नगरपंचायत, पालिका निवडणुकीत नेतृत्वाचा लागणार कस

नगरपंचायत, पालिका निवडणुकीत नेतृत्वाचा लागणार कस

Published on

दोन मंत्र्यांसह तीन आमदारांची परीक्षा
नगरपालिका निवडणूक ; राजकीय समीकरणांवर निर्णय अवलंबून
सकाळ वृत्तसेवा ः
चिपळूण, ता. २४ ः रत्नागिरी जिल्ह्यात चार नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. विधानसभेनंतर राजकीय समीकरणे बदललेली असून, गेल्या काही दिवसांत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद चिघळलेले आहेत. त्यामुळे शहरी मतदार कोणाच्या पाठीशी राहतात, हे दाखवण्याची परीक्षा पालकमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्यासाठी महत्त्वाची आहे. अर्ज माघारीनंतर या निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले असून, नगराध्यक्षपदासह सत्ताप्राप्तीसाठी सर्व पक्ष आघाड्या सज्ज झालेल्या आहेत. पालकमंत्री सामंत यांनी शिवसेना मजबूत करताना ठाकरे शिवसेनेला लक्ष्य केले आहे तर माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार बाळ माने आणि आमदार भास्कर जाधव हे पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरले आहेत. आमदार जाधव यांचे लक्ष गुहागरपेक्षा चिपळूणवर अधिक आहे.
नगरपालिका-नगरपंचायतींच्या निवडणुकांचा परिणाम पुढील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवरही होणार आहे. माजी आमदार बाळ माने यांची रत्नागिरी पालिकेत तर रमेश कदम यांची चिपळूण पालिकेत कसोटी लागणार आहे. माने यांनी आपल्या सुनेला निवडणुकीत उतरवले आहे. रमेश कदम स्वतः निवडणुकीच्या रिंगणात आहे. विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री सामंत यांचे मताधिक्य घटल्यामुळे त्यांना शहरातील मतदार कसा शिंदे शिवसेनेकडे राहील यासाठी संघर्ष करावा लागत आहे. राज्यमंत्री योगेश कदम खेडमध्ये तर आमदार किरण सामंत राजापूरमध्ये नेतृत्व सिद्ध करण्याच्या सिद्धतेत आहेत. ही लढाई तेवढी सहजसोपी नाही. राजापूर, लांजा येथील राजकीय स्थिती फारच वेगळी आहे. गुहागर आणि खेडमध्ये ठाकरे गटातील नव्याने जिल्हाध्यक्ष झालेले विक्रांत जाधव कोणता चमत्कार दाखवतात, याचीच सर्वांना उत्सुकता आहे.
चिपळूणचे आमदार शेखर निकम यांना महायुतीमध्ये डावलण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नाराजी कोणाला भोवणार, हा प्रश्नच आहे. देवरूख, रत्नागिरी आणि राजापूरमध्ये महायुतीला एकहाती यश मिळावे यासाठी पालकमंत्री सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी सुरुवातीपासून प्रयत्न केले. चिपळूण आणि खेडमध्ये मात्र सुरुवातीपासून नाराजीनाट्य आणि वर्चस्वाची लढाई दिसून आली. चिपळूण शहरात इतर पक्षाच्या तुलनेत काँग्रेस कमी आहे; मात्र काँग्रेसच्या पारंपरिक मतांची विभागणी व्हावी तसेच शरद पवार पक्षाचे उमेदवार रमेश कदम यांना काँग्रेसची पारंपरिक मते मिळू नयेत यासाठी छोट्या काँग्रेस पक्षाचे दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. आमदार भास्कर जाधव यांनी रमेश कदम यांना साथ दिल्यानंतर शिवसेनेची मते उठावीत यासाठी माजी खासदार विनायक राऊत यांनी पक्षाचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिला आहे. त्यामुळे चिपळूणमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळणार आहे. एकूणच चार नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुका असल्या तरी प्रत्यक्षात जिल्ह्यातील पाच आमदारांच्या नेतृत्वाचा थेट कस लागणार आहे.
---
कोट
प्रशासक असताना नगरपालिका आणि नगरपंचायतीमधील कारभार सर्वसामान्य नागरिकांना माहिती आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदार योग्य त्या उमेदवारालाच निवडून देतील.
- रमेश कदम, चिपळूण
---

Marathi News Esakal
www.esakal.com