भाकड फक्त गाईच होत नाहीत..मानसिकताही होते

भाकड फक्त गाईच होत नाहीत..मानसिकताही होते

Published on

बोल बळीराजाचे .....लोग
(२३ नोव्हेंबर पान ६)

भाकड फक्त गाईच होत नाहीत..
मानसिकताही होते

विभक्त कुटुंबपद्धती खेड्यापाड्यात पोचली आणि गुरं राखणारा म्हातारा इतिहासजमा झाला. मजुरीचा हिशोब गुराख्यात कधीच बसणार नाही मग हवीतच कशाला गुरं? प्रश्नावर काही विचार करायचीच गरज राहिली नाही. जोताला, दुधाला, शेणाला कशालाच गोधन परवडत नाहीसं झालं. पन्नास रुपयाचा शासकीय मदतीचा निकषही ही ओसाड मनोवृत्ती बदलायला उपयोगाची नाही. मग ‘काय करायचं काय या गुरांचं?’ या प्रश्नाचं उत्तर आपण लहान-मोठ्या शहरांपासून गावापर्यंत फिरणाऱ्या उनाड गुराच्या प्रश्नात रूपांतरित झालेलं पाहतोच आहोत. त्यातून होणारे अपघात, जाणारे हकनाक जीव, आयुष्याचे अपंगत्व अनुभवत आहोत. उनाड गुरांचा उच्छाद हा खरंतर या प्रश्नाचा परिणाम आहे.
- rat२८p६.jpg-
25O07135
- जयंत फडके
जांभूळआड, पूर्णगड रत्नागिरी
-----
वाढत्या कृषी यांत्रिकीकरणाने कोकणातील पशुधन झपाट्यानं कमी होत आहे. गुरं राखणारी पिढी आता संपली. गायगुरांना धन मानायलाही कोणी तयार नाही. ‘झटपट फटाफट’च्या जमान्यात प्रत्येक गोष्टीचा तत्कालिक विचार करायची सवय लागली. वापरा आणि फेका सगळीकडेच आलं. मग गोधन तर इतिहासजमा होणारच ना?
मोठा गाजावाजा करून ‘राज्यमाता गोमाता’ योजना राज्यात जाहीर झाली. प्रत्येक गाईसाठी प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान शासनाने मंजूर केले. कमीत कमी वीस गाई असलेली नोंदणीकृत गोशाळाच या योजनेस पात्र करण्याचे शासकीय पाचेरू प्रशासनाने मारून ठेवले म्हणजे सर्वसामान्य शेतकरी कसा वंचित राहील, याची काळजी घेण्यात आली. गोवंश हत्याबंदी कायदा महाराष्ट्रात लागू आहे; पण जो गोवंश शेतकरी काही कारणाने सांभाळू शकत नाही, त्यांचे काय करायचे हा यक्षप्रश्न राज्यभर उभा ठाकला आहे. कोकणात तर या प्रश्नाचे गंभीर परिणाम शेतकरीच भोगत नसून सर्व समाज भोगत आहे. या पशुधन संगोपन प्रश्नांचे अनेक आयाम आहेत. हरितक्रांतीची सुरुवात महाराष्ट्रात तरी पशुधनाच्या मुळावर आली. रासायनिक खतांचा अविवेकी वापर खरंतर या क्रांतीचं विषारी फळ; पण शासकीय शेतीधोरणानं या विषवल्लीला खतपाणी घातलं. एक किलो रासायनिक खत वापरलं तर किती किलो शेणखत वापरायला हवं, याचा म्हणावा तसा प्रचारप्रसार झाला नाही. आता परिस्थिती इतकी गंभीर आहे की, युरिया पडला नाही तर भात वर येणारच नाही. दूधपिशवी आणि सेंद्रिय खताची पिशवी घाटावरून किंवा गुजरातवरूनच येणार आता. मग गुरं बाळगायचीच कशाला?