शेवटच्या क्षणी भाजप-शिवसेना युतीचं ठरलं

शेवटच्या क्षणी भाजप-शिवसेना युतीचं ठरलं

Published on

शेवटच्या क्षणी भाजप-शिवसेना युतीचं ठरलं
गुहागर नगरपंचायत; राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदासह ५ उमेदवार
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २३ : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी युतीचा संदेश दिला आणि गुहागर नगरपंचायतीत भाजप-शिवसेना (शिंदे) युतीवर शिक्कामोर्तब झाले. जागा वाटपात नगराध्यक्ष आणि ८ जागा भाजपला, तर शिवसेनेने ९ जागा असे ठरले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) पक्षाने २ पेक्षा अधिक जागा मिळाव्यात असा आग्रह धरल्यामुळे ती मागणी अमान्य झाली आणि महायुती भंगली. नगराध्यक्षपदासह ५ जागांवर राष्ट्रवादीने उमेदवार उभे केले. त्यामुळे येथील लढत चुरशीची होणार आहे.
गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष आमचाच ही भूमिका भाजपने सुरवातीपासूनच घेतली होती. मागील निवडणुकीत शहर विकास आघाडी स्थापन करून नगराध्यक्ष बनलेले राजेश बेंडल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि विधानसभा लढवली. आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात चांगली लढतही दिली. त्यामुळे नगराध्यक्ष शिवसेनेचाच असावा असा आग्रह शिवसेनेकडून धरला गेला. २००९ नंतर गुहागरमध्ये झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजपने कितीही आग्रह धरला तरीही प्रदेश भाजपकडून तो मोडून काढला जातो, हा इतिहास आहे. त्यामुळे प्रदेश भाजपच्या माध्यमातून भाजपचा नगराध्यक्षपदाचा हट्ट मोडून काढता येईल असा अंदाज शिवसेनेच्या गोटातून व्यक्त होत होता. मात्र, शहरातील भाजप कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहीले. केवळ भुमिकाच घेतली नाही तर उमेदवारी अर्ज भरताना पक्षाकडून एबी फॉर्मही मिळवला. तिथे भाजप म्हणून व अन्य ठिकाणी अपक्ष म्हणून उमेदवारही उभे केले. शिवसेनेने मात्र युती होईल या भरवशावर राहून भाजपच्या प्रभागांमध्ये सर्व ठिकाणी उमेदवार दिले नव्हते. भाजपच्या प्रदेश पातळीवर महायुतीचा आग्रह धरताना स्थानिक आमदारांना झुकते माप दिले गेले. या धोरणानुसार खेडमध्ये वैभव खेडकर भाजपात आल्यानंतरही खेड पालिकेत शिवसेनेने नगराध्यक्षपदावरुन भाजपची बोळवण केवळ तीन नगरसेवक पदांवर केली. परिणामी दापोली, खेडमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे दिले. हेच लोण अन्यत्र पसरले तर पक्ष सावरणे कठीण जाईल, हे लक्षात घेऊन प्रदेश भाजपने गुहागरमधील भाजप कार्यकर्त्यांची भूमिका मान्य केली आणि युती झाली नाही तर स्वबळावर लढण्यास हिरवा कंदील दिला. या सगळ्या घडामोडींचा परिणाम जिल्ह्यातील युतीवर होऊ नये म्हणून शिवसेनेच्या वरिष्ठांनी गुहागरचा नगराध्यक्ष भाजपचाच हे मान्य केले. जागा वाटपाच्या सुत्रावर आधीच चर्चा झाली होती. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सकाळी झालेली युती सर्वांनी सहज स्वीकारली.
भाजपच्या एबी फॉर्मवर उमेदवारी दाखल केलेल्या ४ जणांनी उमेदवारी मागे घेतली. तसेच शिवसेनेनेही नगराध्यक्षपदासह एका नगरसेवक पदाच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतला. स्थानिक पातळीवर सहजपणे युतीचे स्वागत झाले. आता गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपच्या सौ. निता विकास मालप या युतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.

चौकट
राष्ट्रवादी महायुतीतून बाहेर
महायुतीच्या जागावाटपात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागा देण्याचे ठरले होते. अधिकच आग्रह झाला तर तिसरी जागा सोडण्याचा विचारही होता. मात्र राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष साहील आरेकर यांनी पाच जागांचा हट्ट सोडला नाही. महायुतीचा निर्णय रेंगाळत असलेला पाहून साहील आरेकर यांनी ५ जागांवर पक्षाचे अधिकृत उमेदवार उभे केले. इतकेच नव्हेतर २ वेळा नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडून आलेल्या सुजाता बागकर यांना नगराध्यक्षपदाचा उमेदवार केले. आपली मागणी मान्य होत नाही म्हटल्यावर त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. साहील आरेकर यांनी स्वत:चा उमेदवारी अर्ज मागे घेतला. अन्य पाच जागांवरील उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात ठेवले. हे पाचही उमेदवार भाजप-शिवसेना युती लढत असलेल्या प्रभागांमध्ये आहेत. याचा राष्ट्रवादीला फायदा होणार की तोटा यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com