रत्नागिरी-जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीपोटी हवेत ३ कोटी ६६ लाख

रत्नागिरी-जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीपोटी हवेत ३ कोटी ६६ लाख

Published on

शेतकऱ्यांना मदतीपोटी हवेत ३ कोटी ६६ लाख
ऑक्टोबरमधील नुकसान ; २० हजार ८११ शेतकऱ्यांना बसला फटका
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ः ऑक्टोबरमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील भातशेतीला मोठा फटका बसला आहे. त्याचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा अहवाल जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून शासनाला सादर केला आहे. जिल्ह्यातील २० हजार ८११ शेतकऱ्यांचे ३ हजार ९५० हेक्टर क्षेत्रावरील शेती-बागायतीचे नुकसान झाले आहे. त्यांना मदतीपोटी ३ कोटी ६६ लाख ८२ हजार रुपयांची आवश्यकता भासणार आहे.
मोसमी पावसाचा मुक्काम १० ऑक्टोबरपर्यंत लांबला होता. त्यानंतर अरबी समु्द्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरूच राहिला. त्यामुळे कमी आणि मध्यम कालावधीची भातशेती संकटात सापडली होती. तयार झालेल्या पिकांची वेळेत कापणीच करता येत नव्हती. काहींनी कापून ठेवलेले भातरोपांवर पाणी पडल्यामुळे नुकसान झाले. काही ठिाकाणी भातरोपं रूजून आली. कृषी विभागाकडून बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यास सुरवात केली. त्यात २० हजार ८११ शेतकरी बाधित झाले होते.
शासनाच्या निकषानुसार, जिरायती क्षेत्राला हेक्टरी ८ हजार ५०० रुपये तर बागायतीला हेक्टरी १७ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांना २२ हजार ५०० रुपये मिळतात. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील जिरायतीचे सर्वाधिक नुकसान झाले असून, ३ कोटी ६३ लाख २२ हजार रुपये भात, नाचणीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहे. शासनाच्या आदेशानुसार, कृषी विभागाकडून बाधितांच्या भरपाईचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे.
दरम्यान, शासनाकडून मदत मंजूर झाली तरीही जिल्ह्यातील शेती गुंठेवारीत असल्यामुळे झालेल्या नुकसानीचा लाभ शेतकऱ्यांना तितकासा होणार नाही. झालेले नुकसान अधिक आणि मदत अत्यंत तुटपुंजी अशी स्थिती होणार आहे. सध्याच्या निकषानुसार गुंठ्याला मिळणारी रक्कम शुल्लक आहे. मदतीपोटीची रक्कम वाढवारी अशी मागणी शेतकऱ्यांनी सोमेश्वर येथील पाहणी दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्याकडे केली आहे.

चौकट
तालुका बाधित क्षेत्र (हेक्टरी) नुकसान (रुपयात)
* रत्नागिरी ३७७.५४ ३६ लाख २२ हजार
* लांजा ४०४.३२ ३४ लाख ५६ हजार
* राजापूर २०२.७२ १९ लाख ८७ हजार
* चिपळूण ८३८.२७ ७४ लाख ८८ हजार
* गुहागर १२३.७४ १२ लाख ६ हजार
* संगमेश्वर ५४८.४४ ५२ लाख १६ हजार
* दापोली ५१२.३३ ४९ लाख २४ हजार
* खेड ६०८.२८ ५८ लाख १४ हजार

कोट
ऑक्टोबरमध्ये पावसामुळे बाधित झालेल्या शेती, बागायतीचे पंचनामे पूर्ण झाले असून, त्याचा अहवाल शासनाला सादर केला आहे. यंदा पावसामुळे भातक्षेत्राचे १५ ते २० टक्के उत्पादन कमी होणार आहे.
- डॉ. शिवकुमार सदाफुले, जिल्हा कृषी अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com