीय स्थिती फार वेगळी होती आणि आताचा फार वेगळी होती. शहरामध्ये शिवसेनबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही ताकद वाढत होती. त्यामुळे युतीला टक्कर देणारी दुसरी कॉंग्रेस आघाडीच होती. माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये, राजन शेटये, अशोक मयेकर, प्रमोद रेडीज, राजेश्वरी शेट्ये, महेंद्र मयेकर, बंड्या साळवी, राहुल पंडीत आदींची नावे घेतली जातात. परंतु राजकारणामध्ये एखादा माणून किती चिकित्सक आणि हुशार असू शकतो, याचे उदाहरण म्हणजे स्व. माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांचे नाव घ्यावे लागेल. पालिकेचे सगळे राजकारण त्यांच्या भोवतीच फिरत होते. नगराध्यक्षपदासाठी त्यांनी युतीतील नगरसेवकांना फोडून वन टू का फोर केले, तेव्हा हा शब्द प्रचलित झाला. परंतु कोण नगरसेवक फुटले हे काही पुढे आले नाही. तेव्हा नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडायचा होता. परंतु युतीचे वर्चस्व होते. त्यामुळे युतीचा नगराध्यक्ष होणार हे निश्चित झाले होते. तेव्हा गुप्त मतदान प्रक्रिया होती. उमेश शेट्ये यांनी अशी काही राजकीय खेळी केली की युतीचे वर्चस्व असताना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत युतीचा उमेदवार पडला आणि उमेश शेट्ये नगराध्यक्ष झाले. त्यांनी युतीतील काही नगरसेवक फोडून ही राजकीय किमया केली होती.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उमेश शेट्ये यांचा दबदबा वाढत चालला होता. वरिष्ठांचे आदेश डावलून पालिकेतील राजकीय कारभार ते हाकत होते. पक्षश्रेष्ठींच्या कानावर या गोष्टी गेल्यानंतर तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार उदय सामंत यांनी देखील त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना रोखण्यासाठी पालिकेत पुन्हा वेगळी मोट बांधण्यात आली. राष्ट्रवादीच्या जास्त जागा अल्याने पुन्हा नगराध्यक्ष उमेश शेट्ये होणार हे निश्चित होते. परंतु त्यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाने वेगळी चाल खेळली. ऐन नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ९ सदस्यांनी स्वतंत्र गट तयार केला. त्यामुळे शेट्ये यांचे मताधिक्य कमी झाले. भाजपचे अशोक मयेकर यांनी बहुमत सिद्ध केले आणि ते नगराध्यक्ष झाले. त्यानंतर हा विषय प्रचंड गाजला. अखेर तो गट कॉंग्रेसमध्ये विलिन झाला. नंतर पुन्हा ९ जण राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आले. अशा प्रकारे तेव्हा पालिकेचे राजकारण गाजले.
त्यानंतर थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी शिवसेनेत वेगळ्याच राजकीय घडामोडी झाल्या. शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांच्याबाबत नाराजीचे वातावरण होते. परंतु शहरवासीयांना स्वच्छ चारित्र्याचा आणि उच्चशिक्षित असा नगराध्यक्षपदाचा उमेदवार हवा होता. त्यामुळे शहरवासीयांचे मतपरिवर्तन करण्यासाठी राहुल पंडीत यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. परंतु निवडणुकीपूर्वीच काही राजकीय धोरणं निश्चित झाली होती. त्यानुसार राहुल पंडीत निवडून आले की अडीच वर्षांनी त्यांनी राजीनामा द्यावा, असा अलिखित निर्णय शिवसेनेत झाला होता. त्यानुसार अडीच वर्षांनी राहुल पंडित यांनी श्री देव भैरीच्या चरणी आणि पक्षाच्या वरिष्ठांकडे आपला राजीनामा दिला. तो मंजूर झाल्यामुळे रत्नागिरी शहरात पुन्हा थेट नगराध्यक्षपदासाठी पोटनिवडणूक लागली. त्यानंतर शिवसेनेकडून बंड्या साळवी यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी देखील रिंगणात होती आणि बंड्या साळवी निवडूण आले. अशा अनेक राजकीय घडामोडीची रत्नागिरी पालिका साक्षीदार राहिली आहे.
चौकट
शहर झाले १९३ वर्षांचे...
रत्नागिरी शहरसुद्धा १९३ वर्षांचे झाले आहे. विस्तीर्ण समुद्रकिनारा, सरखेल कान्होजी आंग्रे यांनी सर केलेला रत्नदुर्ग किल्ला, देव ज्योतिबाचे स्थान असलेला किल्ला परिसर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि दानशूर भागोजीशेठ कीर यांच्या कीर्तीने उजळून निघालेले शहर, दीडशे वर्षांहूनही जुने नगर वाचनालय, थिबा राजवाडा, यासह या रत्नागिरी शहरात अनेक वैशिष्ट्ये दडलेली आहेत. मात्र शहर शहरीकरणाच्या व्याख्येत बसून फक्त वाढत आहे. त्याचा सदृढ विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक रत्नागिरीकरांनी आपापले योगदान देणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

