-सृष्टीचा मूलाधार माती
जपूया बीजवारसा---------लोगो
(२५ नोव्हेंबर टुडे ३)
सृष्टीचा मूलाधार माती
शेतकऱ्यांसाठी आई असलेली माती, शेतकऱ्याच्या कष्टाला न्याय देत आपल्याला अन्न देणारी माती, कुंभाराच्या चाकावर फिरून भांडी बनणारी माती, देवतांची मूर्ती बनवणारी माती, कुडाच्या घराच्या भिंतींना गिलावा देणारी माती आणि अंत्यसंस्कारावेळी चिता रचणारी माती! मातीने आपले अवघे जीवन व्यापलेले आहे. हडप्पा येथे आढळलेली मातीची भांडी, विटा आणि कलाकुसरीच्या वस्तू हा आपल्या गेल्या पाच हजार वर्षांच्या प्राचीन आणि अभिमानास्पद संस्कृतीचा वारसा आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये मातीचा एवढा वाटा असतानाही आपल्या रोजच्या व्यवहारात मात्र मातीला हवा तसा दर्जा किंवा सन्मान नाही. अति तेथे माती, माती होणे, मातीमोल होणे या आपल्या बोलीभाषेतील म्हणी पाहिल्यावर हे लक्षात येईल. वाईट, अपमान, कमीपणा, नाश, खोटा अशा विविध अर्थाने माती हा शब्द वापरलेला दिसून येतो. खरेतर पृथ्वीवरील वनस्पती-प्राणी यांच्यासारख्या जैविक तसेच हवा-पाणीसारख्या अजैविक घटकांचा मुख्य आधार माती आहे.
- rat१p२.jpg -
25O07724
- कुणाल अणेराव
वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, सृष्टिज्ञान संस्था
----
पृथ्वीचा घनपृष्ठभाग जो कायमस्वरूपी पाण्याने झाकलेला नाही त्याला जमीन असे म्हणतात. त्यावरील एक पातळ आच्छादन म्हणजे माती होय. वारा, वादळ आणि पावसामुळे खडकांची झीज होऊन माती तयार होते. हा थर हजारो वर्षांत तयार होतो आणि त्यात सर्वाधिक पोषक तत्त्वे, सेंद्रिय पदार्थ व सूक्ष्मजीव असतात, त्यामुळे तो सुपीक मानला जातो. माती हे एक जटिल मिश्रण असून, तिच्या रचनेत खनिजे, हवा, पाणी आणि जैविक घटक यांचा समावेश होतो. हे घटक मातीचा रंग, कस, आम्लता, पाण्याचा निचरा आणि पर्यावरणात परिसंस्थांसाठी उपयुक्तता ठरवतात. निसर्गाच्या जलचक्र आणि कार्बन-नायट्रोजन-फॉस्फरस यांच्या पोषणचक्रामध्ये माती महत्त्वाची भूमिका बजावते. वनस्पतींना आवश्यक हवा, पाणी व अन्य पोषक द्रव्यांचा संचय करणे आणि त्यांच्या मुळांचा आधार बनणे, हे मातीचे महत्त्वाचे कार्य आहे. परिसंस्था आणि शेतीमध्ये मातीचे असलेले हे स्थान लक्षात घेऊन दरवर्षी ५ डिसेंबर हा ‘जागतिक मृदादिन’ म्हणून साजरा केला जातो. अन्नसुरक्षेमध्ये मातीच्या असलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल जाणीवजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या (UN) महासभेने आणि अन्न व कृषी संघटनेने जागतिक मृदादिनाला मान्यता दिली आहे.
परिसंस्थांमध्ये नैसर्गिकरित्या मातीच्या घटकांचे संतुलन राखले जाते; परंतु मानवी हस्तक्षेपामुळे हे संतुलन बिघडते आहे. मातीची धूप आणि भूप्रदूषण या मोठ्या समस्या आहेत. मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाल्यामुळे संपूर्ण जगात प्रत्येक वर्षी धूप होऊन जमिनीवरील वरची पंचवीस अब्ज टनांपेक्षा जास्त माती वाहून जाते, हा चिंताजनक दर आहे. त्याचप्रमाणे रासायनिक शेतीमधील खते, कीटकनाशके आणि बुरशीनाशके तसेच मोठ्या प्रमाणावर होणारा कचरा यामुळे भूप्रदूषण होत असते. यात हवामान बदलामुळे वाढलेली वादळे, दुष्काळ, अतिवृष्टीसारख्या आपत्तींची संख्या मातीचे नुकसान करत आहेत. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पंजाब, महाराष्ट्रासारख्या राज्यातील काही भागातील माती पूर्णपणे वाहून गेली आहे. ती जमीन शेतीसाठी उपयुक्त राहिलेली नाही. याचा थेट परिणाम सजीवांसाठी अन्न उपलब्धता कमी होण्यावर होतो. अन्न महाग झाल्याने सर्वसामान्य लोकांना परवडत नाही आणि कुपोषण वाढते. हेच कुपोषित लोक हवामान बदलाचा आरोग्यावर होणारा परिणाम झेलू न शकल्याने मृत्युमुखी पडतात.
हे भयानक परिणाम पाहता जमिनीवरील माती वाचवण्यासाठी शाश्वत माती व्यवस्थापन हा उपाय आहे. यात मातीचा कस कायम ठेवण्यासाठी सेंद्रिय शेतीचा स्वीकार आणि पुरस्कार केला जातो. त्यासाठी स्थानिक बियाणी वापरून शेणखत-गांडूळ खतसारखी सेंद्रिय खते आणि निंबार्क-दशपर्णी अर्कसारखी सेंद्रिय कीटकनाशके वापरून शेती करणे आवश्यक आहे. फेरपालट, मिश्रपिकांची लागवडसारख्या पारंपरिक पद्धती वापरून शेती केल्यास मातीचा पोत सुधारण्यास मदत होतो. जंगलतोड थांबवून स्थानिक वृक्षांची लागवड केल्यास मातीची धूप आणि प्रदूषण कमी होते, भूजल पातळी वाढते आणि आणि मोठ्या प्रमाणावर कार्बन मातीमध्ये मुरवला जातो. अशाप्रकारे जर आपला आधार सुरक्षित राहिला तरच आपले भविष्यही सुरक्षित होईल.
(लेखक स्वत: शेतकरी असून, आदिम बियाणी संवर्धन करत आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