या सगळ्यात आपण बाजारू अर्थव्यवस्थेत कसे अडकत जातोय, हे माझ्या बळीराजाने समजून घ्यायला हवं. धवलक्रांतीत होस्टन, जर्सी गाई शेतकऱ्याच्या माथी मारून आपण देशी गोधन संपवलं तसंच गुरंढोरं संपवून आपण आपलं स्वत्वच संपवतोय. आता धवलक्रांतीचे दुष्परिणाम उघडे पडल्यावर देशी गाई, गांडुळ-सेंद्रिय खत स्वतः करण्यावर कृषीपशुधन विभाग जोर देतोय. म्हणजे घरचे पिढीजात दागिने विकून एक ग्रॅमचे दागिने सोन्याचे म्हणून मिरवणं आपल्याला शिकवलं जातंय. गोठ्यातल्या गाईशी पिशवीतल्या दुधाचा काही संबंध आहे की, नाही हा अजून एक संशोधनाचा विषय आहेच.
जोपर्यंत या गुरांच महत्व फक्त माझा बळीराजा नव्हे तर समाज, नियोजनकर्ते समजून घेत नाहीत तोपर्यंत या गोधनाचा कोणीच मालक नाही. गोरक्षक कार्यकर्ते गाड्यांतून राज्याबाहेर जाणारं गोधन शोधून, गाड्या अडवून, केसेस करून रोखतील; पण त्या गोधनाचं पुढं काय करायचं?याचं उत्तर कोणाकडेच नाही. धार्मिक भावनेला हात घालून शासकीय अनुदानावर चालणाऱ्या तथाकथित गोप्रेमी आणि गोशाळांबद्दल न बोललेलच बरं..! गोप्रेम स्टेटसचा फोटो नाही. मस्त पेन्शनसह निवृत्तीपणाचा विरंगुळा किंवा पूर्वजांच्या कृतज्ञतेची देणगीची जागा नाही. गावभर फिरणारं गोधन हा आपल्या कृतघ्नतेचा आरसा आहे. तो कोणी कोणाला दाखवायचा?
शेती हा धंदा नाही, जीवनपद्धती आहे. तसं वाड्यातल्या दोन गाईंचा हिशोब मांडणारा शेतकरी नाही, व्यावसायिकच म्हणायला हवा. माझ्या बळीराजाच्या गरजेनुसार शासकीय योजना तयार होत नाहीत तोपर्यंत स्वयंपूर्णता हे स्वप्नच राहणार..! निधी वितरणाची टार्गेट पूर्ण होणार; पण माझ्या बळीराजाचं शेतीसाठी गोधन हे स्वप्नच राहणार, भाकड फक्त गाईच होत नाहीत. मानसिकताही होतेच की..! लाडक्या बहिणीला एक गाय वासरासह महिनाभर बाळगून द्या खुशाल पंधराशे रुपये, रोजचे पन्नास, एक गोमाता रस्त्यावर भटकताना दिसणार नाही.. शेतीला शेण, गोमूत्र.. मिळालं तर दूध..! फुकट तिजोरी रिकामी केल्याचा आरोप नाही..एकाच योजनेत किती फायदे. एक गाय एक एकर शेतीसाठी पुरेशी आहे; पण कॅल्क्युलेटरवर हिशोब करणाऱ्यांना आणि शेणाचा वास येतो म्हणून तीनवेळा साबण लावून हात धुणाऱ्यांना पिशवीतून येतं तेच दूध वाटणार.. विषमुक्त अन्न, स्वयंपूर्ण शेती आणि सुखी समाधानी बळीराजासाठी गोधन हेच श्रेष्ठ धन. ‘सुजलाम् सुजलाम् मलयजशितलाम्’ हिंदुस्थान बनेल तेव्हाच विश्वगुरूपदाचं स्वप्न बघावं..तोपर्यंत ‘देशी गाईचं तूप की, गाईचं देशी तूप’ यावरच सखोल चर्चा चालूद्या..!!

(लेखक प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरी आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com