विकास आराखडा ठरणार कळीचा मुद्दा
विकास आराखडा ठरणार कळीचा मुद्दा
लांजा नगरपंचायत निवडणूक ; महायुतीविरोधात आघाडीची रणनिती
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २३ः लांजा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. यंदाचा सर्वात चर्चेचा ठरलेला लांजा प्रारूप विकास आराखडा (डीपी प्लॅन) हा मुद्दा निवडणुकीत कळीचा विषय ठरला असून यावरूनच विरोधक महायुतीला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. याला महायुती कसे सामोरे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. हा मुद्दा जास्तीत जास्त प्रचारात ठेवणार असल्याचे महाविकास आघाडीने पत्रकार परिषदेत जाहिरही केले आहे.
लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीत अनेक प्रश्नांसंदर्भात विरोधक शिवसेना शिंदे गटाला लक्ष्य करणार आहे. लांजा शहरात सध्या पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, वीज समस्या, रस्त्यांची झालेली दूरवस्था, अस्वच्छ गटारे यासारखे अनेक प्रश्न आणि समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. या पार्श्वभूमीवर लांजा नगरपंचायतीची निवडणूक होत असल्याने साहजिकच भावी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांकडून नागरिकांच्या अपेक्षाही वाढलेल्या आहेत. येणारे नगरसेवक हे स्वःहितापेक्षा लोकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी जाणीवपूर्वक काम करणारे असावेत, असा मत प्रवाह नागरिकांमध्ये आहे.
लांजा नगरपंचायतीच्या कारभाराला दोन टर्म पूर्ण होऊनही लांजा शहराचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. पूर्वीचेच प्रश्न खितपत आहेत. त्यामध्ये प्राधान्याने नळपाणी योजनेतून केला जाणारा अपुरा पाणीपुरवठा आणि रस्त्यांची दुरवस्था, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा हे मुद्दे प्रकर्षाने पुढे येत आहेत. याच मुद्द्यांच्या आधारावर शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी व काँग्रेस या विरोधकांकडून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवारांना टार्गेट केले जाऊ शकते, अशीही जोरदार चर्चा रंगत आहे. अगदी सुरुवातीपासूनच आमदार किरण सामंत यांनी लांजा शहराच्या प्रारूप विकास आराखडा (डीपी प्लॅन) संदर्भात घेतलेली आक्रमक भूमिका, डीपी प्लॅन वरून नागरिकांमध्ये असलेला प्रचंड असंतोष, त्यानंतर डीपी प्लॅन रद्द होण्यासाठी लांजा कुवे या दोन्ही गावातील नागरिकांनी केलेले एक दिवसाचे प्रचंड मोठे असे लाक्षणिक उपोषण या साऱ्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीत विरोधकांकडून डीपी प्लॅनचा मुद्दा हा या प्रचाराचा प्रमुख मुद्दा ठरणार आहे. डीपी प्लॅन वर लोकांमध्ये असलेला प्रचंड रोष लक्षात घेता, याच मुद्द्यावर विरोधक शिवसेना शिंदे गटाला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. किंबहुना डीपी प्लॅन हाच प्रचाराचा प्रमुख मुद्दा राहणार असून याच प्रमुख मुद्द्यावर नागरिकांमध्ये रान पेटवले जावून शिंदे गटाला नामोहरण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावरून प्रचाराचा धुरळा उडवून जनमानसात हा मुद्दा पटवून देऊन त्या आधारे शिवसेना शिंदे गटाला कोंडीच पकडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

