गणपतीपुळेत विद्यार्थ्यांच्या सहलींचा ओघ वाढतोय
- rat२५p१९.jpg-
P२५O०६५८०
गणपतीपुळे ः येथील किनारी पर्यटकांचा राबता वाढलेला आहे.
- rat२५p२०.jpg-
P२५O०६५८१
गणपतीपुळे ः पॅराग्लायडिंग करताना पर्यटक.
----
निसर्ग, समुद्र अन् स्वयंभू श्रींचं दर्शन...
गणपतीपुळेला पर्यटकांची पसंती ; सहलींचा ओघ, नाताळ, नववर्ष स्वागतालाही होणार गर्दी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ ः प्रसिद्ध धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपतीपुळेत सध्या पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. त्याचबरोबर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहलींचा ओघ वाढलेला असून, त्याचा फायदा स्थानिक व्यावसायिकांना होत आहे.
दिवाळीनंतर थंडीला सुरुवात झाली असून, पर्यटन हंगामालाही उत्साहात प्रारंभ झाला आहे. कोकणातील निसर्गरम्य वातावरण, पहाटेचा गारठा आणि दऱ्यामधील दाट धुक्याचा अनुभव घेण्यासाठी परजिल्ह्यातील नव्हे तर परराज्यांतील पर्यटक जिल्ह्यातील किनारी भागांमध्ये दाखल होत आहेत. त्यात सर्वाधिक ओघ गणपतीपुळे पर्यटनक्षेत्राकडे आहे. गणपतींचे पुरातन मंदिर, अथांग किनारा, राहण्यासाठीची व्यवस्था, जलक्रीडांचा भरपूर आनंद घेण्याची सुविधा सोबतच आजूबाजूच्या परिसरात असलेली विविध पर्यटनस्थळे यामुळे पर्यटक गणपतीपुळेला प्राधान्य देत आहेत. स्थानिक व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, थंडीच्या हंगामात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहलींना गणपतीपुळे किनाऱ्याला पहिली पसंती मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांच्या सहलींचा ओघ वाढू लागला आहे. पावसाळा आणि उन्हाळ्यासोबतच हिवाळी पर्यटनालाही येथे तितकाच प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. पर्यटकांमुळे स्थानिक हॉटेल, लॉजिंग, खाद्यउद्योग आणि इतर व्यवसायांना आर्थिक चालना मिळत आहे. स्वयंभू श्रींच्या दर्शनासह समुद्रकिनारा व आसपासचे निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.
दरवर्षीप्रमाणे डिसेंबरच्या अखेरीस नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी गणपतीपुळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होते. याच काळात रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे आयोजित जिल्हास्तरीय सरस उत्पादन प्रदर्शन व विक्री पर्यटकांसाठी आकर्षण ठरते. कोकणातील विविध उत्पादनांची खरेदी एकाच ठिकाणी करण्याची संधी या निमित्ताने मिळते. त्यामुळे डिसेंबर महिना पर्यटकांसाठी खास पर्वणी ठरतो. एकूणच थंडीच्या पर्यटन हंगामामुळे गणपतीपुळे पुन्हा एकदा पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण ठरत असून, स्थानिक पर्यटन व्यवसायालाही मोठी चालना मिळू लागली आहे.
----
चौकट १
पॅराग्लायडिंगचे विशेष आकर्षण
गणपतीपुळेलगतच्या मालगुंड समुद्रकिनारी पॅराग्लायडिंग सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचे आकर्षण वाढत आहे. समुद्रकिनारा, निसर्गरम्य परिसर आणि गणपतीपुळे मंदिराचे विहंगम दृश्य आकाशातून पाहण्याचा अनुभव पर्यटक मोठ्या उत्साहाने घेत आहेत. शालेय आणि महाविद्यालयीन सहलींमध्ये या राईडला विशेष प्रतिसाद मिळत आहे.
-----
कोट
पर्यटक काही प्रमाणात गणपतीपुळे परिसरात येत आहेत. किनाऱ्यावर फिरण्यासाठी पर्यटक येत असल्याने त्याचा छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना लाभ झाला आहे. सहलींचा ओघही वाढत आहे.
- कल्पेश सुर्वे, गणपतीपुळे

