चिपळूण-लोखंडी खुराड्यात अडकलेल्या बिबट्याची सुटका

चिपळूण-लोखंडी खुराड्यात अडकलेल्या बिबट्याची सुटका

Published on

rat26p2.jpg-
06720
कात्रोळीः येथे वनविभागाने लोखंडी खुराड्यात बिबट्याचे पिल्लू अडकले होते.

लोखंडी खुराड्यात अडकलेल्या बिबट्याची सुटका
कात्रोळी येथील प्रकार; आईपासून विभक्त होत करत होता शिकार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ ः कात्रोळी येथील एका घरात कोंबड्यांच्या लोखंडी खुराड्यात बिबट्या अडकून पडला होता. त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी बुधवारी (ता. २६) मध्यरात्री २ वाजता वनविभागाच्या पथकाने बचाव मोहीम राबवली. अथक प्रयत्नानंतर त्याची सुटका करण्यात यश आले. दहा ते अकरा महिन्याचा बिबट्या आईपासून विभक्त होऊन स्वतः शिकारीसाठी बाहेर पडलेला असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
बुधवारी मध्यरात्री कात्रोळीपैकी लायकवाडी येथील सुरेश जाधव यांच्या कोंबडीच्या खुराड्यात बिबट्या शिरला होता. हा खुराडा लोखंडी होता. त्याच्या तळबाजूला असलेला पत्रा फाटलेला होता. त्यामधून बिबट्या आत शिरला. त्यानंतर कोंबड्या ओरडण्याच्या आवाजाने घरमालक सुरेश जाधवही जागे झाले. त्यांनी लाईट लावून बघितल्यानंतर कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्या असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ गावचे सरपंच दीपक निवळकर यांना माहिती दिली.
निवळकर यांनी चिपळूणचे परिक्षेत्र वनाधिकारी सर्वर खान यांना या संदर्भात कळवले. त्यानंतर खान हे पिंजरा, वनपाल दयानंद सावंत, वनरक्षक राहुल गुंठे, कृष्णा इरमले, वाहनचालक नंदकुमार कदम यांना घेऊन घटनास्थळी पोचले. तोपर्यंत गावातील लोकही त्या ठिकाणी जमले होते. वनविभागाच्या मदत पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. सुरेश जाधव यांच्या घरातील कोंबड्यांचा खुराडा घरच्या अडचणीच्या बाजूला होता. तिथे पिंजरा लावणे कठीण होते आणि खुराड्याची परिस्थिती पाहता बिबट्याला पकडणे जोखमीचे होते; मात्र अथक प्रयत्नानंतर वनविभागाच्या पथकाने त्या बिबट्याला पिंजऱ्यात कैद केले. त्या बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर कणसे यांनी पाहणी केली असता तो सुस्थितीत असल्याची खात्री झाली. त्यानंतर विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई यांच्या सूचनेनुसार, त्या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

चौकट
....अखेर बिबट्या पिंजऱ्यात अडकला !
वनविभागाच्या मदत पथकाने खुराड्याच्या तळाच्या लाकडी फळ्या एकत्र केल्या. त्या लोखंडी ग्रीलच्या साह्याने बांधून लोखंडी खुराडा ग्रामस्थांच्या मदतीने उचलून मोकळ्या जागेवर आणला. त्यानंतर खुराड्यासमोर पिंजरा लावून खुराड्याचे दार घासणी यंत्राच्या मदतीने तोडले; परंतु बिबट्या खुराड्यातून बाहेर येऊन पिंजऱ्यात जात नव्हता. अथक प्रयत्नानंतर तो पिंजऱ्यात गेला आणि ग्रामस्थांसह वनविभागाच्या पथकाने सुटकेचा श्वास सोडला.

कोट
कात्रोळीपैकी लायकवाडी येथे खुराड्यात शिरलेल्या बिबट्याचे पिल्लू दहा ते अकरा महिन्याचे होते. या वयातील बिबटे नुकतेच आईपासून विभक्त होऊन स्वतः शिकारीसाठी बाहेर पडतात. त्या बिबट्याला खुराड्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे. पिंजऱ्यात बंद केलेल्या त्या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.
- सर्वर खान, परिक्षेत्र वनाधिकारी चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com