राजापूर ः संतप्त विद्यार्थ्यांनीच रोखली एसटी बस
rat२६p९.jpg-
०६७४८
राजापूर ः ओझर येथे एसटी बससमोर उभी असलेली मुले.
संतप्त विद्यार्थ्यांनी रोखली एसटी
ओझरेतील प्रकार; मार्ग बदलल्याने होत होते शैक्षणिक नुकसान
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २६ः राजापूर येथील आगारातून सकाळी सहा वाजता सुटणारी राजापूर-ओझर गाडी गेल्या काही वर्षांपासून सुरू होती; मात्र, ही फेरी अचानक रद्द करून येरडव-राजापूर व्हाया ओझर अशी सुरू केली. त्याचा फटका ओझर येथून ओणी येथे शिक्षणासाठी येणार्या शाळकरी मुलांना बसला. शाळेमध्ये जाण्यास मुलांना उशीर होत होता. त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने संतप्त शाळकरी मुलांनी आज एसटी रोको आंदोलन केले. सुमारे तीन तासाहून अधिक काळ गाडी थांबवून ठेवली. विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर गाडी मार्गस्थ झाली.
राजापूर-ओझर ही गाडी सकाळी ६ वाजता सोडण्यात येत होती. ती गाडी येथील शाळकरी मुलांसाठी उपयुक्त ठरत होती. ही गाडी वेळेतच गावामध्ये पोहचून परत येत असल्याने ओणी, राजापूर येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांना फायदेशीर ठरत होती. गेल्या कित्येक वर्षापासून ही एसटी फेरी सुरू होती. सध्या या गाडीने ओझर येथील सुमारे २५ पासधारक विद्यार्थी प्रवास करत होते. गेल्या कित्येक वर्षापासून नियमित सुरू असलेली या गाडीची फेरी आगार प्रशासनाने रद्द करून येरडव-राजापूर व्हाया ओझर अशी सुरू केली आहे. नव्याने सुरू केलेल्या या फेरीमुळे ओझर येथे सकाळी ८.१० वाजण्याच्या सुमारास येते. त्यामुळे येथील पासधारक शाळकरी मुलांना सकाळी साडे सात वाजता शाळेच्या वेळेत जाणे शक्य होत नाही. त्यातून त्यांना शैक्षणिक नुकसानीला सामोरे जावे लागते. याबाबत ओझर ग्रामपंचायतीसह नूतन विद्यामंदिर ओणी यांनी राजापूर आगारातील अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहारही केला होता; मात्र, एसटी आगाराकडून त्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. त्या एसटी बसच्या वेळेमध्ये बदल केला नाही. त्यामुळे संतापलेल्या शाळकरी मुलांनी आज सकाळी गाडी थांबवून ठेवत आंदोलन केले. सुमारे तीन तास ही गाडी थांबून होती. अखेर त्यावर सामंजस्याने तोडगा गाढण्यात आला; मात्र विद्यार्थ्यांना आंदोलनापर्यंत जाण्याची वेळ का आली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
चौकट
एसटी बस पूर्वीप्रमाणे सुरू करा
राजापूर-ओझर ही फेरी सकाळी सहा वाजता पूर्वीप्रमाणे सुरू करावी जेणेकरून ही गाडी सकाळी ६.४५ वा. ओझर येथे पोहोचेल. तेथील विद्यार्थ्यांना सकाळी साडे सात वाजता महाविद्यालयीन वेळेत जाता येईल, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनीही केली आहे.
कोट १
राजापूर-ओझर गाडीच्या फेरीमध्ये बदल करावा अशी प्रवाशांची मागणी आहे. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे. गाडी त्वरीत सुरू करणार आहे. सकाळी विद्यार्थ्यांनी गाडी थांबवलेली होती. त्याची दखल घेतलेली आहे.
- अजितकुमार गोरसाडे, आगार व्यवस्थापक, राजापूर

