नगराचे भले करणारे एवढे सारे पाहून उर भरून यावा
दखल------------लोगो
इंट्रो
रत्नागिरी जिल्ह्यात ७ नगराध्यक्षपदासाठी ३३ उमेदवार तर नगरसेवकपदासाठी ४७३ उमेदवार रिंगणात आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वांना नगरांची सेवा करायला हवी आहे, हे पाहून जनतेचा उर अगदी भरून आला असेल. या सर्वांची नगरसेवेची कल्पना काय आणि नगरविकासाबाबत त्यांचे व्हिजन काय, याची उत्सुकता पुरी झाली तर थोडेबहुत समाधान मिळू शकेल.
- शिरीष दामले, रत्नागिरी
--------------------
नगरसेवेच्या उत्साहामुळे उर दाटून येईल
रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असलेल्या पाचही उमेदवारांसोबत संवादाचा नगराध्यक्ष उमेदवार थेट प्रश्न थेट उत्तरे असा कार्यक्रम पार पडला. आयोजकांचे त्याबद्दल अभिनंदन केले पाहिजे. उमेदवारांना बोलते करणे महत्त्वाचेच होते. नगराध्यक्षपदी बसू इच्छिणाऱ्या प्रत्येकाचे व्हिजन काय, हे सर्व मतदारांना अशा पद्धतीने समजावे यासाठी अशा तऱ्हेचे कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी व्हावेत. त्यामुळे लोकांसमोर यांची नेमकी भूमिका येईल आणि ती बांधीलही राहील. रत्नागिरी जिल्ह्यातील निवडणूक होणाऱ्या शहरांचे स्वतःचे असे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. त्यांचा इतिहास, भूगोल, तेथील व्यापारउदीम यामध्ये बराच फरक आहे. या सर्व ठिकाणच्या नागरी समस्या थोड्याबहुत फरकाने सारख्या असल्या तरी त्या शहरांच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपामुळे तेथील समस्यांवरील उत्तरे एकसारखी नाहीत. नागरी सुविधा, शहरातील वाहतूक, स्वच्छता या बाबी समान असल्या तरी त्यावरील त्या त्या शहरातील उपाययोजना वेगवेगळ्या आहेत. याबाबत नगराध्यक्षपद भूषवणाऱ्याचे व्हिजन काय? योजना काय? तो सर्वस्वी सरकारी मदतीवर, मंत्र्यावर व आपल्या पक्षाच्या पुढार्यावर अवलंबून राहणार काय? की लोकांमध्ये काही प्रेरणा निर्माण करून लोकांच्या सहभागातून नगराच्या समस्येवर काही उपाय करू इच्छितो? याचा लेखाजोखा अशा कार्यक्रमातून मांडता येईल. स्वच्छतेसाठी काय उपाययोजना करायच्या, लोकांमध्ये जागृती निर्माण करून त्यांनी स्वयंप्रेरणेने शहर स्वच्छ राहील असे वागायचे, यासाठी या भावी नगराध्यक्षांच्या कल्पना काय आहेत? ते लोकांचे नेतृत्व खऱ्या अर्थाने लोकांपुढे राहून करू इच्छितात की, मंत्री बोले आणि नगराध्यक्ष डोले किंवा पक्षश्रेष्ठी बोले आणि नगराध्यक्ष डोले, अशी स्थिती राहणार याचा अंदाजही येऊ शकतो.
महिला नगराध्यक्षपदी बसली तर पुरुषांपेक्षा ती अधिक चांगला कारभार करू शकेल, असा समज आहे. एकतर महिला व्यवहारात चतूर असतात. सामाजिक समस्या आणि त्यातही महिलांपर्यंत पोहोचणाऱ्या समस्या या त्या अधिक चांगल्या पद्धतीने समजावून घेऊ शकतात. महिलाराज आले तर कारभारात किमान सुधारणा होईल, अशी एक भाबडी आशा वाटू शकते. कोणत्याही व्यवस्थेमध्ये जर योग्य धोरणे नसतील किंवा सध्या आपल्याकडे जशी व्यवस्थाशून्यता दिसते तशी असेल तर त्याचा सर्वाधिक फटका अंतिमतः महिलांना अधिक बसतो. याची जाणीव असल्यामुळे महिला अधिक सजगतेने व्यवहारी दृष्टिकोनाने कारभार करू शकतात. त्यासाठी त्यांच्यापाशी आधी समस्येचे आकलन आणि नंतर समस्येवरील उपायांची अंमलबजावणी करण्याची धम्मक असायला हवी. पुरुष नगराध्यक्षांकडूनही अशाच अपेक्षा असणार आहेत. नगराध्यक्षपदी बसणाऱ्या लोकांची दूरदृष्टी त्यांच्या शहराबाबतच्या संकल्पना याचा दस्तावेज अशा जाहीर कार्यक्रमांतून तयार होऊ शकतो. कालांतराने त्यापासून ते ढळत आहेत असे वाटले तर हा आरसा त्यांच्यापुढे धरता येईल; मात्र तो धरण्यासाठी सक्षम नागरिक आणि दबाव गट हवेत.
*ताजा कलम- या भावी नगराध्यक्षांनी लोकांना न कळवता अथवा लोकांना न सांगता आपापल्या गावच्या गावच्या देवासमोर कोणती शपथ घेतलेली नाहीना, याची खात्री मात्र लोकांनी करून घ्यायला हवी. नाहीतर विश्वासाने ज्याला मते दिली त्यालाच त्याच्या पक्षाने दूर केल्याचे पाहावयास मिळेल. लोकांनी यासाठी सजीव राहिले पाहिजे.
चौकट
लोकांची जागृती महत्त्वाची
चिपळूणसारखे शहर अत्यंत सजग, सतत अस्वस्थ असते. तेथे सतत वेगवेगळी कार्यक्रम होत असतात. लोक नागरी समस्यांबाबत सतत चर्चा करत असतात. शहर सुधारणांबाबत तेथे काही ना काही हालचाली सुरू असतात. काही गट दबाव गट म्हणून काम करतात. यामध्ये तेथील लोकांची जागृती महत्त्वाची आहे तसेच दबाव गट रत्नागिरी, राजापूर, खेडमध्ये अत्यावश्यक आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

