रत्नागिरी-माकडे असंख्य, पकडली फक्त ३६००
rat28p16.jpg
O07187
रत्नागिरीः वनविभागाने पिंजऱ्यात पकडलेली माकडे.
----------
माकडे असंख्य, पकडली फक्त ३ हजार ६००
मनुष्यबळ अन् यंत्रणा अपुरी; बागा, शेतीचे प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांमध्ये नाराजी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ : वानर, माकडांचा उपद्रव हा कोकणातीलच नव्हे तर देशभरातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यावर मात करण्यासाठी राज्यशासनाने प्रतिमाकडामागे ६०० रुपये जाहीर केले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षीपासून ही मोहीम सुरू आहे. त्यासाठी दोन गाड्या, पिंजरेही विकत घेतले आहेत; मात्र माकडांची संख्या अधिक आणि त्यांना पकडण्यासाठीची यंत्रणा अपुरी अशी स्थिती आहे. वर्षभरात वनविभागाने ३६०० माकडे पकडून जंगलात सोडली आहेत. ही मोहीम कूर्मगतीने सुरू असल्याने अपेक्षित फलित मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून माकड आणि वानरांच्या प्रचंड उपद्रवामुळे हातावर पोट असलेला रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे. वानरांच्या त्रासामुळे कडधान्य, तृणधान्ये, पालेभाज्या, फळबागा, परसबागेत होणारा भाजीपाला करणेही ग्रामस्थांनी सोडून दिले आहे. वानरांच्या त्रासामुळे जमिनी ओसाड पडू लागल्या आहेत. या वानरांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी अविनाश काळे यांच्यासह सर्वांनी प्रशासनाकडे मागणी केली होती. पालकमंत्री उदय सामंत यांनी वानर, माकडे पकडण्यासाठी पिंजरा व २ गाड्या देण्याचे निश्चित केले तसेच समाधान गिरी या प्रशिक्षित व्यक्तीचीही नियुक्ती केली. रत्नागिरी आणि दापोली असे विभाग केले गेले होते. त्यानुसार रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथून वानर पकडण्याच्या मोहिमेला प्रारंभ केला. त्यानंतर मार्च २०२५ पर्यंत ही मोहीम सुरू होती. पावसामुळे ही मोहीम थांबली तसेच प्रशिक्षण देण्यासाठी नेमलेले गिरी माघारी परतले. त्यानंतर पाऊस गेल्यानंतर दोन पिंजऱ्यांच्या मदतीने ठिकठिकाणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यातही सातत्य नसल्याने आंबा-काजूचा दुसरा हंगाम आला तरीही अवघ्या साडेतीन हजाराहून अधिक माकडे पकडली गेली. त्यासाठी प्रतिमाकड ८०० रुपये खर्च केला गेला आहे. सध्या ही मोहीम कूर्मगतीने सुरू असल्यामुळे यंदाच्या हंगामातही बागायतदारांना माकडांच्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
दरम्यान, राज्यशासनाने वानर आणि माकडे यांना पकडण्यास अधिकृत मान्यता दिली आहे. २५ नोव्हेंबरला या संदर्भात धोरण जाहीर केले आहे. वानर आणि माकड यांना पकडून देणाऱ्यांसाठी शासनाने सहाशे रुपये अनुदान निश्चित केले आहे; मात्र त्यासाठी प्रशिक्षित व्यक्तीची गरज भासणार आहे.
चौकट
रखवालदारांवर २०० कोटीचा खर्च
रत्नागिरी जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यापासून आंबा-काजू हंगाम सुरू होतो. गेल्या काही वर्षांपासून माकडांचा त्रास वाढल्यामुळे बागांच्या सुरक्षेसाठी रखवालदार ठेवले जातात. स्थानिक पातळीवर लोकं मिळत नसल्याने नेपाळींना प्राधान्य दिले जात आहे. दरवर्षी २५ हजाराहून अधिक नेपाळी आंबाबागांमध्ये सुरक्षेसाठी नेमले जातात. त्यांच्यावर सुमारे २०० कोटीचा खर्च बागायतदारांना करावा लागतो. माकडांचा उपद्रव कमी झाला तर यातील काही खर्चाची बचत होईल, असे बागायतदारांचे म्हणणे आहे.
कोट
रत्नागिरी जिल्ह्यातील वानर, माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी हिमाचलच्या धर्तीवर परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे. त्यावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही. माकड पकडण्यासाठी पुरेसे पिंजरे पाहिजेत. जिल्ह्यात फक्त दोन पिंजरे आहेत; मात्र माकडांची संख्या अधिक आहे. यंत्रणा अपुरी आहे. याचा विचार झाला पाहिजे.
- अविनाश काळे, शेतकरी
कोट
वनविभागाच्या माध्यमातून माकड पकडण्याची मोहीम सुरू आहे. गेल्या वर्षभरामध्ये माकडं पकडण्यात आली आहेत. त्यासाठी दोन पिंजरे आणि आठ प्रशिक्षित कर्मचारी आहेत. त्यांच्या माध्यमातून वर्षभरात माकडे पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येत आहे.
-गिरिजा देसाई, वनविभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

