उष्म्यामुळे किनारपट्टी धास्तावली
O06476
उष्म्यामुळे किनारपट्टी धास्तावली
थंडी गायब, पावसाचे सावट; आंबा पिकावर परिणामाची भीती
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २४ ः तालुक्याच्या किनारी भागातील थंडीचा जोर काहीसा ओसरला आहे. वातावरणातील वाढत्या उष्णतेमुळे पुन्हा एकदा पावसाच्या शक्यतेने बागायतदारांची तारांबळ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिवसाकाठी किनारी भागात सुमारे ३२ डि.से.च्या पुढे तापमान असते. त्यामुळे तीव्र उकाडा जाणवू लागला आहे. परिणामी पावसाच्या शक्यतेने आंबा बागायतदारांसह मच्छीमारांचीही अडचण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
येथील किनारपट्टी भागात रविवारी (ता.१६) सायंकाळच्या सुमारास विजांचा लखलखाट सुरू होता. त्यामुळे बागायतदार धास्तावले आहेत. मध्यंतरी लांबलेल्या परतीच्या पावसानंतर थंडी पडण्यास सुरुवात झाल्यामुळे किनारी भागातील आंबा कलमे मोहोरण्यास अनुकूल वातावरण तयार झाले होते. त्यामुळे आंबा बागायतदारांनी फवारणीच्या कामाला सुरुवात केली होती. काही भागात झाडांना तुरळक प्रमाणात मोहोर दिसू लागला होता. तर काही झाडांवर पालवी होती. सुमारे २५ टक्के झाडांना पालवी फुटली होती तर उर्वरित झाडे मोहोर येण्याच्या प्राथमिक स्थितीत होती. आता तुरळक प्रमाणात मोहोर दिसू लागला आहे. त्यामुळे आंबा हंगामाच्या दृष्टीने अनुकूल चित्र निर्माण झाले होते. थंडीचे वातावरण काही दिवसच कायम होते. आता पुन्हा उकाडा वाढून वातावरणात बदल जाणवू लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अवकाळी पावसाची झोड उठण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तसे झाल्यास आंबा कलमांना येणारा मोहोर थबकू शकतो. मोहोर येण्यासाठी पुन्हा अनुकूल स्थिती निर्माण होण्यास अधिक वेळ जाऊ शकतो. पर्यायाने आंबा हंगाम पुढे जाण्याची शक्यता अधिक असल्याचे मत आंबा बागायतदार वर्तवत आहेत. मच्छीमारी हंगामाचेही जरा कमी असेच चित्र आहे. मध्यंतरी लांबलेला परतीचा पाऊस तसेच समुद्रात वादळसदृशस्थिती निर्माण झाल्यामुळे बाहेरील मच्छीमारी नौका येथील बंदरात आश्रयासाठी आल्या होत्या. पावसामुळे स्थानिक मच्छीमारीही थंडावली होती. त्यानंतर वातावरण निवळून मच्छीमारी पूर्व पदावर येत असताना आता पुन्हा एकदा किनारी भागातील वातावरण पावसाळी होण्याची शक्यता दिसू लागली आहे. पर्यायाने मच्छीमारी हंगामाला यामुळे ब्रेक लागू शकतो. आधीच यंदाच्या हंगामातील सुरुवातीचे तीन महिने निसर्गाची अपेक्षित साथ नसल्यामुळे वाया गेले आहेत. आता हंगाम सुरू होण्याची तयारी असतानाच पुन्हा पावसाची शक्यता दिसू लागल्याने मच्छीमारांच्या चेहऱ्यावरील चिंतेचे सावट अधिक गडद होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
...........................
हंगामासाठी निसर्गाचा अडसर
कोकणचे नगदी पीक म्हणून आंबा हंगामाकडे पाहिले जाते. हापूसमुळे अलीकडच्या काही वर्षात आर्थिक उन्नती होण्यासाठी मोठा वाव असतो. मात्र गेल्या काही वर्षात निसर्गाच्या असमतोलपणामुळे आंबा हंगामाला अडचण निर्माण होऊ लागल्याचे चित्र आहे.
............................
..तर उत्पादन खर्च वाढणार
आंबा बागायतदारांनी मोहोराच्या आशेने फवारणी सुरू केली आहे. प्रगतिशील शेतकऱ्यांच्या आगामी हंगामाच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. असे असताना पुन्हा अवकाळी पाऊस झाल्यास फवारणी वाया जावून उत्पादन खर्च वाढू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

